नृत्यसमारंभाबद्दल एक परखड लेख

अलीकडे प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठाकांक्षी लोकांच्या चालीरीतींबद्दल इतके परखड लेखन झालेले वाचले नव्हते. त्यांना समजून घेण्याची किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षकरण्याचीच रीत आहे की काय असे वाटत असताना हा लेख वाचनात आला. तुम्हीही वाचा आणि प्रतिक्रिया लिहा.



कलेचं वेड नावाचं फॅड
ले. संपदा जोगळेकर कुळकर्णी
लोकसत्तेतील मूळ लेख येथे आहे. : कलेचं वेड नांवाचं फॅड


गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा ॥धृ॥


ही प्रार्थना वर्षानुवर्षे शिष्यमंडळी म्हणत आली आहेत. कधी अगदी याच शब्दात, कधी वेगळ्या शब्दांत, तर कधी कृतीतून. परंतु गुरुकुल पद्धतीची शिक्षणपद्धती संपुष्टात आल्यावर मात्र अगदी शब्दोशब्दी गुरूशिष्य परंपरा केवळ कलाक्षेत्रात आणि तेही अगदी पारंपरिक कलाक्षेत्रात म्हणजे नृत्य, संगीत, वादनकला या क्षेत्रात उरली आहे. रंगभूमीतल्या नाटक या क्षेत्रात मात्र तितकीशी पारंपरिकता दिसत नाही. म्हणजे वर्षानुवर्षे एकाच गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आणि मग सादरीकरण हा क्रम या क्षेत्रात नसतो. संधी आली की गुण दाखवायचे, एखादा आदर्श डोळ्यापुढे असतो तशा शैलीच्या अनुकरणाचा प्रयत्न करायचा एवढाच. हा! नाही म्हणायला तसे गॉडफादरगॉडमदर असतात, पण पारंपरिक अर्थाने गुरू नाही. गायनवादननृत्यातली घराणेशाही इथे नाही. आता कार्यशाळा वर्कशॉप्स, शिबीर यामुळे थोडं प्रशिक्षणाचं स्वरूप या नाट्यचित्रपट क्षेत्रात येत चाललं आहे. किंवा एन. एस. डी. टी., मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ यांनी प्रशिक्षण अभ्यासक्रम ठेवल्यामुळे रीतसर शिकणं व मग सादरीकरण हे स्वरूप येतंय, पण तरीही वर्षानुवर्षांची पारंपरिकता, घराणी नाट्यक्षेत्रात नाहीत. त्यामुळे कलाविष्काराचे प्रकार, स्वरूप, संधी याबाबत पारंपरिक कला नाट्यचित्रपटापासून खूप वेगळ्या ठरतात.


यातल्या वेगळेपणामुळेच उच्चवर्गीयांबरोबरीने आता उच्च मध्यमवर्ग व मध्यमवर्गातली घरं या घराणेशाहीकडे जास्त प्रमाणात वळू लागली आहेत असं वाटतं. एकतर थोर परंपरांची ओढ, सामाजिक प्रतिष्ठेस पात्र, फार परावलंबित्व नसणं आणि उच्चकलाविभूषणपदाची आसत्ती या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक घरात एक मुलगा किंवा मुलगी छंद, कला या निमित्ताने गायनवादननृत्यात प्रवीण होताना दिसू लागले आहेत.


अलीकडेच एका कार्यक्रमाचं बोलावणं आलं होतं. एका ओळखीच्यातल्या मुलींचा 'अरंगेत्रम्' सोहळा होता. तिचं वय वर्षं १७/१८. भरतनाट्यम् नृत्यप्रकारात एखाद्या प्रवीण नृत्यकलावंतांनी प्रथम सादरीकरण करण्याचा गुरूकडून जणू परवाना आणि आशीर्वाद मिळवण्याचा हा सोहळा. हल्ली एक घराआड मुली / मुलं 'अरंगेत्रम्' करताना पाहायला मिळतं. खरंच खूप कौतुक वाटतं त्या शिष्यांचं, त्यांच्या गुरूंचं आणि शिष्यांच्या आईवडिलांचंही. कौतुक अशासाठी वाटतं की आज पोटार्थी शिक्षणाबरोबरच कलाकौशल्याचीही जाणीव मुळात पालकांत आहे आणि म्हणून मुलांमध्येही. निखळ आनंदासाठी वर्षानुवर्षांची आराधना करणं ही सोपी गोष्ट नाही. २०२५ वर्षांपूर्वी एखादाच असा सोहळा कानावर यायचा, आता एखादंच घर असेल जे यात पडत नाही. या वाढत्या कलाप्रेमाची आणखीही वेगळी बाजू आहे, ज्याचा विचार करावासा वाटतो.


