कर्ज - २

होताहोता माझ्या लग्नाला पाच वर्षं होऊन गेली. एक मुलगा आणि एक मुलगी यांनी आमचा संसार डवरला. लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी शुभेच्छा द्यायला ताई घरी आल्या होत्या तेव्हा मी त्यांना विचारलं,"तुमच्या मित्राने तर लग्नही करून टाकलं.. आता दोन मुलांचे बाबाही झाले आहेत.. तुमचे काय बेत आहेत लग्नाबद्दल?"
त्या अंमळ हसल्या आणि अगदी सहजपणे म्हणाल्या,"लग्नाचं काय आहे? त्या तर योगायोगाच्या गोष्टी असतात.."
झाऽऽलं ! माझ्या सगळ्या शंका खऱ्या ठरत आहेत असं मला वाटायला लागलं. एका वर्षाने त्यांचे वडील वारले आणि त्यांच्या लग्न होण्याची सगळीच चिन्हं संपली. एकदा असंच संध्याकाळी जेव्हा हे खूप उशिरापर्यंत घरी आले नाहीत तेव्हा मी स्वतःच त्यांच्या बंगल्यावर जायचा निर्णय घेतला.

दरवाजा त्यांनीच उघडला."अरेच्चा तू इथे कशी? ये ना आत ये.."
मी काहिशा तटकतोडपणेच विचारलं,"हे इथे आले होते.. अजूऽन घरी आले नाहीत."
"बाई गं ! काय सांगतेस काय?" त्यांना जबरदस्त आश्चर्य वाटल्याचं स्पष्ट दिसत होतं,"आकाश इथून जाऊन तर बराच वेळ झाला. कुठे गेला असेल?"
काहिशी खजील होत यांची बाजू सावरण्याच्या हेतूने मी म्हणाले,"काही काम निघालं असेल बहुदा म्हणून गेले असतील कुठे.. बरं ठीके.. मी निघते आता.."
"अगं असं कसं जाशील? पहिल्यांदा तर माझ्याकडे आली आहेस.." असं म्हणत माझा हात पकडून मला आत घेतलं होतं. त्यांच्याचकडून कळलं की त्यांना एक लहान बहिण होती. १५-१६ वर्षाची असतानाच एका अपघातात ती वारली होती. तिचं नाव निक्की होतं. त्या दिवशी मला आवडलेलं नसूनही त्यांनी मला त्यांचं छोटी बहिण मानून टाकलं होतं आणि मला निक्की म्हणायला सुरूवात केली होती.

त्यानंतर त्यांच्या बंगल्यावर माझं येणंजाणं सुरू झालं. मनात एकच सुप्त इच्छा होती.. कध्धी ना कध्धी तरी तर मला संधी मिळेलच.... तसंही खोटेपणा जास्त दिवस तग धरू शकत नाही. पण २५ वर्षं होऊन गेली तरी मला एकही संधी मिळाली नाही. माझी शंका अगदीच बिनबुडाची सिद्ध झाली होती. मीही मग अगदी मनापासून त्यांना 'ताई' मानलं. माझ्या मुलीचं लग्न ठरण्याच्या बेतात होतं, पण माझ्याकडे पुरेसे पैसेच नव्हते. चांगलं स्थळ हातातून निसटतं की काय वाटत होतं. त्यावेळेस ताईंनी यांना २ लाख रुपाये कर्जाऊ दिले. मुलाला नोकरी लागताच हळूहळू दोघं मिळून कर्ज फेडून टाकतील असे एकंदर बेत होते.

दोन वर्षं होऊन गेली. मुलाला नोकरीही लागली. ताईंकडे इतक्यांदा येणंजाणं व्हायचं की आता औपचारिकपणा नावालादेखील उरला नव्हता. ताईंच्या नोकराने सांगितले की त्या त्यांच्या खोलीत आहेत. मी नेहमीप्रमाणेच थेट त्यांच्या खोलीत जाऊन धडकले होते. बघितलं तर पलंगावर बसून त्या काहितरी वाचत बसल्या होत्या. त्यांची डायरी त्यांच्याकडून काढून घेत मी म्हणाले,"मलापण तर पाहू देत की माझ्या ताई काय वाचत आहेत ते.."
"नाही.." त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी म्हणाले,"एकीकडे मला स्वतःची छोटी बहिणही म्हणता आणि माझ्याचपासून गोष्टी लपवता.. छान !"
मी डायरी बघायला सुरूवात केली. खूपच सुंदर कविता होत्या त्या डायरीत. एकेक शब्द जणू काही थेट काळजातून उतरला होता त्या डायरीत. "वाऽह ताई.. खूपच सुंदर. काय अप्रतिम कविता आहेत.." असं म्हणत मी ते पान उलटलं जे कदाचित मी उलटायला नको होतं. डायरीच्या पहिल्या पानावर सुंदर अक्षरात लिहिलेलं होतं - "माझ्या प्रिय आकाशसाठी" !

माझ्या अंगांगाची लाहीलाही झाली. घोर आगीत जळत असल्याचा भास झाला मला. इतका मोठा धोका? इतकी मोठी अवहेलना? एकही क्षण आता तिथे थांबणं मला शक्य उरलं नव्हतं. डायरी भिरकावून टाकून मी तिथून ताडदिशी निघाले. त्यांनी माझा हात पकडला,"निक्की, माझं थोडंसं ऐक तर खरं.. "
"मला आता काहीच ऐकायचं नाहीये आणि हो.. पक्कं ध्यानात असू द्या. मी तुमची निक्की नाही.. मला त्या नावाने अजिबात हाक मारू नका.."
जर रागाला नीट व्यक्त करता आलं नाही तर तो अश्रूंच्या रुपाने बाहेर येतो म्हणतात, तेच माझ्याबद्दल होत होतं. मी त्यांची कर्जदार होते.. त्यांच्याहून छोटी होते..त्यांच्यावर राग कसा काय काढू शकणार होते? माझ्या डोळ्यात असहायतेचे अश्रू उभे राहिले.

क्रमशः