दाटलेल्या पावसाचे...

अंतरी पेटता वणवा उन्हाचा
ह्या धरेला शाप सारे सोसण्याचा
नकळतांना सोसण्याचे फूल झाले
रेशमी धारात जेव्हा सूर आले


वाकुनी आभाळ होते थांबलेले
अन धरेच्या पापणीशी पूर ओले
पाहुनी प्रीतीत विरह सोसताना
पाणियाचे थेंब काही पूल झाले


बंध एकांतात थोडे सैल झाले
तृप्तीचे हुंकार मात्र वाफ झाले
रेशमी धारात जेव्हा सूर आले
दाटलेल्या पावसाचे गीत झाले