इडली, अवर किड आणि आम्ही!

ही १९८३च्या डिसेंबर महिन्यात घडलेली घटना आहे.त्या वेळी आम्ही मुंबईत -मुलुंड मध्ये रहात होतो. माझा मुलगा त्या वेळेस सुमारे ३ वर्षाचा होता.
आम्ही रहात होतो त्या सहकार्री गृह-निर्माणसंस्थेचे आवार मोठे होते व मुख्य प्रवेशद्वार आमच्या इमारतीपासून चालण्याची एक छोटी फेरी होईल इतपत दूर होते.रात्री जेवणानंतर बहुतेक वेळा मुख्य प्रवेशद्वार पर्यंत फेरी मारणे व कधी कधी पान खाऊन परत येणे हा नित्यक्रम होता.
त्यादिवशी रात्री मी,सौ व आमचा छोकरा असेच रात्री सव्वा-दहाच्या सुमारास घरच्याच,बऱ्यापैकी चुरगळलेल्या,कपड्यात बाहेर पडलो. हवेत सुखद गारवा होता.मुख्य प्रवेशद्वारापासून परत फिरणार तोच आमचा छोकऱ्याने 'मला आत्ता इडली खायची' म्हणून हट्ट धरला व तो प्रवेशद्वाराच्या कठड्यावर ठिय्या देवून बसला.आम्ही त्याला आधी नकार दिला, मग आंजारून,गोंजारून नंतर सौम्यपणे रागावून,उद्या नक्की खायला जाऊ,वगैरे आमिषेहि देऊन पाहिली पण त्याने आपला सत्याग्रह चालूच ठेवला.
शेवटी मी शक्कल लढ्वावी म्हणून 'बघ आता माझ्याजवळ पैसे पण नाहीत' म्हणून खिसे उलटे केले तर नेमकी वीस रुपयाची एक नोट सापडली! मग सौं. मला हळू आवाजात इंग्रजीत म्हणाली 'आपण याला रेल्वे स्थानकाजवळच्या उपहारगृहापर्यंत घेऊन जावू. ते एव्हाना बंद झाले असेल. त्याला "बघ,आता हॉटेल पण बंद झाले. आपण उद्या नक्की येऊ' म्हणून पटवूया"'.मग आम्ही त्या बोलीवर त्याला घेवून त्या उपहारगृहापर्यंत घेऊन गेलो.
त्याच्या सुदैवाने ते उपहारगृह उघडे तर होतेच आणि आत बऱ्यापैकी गर्दीहि होती!(तो दिवस नेमका शनिवार होता!)
आता आत जाणे भागच होते.मग आम्हाला एकदम आमच्या घरच्या चुरगळलेल्या कपड्यांची जाणीव झाली.माझी पत्नी तर घरच्या साडीत असल्याने आत जायला नाखुशच होती. पण तो पर्यंत आमचे चिरंजीव धावत आत मध्ये जाऊन एक रिकामे टेबल पकडून मजेत जाऊन बसले व त्याने वेटरला ईडलीची मागणीहि नोंदवली.आता नाइलाज होता.आम्ही ओशाळलेल्या चेहऱ्याने,संकोचाने आत जावून बसलो.
मी (आर्थिक टंचाईमुळे) घाई-घाईने वेटरला "फक्त एक प्लेट'' ची ताकीद दिली.इथून कधी एकदा बाहेर पडतो असे झाले होते.
तेवढ्यात बाजूच्याच टेबलवर एक झकपक कपड्यातले कुटुम्ब येऊन बसले.पाहतो तर तो माणूस माझ्या कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी होता. मला पाहिल्याबरोबर तो उठून आमच्या टेबलजवळ आला. एकतर हा गडी चक्क ऊंची सुटात होता. त्याच्या मागोमाग आलेली त्याची पत्नी बऱ्यापैकी 'रंगभूषित' व ऊंची, रेशमी साडीत होती! त्याने आमची ओळख करून दिल्यावर तिने माझ्या पत्नीच्या साडीकडे असा काही 'खास' बायकी कटाक्ष टाकला की जो माझी पत्नी जन्मभर विसरणार नाही (व मी त्याचा सूट विसरणे शक्य नाही.)
ती मंडळी कुठल्याशा लग्न-समारंभाला हजर राहून, तिथे नीट जेवण न झाल्याने या हॉटेलात येवून टपकली होती.नतर आणखी काही तुच्छ कटाक्ष झेलून आमच्या छोकऱ्याला अक्षरशः उचलून आम्ही तिथून पळ काढला.
आणखी कोणी भेटू नये म्हणून सऱळ रिक्षा करून घरी आलो.