पंतांची पंच्याहत्तरी

महाराष्ट्राला महान पंतपरंपरा आहे!


आर्या म्हटली की मोरोपंत


इतिहास म्हणजे दादोजीपंत


राजकारण म्हणजे मनोहरपंत आणि


रंगभूमी म्हणजे प्रभाकरपंत!


आज 'पंत' म्हणून नाट्यक्षेत्रात ओळखल्या जाणाऱ्या प्रभाकर पणशीकर यांच्या वयाची पंचाहत्तर वर्षे आज पूर्ण होत आहेत. जवळ जवळ पन्नास वर्षे रंगभूमीची सेवा पंतांनी केली आहे.


मी त्यांना सर्वप्रथम पाहिले ते 'अश्रूंची झाली फुले' मध्ये प्राध्यापक विद्यानंदांच्या भूमिकेत. प्रभाकर पणशीकर आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा शेवटचा प्रवेश केवळ अविस्मरणीय आहे. अनेक नाटके अनेक संचात सादर होतात. पण 'अश्रूंची' म्हणजे पंत, डॉ. आणि चित्तरंजन. याच दोघांचा जबरदस्त मुकाबला, हुकमी आवाज आणि जबरदस्त संवादफेक पाहायला-ऐकायला मिळाली ती कानेट्करांच्याच 'रायगडाला जेव्हा जाग येते' मध्ये. मराठ्यांच्या सम्राटाच्या करूण किंकाळ्या आणि दयायाचना ऐकायला आसुसलेला मोगल पातशाह आणि त्याला ते समाधान कदापी न मिळू देणारा छत्रपती साकार करावेत ते यांनीच.


पंतांची अशीच एक खास भूमिका बघायला ती अनिल बर्वे यांच्या 'थँक्यू मिस्टर ग्लॅड' मध्ये. या भूमिकेत पंतांनी जणू अंदमानचा बारीबाबा साकार केला होता. ही भूमिका इतकी प्रभावी ठरली की उचलायचा मोह हिंदी चित्रपट सृष्टीला आवरला नाही. पुढे एका चित्रपटात प्राण ने हुबेहूब असाच तुरुंगाधिकारी एका हिंदी चित्रपटात साकार केला.


आपल्या कारकीर्दीचा कळस ठरेल अशी भूमिका पंतांनी केली ती साहेबांच्या 'तो मी नव्हेच' मधील लखोबाची. इतकी वेगवेगळी परस्परभीन्न व्यक्तिमत्त्वे एकसलग सादर करणे हे रंगमंचावरील चमत्कार आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.


अशा या बहुगुणी अभिनयसम्राटाला त्याच्या पंचाहत्तरीनिमित्त मानाचा मुजरा.