मराठी कोर्टात!

ई सकाळमधे एकामागून एक दोन चांगल्या बातम्या वाचायला मिळाल्या. ही त्यातली दुसरी. डिसेंबरपासून कोर्टात मराठी भाषा वापरण्याबद्दल ही बातमी आहे. मराठीतून येथे चर्चा करणे शक्य व्हावे ह्या उद्देशाने ती येथे उतरवून ठेवली आहे.


मूळ बातमी : मराठीतून न्यायदानासाठी मानसिकता बदलण्याची गरज : चंद्रशेखर धर्माधिकारी
पुणे, ता. २४ : न्यायालयातील कामकाज मराठीत चालविण्यासाठी या क्षेत्रात काम करणारे न्यायाधीश आणि वकील यांची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत विधी अनुवाद आणि परिभाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आज व्यक्त केले. .......
........ पुणे न्यायालयातील काही कामकाज एक डिसेंबरपासून मराठीत सुरू होईल, असे जिल्हा न्यायाधीश बी. डी. कदम यांनी सांगितले.न्यायालयीन यंत्रणेत मराठीचा वापर सुरू करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी धर्माधिकारी आहेत. पुण्यात कामकाजाची पाहणी करण्यासाठी, तसेच येथील न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी आणि वकील यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते आज पुण्यात आले होते.


पुणे बार असोसिएशनने आयोजिलेल्या वकिलांच्या सभेत श्री. धर्माधिकारी म्हणाले, ''अन्य राज्यांत तालुका व जिल्हा पातळीवरील न्यायालयीन कामकाज स्थानिक भाषेत चालते. न्यायप्रणाली सामान्य माणसे आणि पक्षकारांसाठी आहे. त्यांना समजेल अशा भाषेत कामकाज चालले पाहिजे. मराठी भाषेत कामकाज चालविण्यासाठी न्यायाधीश आणि वकील यांची मानसिकता बदलली पाहिजे. मराठीकरणाची सुरवात पुण्यापासून व्हावी, या उद्देशाने आज मी पुण्यात आलो. न्यायाधीश आणि कर्मचारी यांच्या अडचणी जाणून घेतल्या. एक महिन्याने मी पुन्हा पुण्यात येणार आहे.''


महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अहमदखान पठाण, अँड. नंदू फडके यांची भाषणे झाली. असोसिएशनचे अध्यक्ष औदुंबर खुने पाटील यांनी प्रास्ताविक केले.


कार्यक्रमानंतर जिल्हा न्यायाधीश कदम यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ''पुण्यात एक डिसेंबरपासून न्यायालयीन कामकाज मराठीत करण्याच्या निर्णयाची काही प्रमाणात अंमलबजावणी सुरू करणार आहोत. ज्या निर्णयावर पुन्हा अपील होत नाही, ते कामकाज मराठीत होईल. न्यायालयातील पत्रव्यवहारही मराठीत सुरू करण्यात येईल.''