पावसालाही मन असते
पावसालाही जाण असते
आपल्या रेशमी नात्याची
पावसालाही आण असते
कधी त्याचं रिमझिमणं;
कधी आवेगानं बरसणं
माणसासारखंच त्याचंही
मन बेभान असते
अवचित येऊन भेटणं;
भलत्याच वेळी छेडणं
मोहक गुलाबी स्वप्नांची
त्याच्याही मनी रास असते
पाऊसही बनतो हळूवार कधी;
कधी...... सुसाट वारा
कधी त्याचं झिमझिमणं
कधी...... टपोर गारा
हेवेदावे, घातपात...
माणसापासूनच शिकत जातो;
माणसासारखाच पाऊसही मग
उद्ध्वस्त करून जातो !