पं. भीमसेन जोशी, पं. वझेबुवा, गानतपस्वी गोविंदराव टेंबे, हार्मओनियमकुशल गोविंदराव पटवर्धन, गंगुबाई हनगल, मोगुताई कुर्डीकर, किशोरीताई यांच्या काळी कलेचा स्रोत होता, तो वाहताही होता. वेगवेगळी प्रायोगिकता, कलाचातुर्य यांचा आनंद प्रेक्षक श्रोते मंडळी घेत होती. नृत्यातले डॉ. पुरू दधिचजी, कनक रेळे, बिरजू महाराज, डॉ. रोहिणी भाटे यांच्याही कार्यक्रमांना जनसमुदाय लोटत असे. अगदी प्रादेशिक परिसीमा ओलांडून रसिकश्रोते गर्दी करायचे, परंतु त्यांच्यापैकी एकाही कलाकाराने सादरीकरणातला परवाना स्वत एखादा कार्यक्रम प्रायोजित करून मिळवला नव्हता. गुरूच्या मागे तानपुरा धरून धरून, गुरूच्या कार्यक्रमांत मदतीची अनेक वर्षे घालवून कधी कोणाला त्यांच्यातलं कौशल्य दिसलं आणि कलासादरीकरणाची प्रथम संधी, गुणांच्या शोधात त्यांच्यापर्यंत पोहोचली. सोहळ्याचं अवडंबर न माजवता तो गुरू शिष्याला आशीर्वाद देऊन एक उत्तम कलावंत समाजास देत होता. या प्रकारामुळे कस्तुरीमृगाला शोधत रसिक त्या कलावंतापर्यंत पोहोचत असत. कलाकारांनी कलेत, खरं उतरणं म्हणतात ते त्या पद्धतीत होतं. जे पाहण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे त्याच्या शोध घेण्यातून रसिकांना ही महान मंडळी लाभली. मी शिकलोय, माझी कला पाहण्याऐकण्यासारखी आहे, हे लोकांवर लादून चालत नाही.


किती वर्षात डान्सर होता येईल, विशारद, प्रावीण्याचा किती वर्षांचा कोर्स आहे, असं विचारणारे पालक गणित मांडूनच पाल्याला शिकवतात. जरा कुठे पाल्य बरं नाचू लागला की हे पालक 'अरंगेत्रम' किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उताविळ होतात. एक अथवा दोन मुलं असल्यामुळे पालनपोषणाची उत्तम क्षमता असलेले पालक हसत मुलांच्या कलानैपुण्यासाठी की त्याच्या प्रदर्शनासाठी?२०/३० हजार रुपये खर्च करतात. अत्यंत आकर्षक निमंत्रणपत्रिका, पाल्याचे सुंदरसुंदर खास फोटोसेशन केलेले फोटो गुरूचा 'यथोचित' मानपान यावर कार्यक्रमाची बरीचशी मदार असते. पुढे ते पाल्य कोणत्याही कलामहोत्सवात तोच कलाप्रवाह घेऊन पुढे सरसावलेला दिसत नाही. प्रचंड खर्च करून बर्‍याचदा गुरूचा आशीर्वाद विकत घेण्याचं हे गोंडस कार्यक्रम स्वरूप कोणी याला अरंगेत्रम् म्हणतं, कोणी गंडाबंधन म्हणतं. तांत्रिकतेत, व्याख्येत फरक असेल कदाचित, पण गोंडसपणा तोच. बरेचदा दिसून येतं 'किती वर्ष' शिक्षण घेतलं, या आकड्यांनीच दबून जायला होतं. पण 'काय' शिक्षण घेतलं, याची पुरचुंडी फार छोटी दिसते. म्हणून मग अशी छोटी पुरचुंडी पहिल्या कार्यक्रमात संपून जाते. पुन्हा कुठे सिद्ध करायला काही उरलेलं नसतं. लग्न, मुंज, साखरपुडा हा जसा क्षमतेनुसार दिखाऊ सोहळा, तसाच आता हा 'कलाव्रतबंधन सोहळा' म्हणायचा. आणि विद्यादानाचे जिथे दीप नसून क्लासेस् वर क्लासेस् चे कारखाने आहेत, तिथे अशी अनेक 'प्रॉडक्ट्स्' तयार होतात. गुरूम्हणवणार्‍याचही फावतं, शिष्याला पावतं, पण रसिकांना किती भावतं, हा प्रश्न मात्र उरतो.


बरं, अशा कार्यक्रमासाठी बोलावलेले आमंत्रित प्रेक्षक असतात बहुतांशी नातेवाईक आणि ओळखीची मंडळी. जी त्या क्षेत्राची चाहती असतीलच, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे तो एकूण ९० टकके कौतुकसोहळाच ठरतो. कलेतली खोली, प्रायोगिकता, वेगळेपण याची बहुतांशी मंडळींना काही पडलेली नसते. उच्चभ्रू मंडळींमध्ये तर तो इतर सोहळ्याप्रमाणेच मिरवण्याचाच सोहळा असतो. सुगंधी परफ्युमचा भपका, उंची भारीभारी वस्त्रांची येजा. व्हीडीओ शूटिंग, फोटोग्राफ याचा दिमाखदार समारंभ... वास्तविक ही गोष्ट वैयत्तिक क्षमता, सुबत्ता आणि अभिरुची यावर अवलंबून असते. ज्याला परवडतं त्याने ते कराव. इतरांना ते का खटकावं? पण जेव्हा सादरीकरण कौशल्य कमी आणि 'साजरीकरण' जास्त होत जातं, तेव्हा जीव तळमळतो.


