आई गं,आता मला एकदा तरी सांग !

आई गं, आता मला एकदा तरी सांग
जिराफाचे पायमोजे किती असतील लांब?
हत्तीदादाला सूट शिवायला लागतं किती कापड?
रानात राहायचं सोडून का गं गावात येतं माकड?
सरळ चालायचं सोडून का गं बेडूक मारतो उड्या?
टोचत नाहीत का चिमणूताईला घरामधल्या काड्या?
चट्ट्यापट्ट्यांचा का गं झेब्रा नेहमी घालतो झगा?
बगळा कसा गं एका पायावर राहू शकतो उभा?
इतकी भिजतात तरी झाडं रेनकोट का नाही घालत?
डोंगर का गं येत नाहीत गावाकडे चालत?
चार वर्षांचा घोडा झालास म्हणतेस तू गं मला
घोड्याची आई तसंच का गं म्हणत असेल त्याला?
नेहमीसारखं हसून नकोस टाळू सारं काही
उत्तर दिलं नाहीस तर तुझ्याशी कधीच बोलणार नाही.

- मधुकर सातारकर.