रहाटगाडगे

रहाटगाडगे

कधी कधी माझीहि होते तलखी,
वाटते,आकण्ठ पिऊन टाकावा गारवा.
घटाघटा आवाज निघेपर्यन्त,
गळ्याचा मणी खालीवर करावा.

हवाहवासा वाटतो रश्शीचा विळखा,
गच्च आवळून घ्यायचे स्वत:ला.

अलगद उतरण्डीवर घसरायचे,
डुबक्या मारायच्या मनसोक्त.
भरभरून डचमळायचे,
शिन्तोडे मिचकावत डुलायचे.
पोटुशा बाईसारखे जड होईपर्यन्त,
हेलकाण्डत, भेलकाण्डत, मुरडायचे.

खाली पाहिल्यावर भोवळ यावी,
इतके वर वर चढायचे.

पुन्हा रिते होण्याकरता.
पहायचे आपलेच ओघळ,
जमिनीत शिरून खोलवर,
दिसेनासे होईपर्यन्त.

बापू.