संगणक सूक्त ३

क्लिक क्लिक बीप बीप
आकाशाहून अथांग
अवकाशाहून अनंत
या मनापासून
त्या मनापर्यंत
या कानापासून
त्या कानापर्यंत
एन्डलेस, इन्फायनाईट
महाजालाचे कण टिप


क्लिक क्लिक बीप बीप
एसेमेसच्या मंत्रातून
ई-मेलच्या तंत्रातून
ब्रॉडबँड स्रोतांतून
स्रवणाऱ्या
ध्रुवांमधल्या अंतरातून
धावणाऱ्या
ज्ञानसंकेतांच्या मर्मस्थळांचे
रंग शिंप


क्लिक क्लिक आणि सेव्ह
सिलिकॉन ह्रदयी जपून ठेव
तुझ्या-माझ्या पर्सनल संवादाचे
विश्वात्मक व्हर्शन
जे ऑटोअपडेट होत राहील
लाईफटाईम कनेक्टिव्हिटीने
सायबरखिंडीवाटे चालणाऱ्या
सनातन संवादकार्यातून !


- अमोल