शेवटची हाक - १

"नीलू, मला उद्या एका मिटींगसाठी दिल्लीला जायचे आहे, तुला चलायचं असेल तर तूही चल. तसंही तुला तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायला जमलं नव्हतं ना.. मग याच निमित्ताने तिला भेटून पोटभर गप्पा मारता येतील तुला. "
रितेशचं हे बोलणं ऐकून मनात एक अनामिक उत्साह संचारला. माझी सगळ्यात आवडती मैत्रिण-अर्पिता. कधी एकदा तिला भेटते असं झालं मला. तिच्या नवऱ्याबद्दल अधिक जाणून घेण्याची जबरदस्त इच्छा निर्माण झाली. ३ महिन्यापुर्वी जेव्हा तिच्या लग्नाचं आमंत्रण आलं तेव्हा माझा अजिबात विश्वासच बसला नव्हता. अर्पिता लग्न करतेय?! परत परत नाव वाचून आणि फोनवर तिच्याशी बोलून खातरजमा करून घेतली की ती लग्न करते आहे.. अर्पिता.. जिच्यामते लग्न म्हणजे गुलामीचं दुसरं नाव.. एक असा पिंजरा की ज्यात अडकलेली स्त्री म्हणजे एक पंख छाटून टाकलेला पक्षी जो लाचारीचं जीणं जगून कुढत कुढतच मरतो !

अर्पिताला मी बालपणापासून ओळखते. एक वेगळ्याच प्रकारची मुलगी होती ती. मेरठच्या माझ्या घराला लागूनच होतं तिचं घर. आमच्या दोघींचं खूप पटायचं...सोबतच खेळायचो, शाळेत जायचो, गच्चीत लपून बसून तासतासभर गप्पा मारायचो.. तिच्या आईवडलांनी फारकत घेतली होती आणि ती वडलांसोबत राहायची. शाळा संपल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला ती दिल्लीला हॉस्टेलमध्ये राहायला गेली तरीही अधूनमधून पत्रातून तर कधी फोनवर का होईना आमच्या गप्पा होत राहिल्या आणि मैत्री जपली गेली आमची.

तीन वर्षापुर्वी मी अर्पिताला भेटले होते तेव्हा आम्ही २-३ दिवस सोबतच घालवले होते. तेव्हा तिच्यात झालेले बदल पाहून मी अगदी आश्चर्यचकित होऊन गेले होते. लहानपणची ती हसरी, खट्याळ, बडबडी अर्पिता आता पार बदलली होती. जुन्या अर्पिताचा लवलेशही सापडायला जाता सापडत नव्हता. तिची जागा एका आधुनिक अर्पिताने घेतली होती जी अगदी टॉमबॉय प्रकारातली होती. स्त्रीसुलभ लाज, कोमल स्वभाव तर दूरदूरपर्यंत कुठेच दिसत नव्हता.. दिसत होती फक्त आपल्याच हिंमतीवर सगळं आयुष्य जगण्याचा दावा करणारी, स्वतंत्र, स्वच्छंद, स्वतःच्या पायावर उभी, किंचित जास्तच अभिमानी आणि इतर मुलींपेक्षा स्वतःला वेगळं आणि उच्च दर्जाची समजणारी अशी काहीशी अर्पिता.. लग्न करून घरदार सांभाळणे म्हणजे फुटकळ काम असं समजायला लागली होती ती. "नाही बाई, माझ्याकडून नाही होणार जन्मभर कुठल्या पुरुषाची गुलामी करणं.. मी माझ्या आयुष्यात खुश आहे आणि यात कोणाचा हस्तक्षेप मला खपणार नाही.." असं ती मला म्हणाली होती.

अर्पिता नेहमी म्हणायची," भारतातल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. नेहमी इतरांच्या आयुष्यात डोकावण्याची घाणेरडी सवय असते या लोकांना." माझ्यासमोर तिचा घरमालक एकदा चुकून तिला विचारून बसला,"बाळ, या २-३ दिवसात दिसली नाहीस. कुठे बाहेरगावी गेली होतीस का?" बस्स ! अर्पिताच्या भुवया लगेच वाकड्या झाल्या. "बघितलंस ना? हे लोकं कशाप्रकारे माझ्या आयुष्यात नाक खुपसतात ते? मी कधीही येईन.. कधीही जाईन.. जगेन किंवा मरेन.. यांना काय देणंघेणं असायची गरज आहे?.." एवढ्याशा प्रश्नाला ती तिच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ मानून मोकळी झाली होती !

अर्पिताचा हा अवतार बघितलेला असल्याने या बाईसाहेब लग्नाच्या फंद्यात कशा काय पडल्या हे जाणून घ्यायला मी अगदी अतोनात अधीर झाले होते. तो कोण महान पुरूष आहे, ज्याचा  हस्तक्षेप आयुष्यभरासाठी मानायला अर्पिता तयार झाली? तीपण माझ्याचसारखी घरातली लहानमोठी कामं बघत असेल का? याच विचारात मी इतकी गुरफटले की मला कळलंच नाही कधी आवश्यक सामानाची बांधाबांध करून करून दिल्लीला जायला तयारही झाले ते !

पूर्ण प्रवासात मी रितेशला अर्पिताबद्दल सांगत होते आणि त्याला जे ऐकायला मिळत होतं त्याबद्दल त्याला आश्चर्य वाटत होतं. शेवटी एकदाचे आम्ही अर्पिताच्या घरी जाऊन पोहोचलो आणि परत एकदा तिच्या बदललेल्या रुपाने मला धक्का दिला.

क्रमशः