म्हातारपण...

सुईत दोरा ओवताना
दोरा जातो इकडंतिकडं
पुन्हा पुन्हा दोऱ्याचं
टोक होतं वेडंवाकडं
जेव्हा वाटतं सुईने
क्षणभर तरी दाभण व्हावं
तेव्हा आपण समजून घ्यावं
आलं आहे म्हातारपण !

कुणीतरी विचारीत असतं
"कपडे धुवायला टाकले का?"
आपल्याला वाटतं, तो म्हणतोय
"रात्री नाटकाला येणार का?"
आपण म्हणतो.."नको रे बाबा,
सोसत नाही जागरण.."
सारे खो खो हसतात तेव्हा
आलंय म्हणावं म्हातारपण !

सूनबाई ताटामध्ये
वरणफळं जेव्हा वाढते
जेवता जेवता तोंडामधली
कवळी तेव्हा उचकटते
नातवंडांना हसू फुटते
नको वाटतं तेव्हा जेवण
असं झालं म्हणजे समजावं
याला कारण म्हातारपण !

रडून रडून दमतो राजू
पाहात नाही कुणी ढुंकून
आपाण त्याला उगं करतो
पाठ त्याची थापटून थोपटून
तो गळ्याशी बिलगतो तेव्हा
भरून येतं अंतःकरण
आणि वाटतं संपूच नये
कधीही हे म्हातारपण !

- शंकर इनामदार, जुन्नर.