कोण मी?

कोण मी ?


 


तुला मी जसा, ना, तसा दुसऱ्याला;
मला 'मी'च वाटे कुणी दूसरा ।
किती नावे तुम्ही दिली कातडीला,
परी फिरतो अंतरी दूसरा ॥


क्षितिजांपल्याडावरी हा प्रवास,
चालतो मागुनी सावली भास्करां ।
'दिशा ना नकाशा' जणू या प्रवासी,
प्रवासी कुणी, चालतो दूसरा ॥


माथ्यावरी पाप पुण्यांची मापे,
कधी दुःख चेहरा कधी हासरा ।
तयाचे मला रे नको श्रेय-दोष;
ओढतो-सोडतो बंध नभी दूसरा ॥


असे ठाव मजला जायचे आहे अंती,
त्या मोक्षी, जगाचा धनी जो खरा ।
अशा सर्वश्रेष्ठावरी लुब्ध व्हावे,
परी 'सर्व' माझे कुणी दूसरा ॥


इतुक्याचसाठी कणा वकलेला,
उभा मी असा जोडुनिया करा ।
अंतरी गाठ आहे, सोडण्या श्वास वाहे,
'कोण मी?' प्रश्न नाही मनी दूसरा ॥