थोडंसं विषयांतर करून सांगावंसं वाटतं की रायगडावर जे 'छत्रपती शिवरायांचं' सिंहासन आहे, ते आहे प्रदर्शनासाठी. इतिहासाची महती त्या एका गोष्टीवरून लोकांना पटावी, अनुभवता यावी, यासाठी ते ठेवण्यात आलं आहे. सुज्ञाला ते रिकामं सिंहासन पाहून त्याला नमस्कार करावासा वाटतो. त्यावर स्वत बसावंसं वाटत नाही. हा त्या सिंहासनाचा आदर आहे. योग्यतेला प्रणाम आहे. त्या सिंहासनावर बसण्यासाठी कर्तृत्वाने मिळवलेला अधिकार आवश्यक आहे, हे सुज्ञांना सांगावंही लागत नाही. हाच विचार कलाविष्कारासाठी उभारलेल्या रंगभूमीबाबत व्हायला हवा. कर्तृत्वाने मिळवलेला अधिकार, साधनेतून मिळवलेली योग्यता याचं प्रदर्शन, सादरीकरण ९९ टकके व्हायला हवं. कलेबाबतची अशी सिंहासनंही साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. कारण ही वस्तू नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. या सिंहासनावर बसण्याची योग्यता या कलाप्रवाहातल्या प्रत्येक कलाकाराने ओळखायला शिकलं पाहिजे. कलेबाबत तरी नुसतं पैशाचं अधिपत्य दाखवण्यात वेळ घालवू नये.


एका राजदरबारातल्या जवाहिर्‍यांनी एक दागिना बनवून आणला. राजाने तो दागिना चहुबाजूने पाहिला. त्याबाबत त्या जवाहिर्‍याशी बोलताना राजाने विचारलं की, याचं वजन किती आहे? त्यावर अत्यंत खूश होऊन जवाहिर्‍याने उत्तर दिलं, २० किलो महाराज. याला बनवण्यासाठी किती वेळ लागला? पाच वर्षं महाराज. त्यावर महाराज म्हणतात की, अत्यंत सुंदर दिसणार्‍या या दागिन्याला मी फत्त खजिन्यात ठेवू शकतो, पण परिधान करू शकत नाही. तेव्हा माझ्या दृष्टीने हा सर्वोत्कृष्ट दागिना नाही. कौतुकाचा भडिमार होणार या अपेक्षेने आलेल्या त्या जवाहिर्‍याला राजाचं हे वत्तव्य ऐकून धक्काच बसला. त्याने खुलासा विचारल्यावर महाराज म्हणाले की, जी वस्तू ज्याच्यासाठी जन्मली पाहिजे तो तिला लायक नसेल तर त्याची किंमत शून्य आहे. रोज २० किलो वजन अंगावर बाळगून त्या दागिन्यातून सतत जडत्वच जाणवत असेल तर त्याचा उपयोग काय ? असंच काहीसं या कौतुक सोहळ्यांबाबत. कलाकृती म्हणून त्याचं अस्तित्व खुलत नसेल, तर केवळ भपकयाचं वजन रसिक पेलू शकत नाही व इच्छित तर त्याहून नाही.


पण ही विधानं पालकांनी विचाराला प्रवृत्त व्हावं यासाठी आहेत. जे होतंय त्यातून 'नवनीत' निघतच नाही, असा ठपका नाही. पण पैशाला पासरी अशा या 'सेल्फ मार्केटिंग'नी आयुष्यात काय साधतं, हा विचार होणं आवश्यक आहे. कारण या कार्यक्रमांतून जे खणखणीत नाणं आहे, तेच पुढे वाजतं गाजतं. कलेसारख्या पवित्र क्षेत्रात तरी किडके गहू खपत नाहीत. मार्केटिंगमध्ये कमी पडता कामा नाही हे जरी खरं असलं तरी प्रॉडकटची गॅरेंटी ही त्याच्या अंगभूत गुणातच असते. निदान कलाक्षेत्राततरी. त्यामुळे कलेचं वेड हे स्टेटस् सिंबॉल होत चाललंय. त्यामुळे फॅड नावाच्या झाडाला पोषक वातावरण मिळतंय. आर्थिक सुबत्तेचा खर्‍या कलेला उपयोग होतो, तेव्हा खूप आशादायी चित्र वाटतं, पण सोहळ्याच्या बाह्य देखाव्यात कला कोंबली तर केविलवाणी दिसते.