निसर्ग आणि शंकर

शंकर - निसर्गाचेच एक प्रतिकात्मक रूप.


कुठेही घडेल पुन: पुन: `जुलै सव्वीस'
कारण निसर्गाचाच होऊ लागलाय जीव `कासावीस'
    हे वृक्षवल्ली,नद्या, वातावरण आणि अवघी सृष्टी,
    भव्य असे रूप `शिवाचे' पडते का आपुल्या दृष्टी?


जंगले,तिवराची झुडुपे, वेली अन लता,
याच तर भागीरथाला रोखणा-या `गंगाधराच्या' जटा,
     वनांचे आच्छादन करी पूरनियंत्रण, थोपवून भूमीचे क्षरण,
     म्हणूनच व्हावे सर्वत्र आता व्यापक असे वनसंवर्धन
.


वातावरणाचे `कवच-कुंडल'
किती पचवेल प्रदूषणाचे `हलाहल'?
     मानवाच्या हव्यासाला नसेच जणू अंत,
     पृथ्वीच्या रक्षणास तत्पर तरीही हा `
नीलकंठ'


ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग,
चराचरांसाठी न ठरो ही शेवटची वॉर्निंग!
    कॅटरिनासम उठेल जेव्हा रौद्रभीषण `तांडव',
     स्वीकारेल का याची जबाबदारी आजचा मानव?


पृथ्वीचा तो एकच उपग्रह,
भरती-ओहोटीचा तोच कारक.
     कालगणनेसाठीही ठरतो उपयुक्त,
    भालचंद्र रूपात झालाय व्यक्त.


`सत्यम शिवम सुंदरम' असे हे निसर्गाचे प्रतिक,
वाटोत जरी कुणाला विचार हे नास्तिक,
भालचंद्र, गंगाधर, त्रिनेत्र आणि
नीलकंठ,
प्रत्येकाचा अर्थ पहा कसा वैश्विक,


खरी शिवभक्ती म्हणजे निसर्गाचे रक्षण,
समजून घेऊ सृष्टीचे हे सम्यक दर्शन.