कोळाचे पोहे

  • २ वाट्या जाड पोहे (मध्यम घ्यावेत फार जाड नको)
  • २ नारळ खवून
  • २ लिंबाइतकी चिंच भिजवून, १ वाटी - चिरलेला गूळ
  • ४/५ हिरव्या मिरच्या वाटलेल्या- सोबत हवे असल्यास थोडे आले वाटून
  • मीठ चवीनुसार- १ मुठ कोथिंबीर बारीक चिरुन, १ टमाटा बारीक चिरून
  • जिरे, हिंग व फोडणी साठी तेल किंवा तुप-, सजावटी साठी बारीक शेव.
३० मिनिटे
४ जणांसाठी

तयारी-

पोहे स्वच्छ निवडून व चाळून घ्यावेत. नारळ वाटून दाट दूध काढून- गाळणीने गाळून घ्यावे - नारळाच्या दुधातच चिंच कोळून घ्यावी. पाण्याचा अंश न वापरता चिंच कोळून घ्यावी. त्यातच गूळ व मीठ घालावे. (चवीला आंबटगोड असायला हवे - गुळाचे प्रमाण त्याप्रमाणात कमी जास्त करावे). आले/मिरच्या वाटून घ्याव्यात. कोथिंबीर व आवडत असल्यास टमाटा बारीक चिरून घ्यावा. 

कृती-

छोट्या कढईत तेल अथवा तूप घेऊन गरम करावे. त्यात जिरे, हिंग, वाटलेल्या मिरच्या व आले टाकून खमंग फोडणी बनवावी. बारीक चिरलेला टमाटा कोळांत मिसळून मग फोडणी द्यावी म्हणजे चव व रंग/सजावट छान जमते. हा कोळ नीट एकजीव करून घ्यावा.

वाढताना एका बाऊल मध्ये पोहे घेऊन त्यावर पूर्ण पोहे भिजतील इतका कोळ घालून वर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी - सजावटी साठी त्यावर बारीक शेव पण भुरभुरल्या सारखे घालावेत.   

नारळाचे दूध दाट हवे -पोहे पाण्याने धुऊ नयेत- नाहीतर पोहे पांचट लागतात. मिरच्या तिखट व वाटून घेतल्या की तिखट चव छान लागते नाहीतर फक्त आंबट चवच येईल.

नारळ, चिंच, गूळ ह्या ऐवजी दही (४ वाट्या) घेतले तर दही पोहे होतात. दही गोड व थोडे घुसळल्या सारखे करून त्यावर फोडणी द्यावी. पोहे खायला द्यायच्या आधी मात्र फोडणीच्या दह्यात १०/१५ मिनिटे भिजवून मग द्यावेत.

चवीनुसार मीठ व गुळाचे प्रमाण कमी जास्त करावे. फोडणीत आपल्या आवडीचे साहित्य जसे कढीपत्ता वगैरे टाकले तरी चालते.

शेव टाकायची झाल्यास अगदी केसांसारखी बारीक घ्यावी

सौ.