कर्ज - ३

मला बळेच पलंगावर बसवून घेत त्या म्हणाल्या,"निक्की, तू एका क्षणासाठीही तुझ्या आकाशला विभागून घ्यायला तयार झाली नाहीस.. मी तर अख्खी २५ वर्षं तुझ्यासोबत.."
"बस्स ताई बस्स..." मी संतापाने थरथरत ओरडले,"इतकंच जर प्रेम होतं तुमचं त्यांच्यावर तर लग्नच का नाही केलंत त्यांच्याशी?"
उत्तर मिळालं. खूपच करूण शब्द होते ते.
"केलं असतं.. पण भाग्याचा खेळ दुसरं काय. आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये ३ वर्षं सोबतच शिकलो. हळूहळू माझं मन जडलं त्याच्यावर. ही डायरीही त्याच काळात मी लिहायला सुरूवात केली होती. आकाशला हे सांगायचा कधी धीर मात्र झाला नाही. पुढच्या शिक्षणासाठी नंतर मी शहरात गेले आणि मग कळलं की त्याचं लग्न होणार आहे... तुझ्याशी. मी वेडीच झाले. मनात आलं की सगळं सगळं आकाशला सांगून टाकावं.. सांगून टाकावं की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण एक शंका सारखीसारखी मनात येत होती की हे तर काही जरूरी नाही की त्याचंही माझ्यावर प्रेम असेलच.. आणि त्या मुलीचा काय दोष जिने आता आकाशला तिच्या नवऱ्याच्या रुपात बघत स्वप्नही बघायला सुरूवात केली असेल. तिच्या स्वप्नांना मूठमाती कशी काय देऊ शकणार होते मी? मी गप्प बसले. मूकपणे त्याला तुझं होताना पाहात राहिले. तुझ्या चेहऱ्यात मला कुठेतरी माझी निक्कीच दिसत होती. मी नाही तरी माझी छोटी बहिण तर सुखी आहे, या विचाराने मी मनावर दगड ठेवून घेतला."
शेवटचे शब्द बोलताबोलता त्या रडायला लागल्या. मी हतबुद्ध झाले होते. खरंच का इतकं प्रेम कोणी कुणावर करू शकतं? तेही संपूर्ण आयुष्यभर? मी त्यांना सावरलं आणि त्यांना 'ताई'म्हणण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही.."ताई.. म्हणजे अजून यांना..."
"नाही.. नाही..." त्या अजिबात उसंत न घेता म्हणाल्या,"त्याला अजिबात कळता कामा नये. माहित नाही त्याला काय वाटेल. स्वतःला दोषी समजून घ्यायचा नसता तो. घेतलेले सगळे निर्णय हे फक्त माझेच होते आणि आहेत. मी गुन्हेगार आहे तर ती फक्त तुझीच.. जी काही सजा द्यायची ती देऊ शकतेस तू मला.."
त्या रडत असताना त्यांना तसंच एकटं सोडून मी घरी निघून आले. ३-४ दिवस मला काहीच कळेनासं झालं होतं की हे नक्की काय चाललं आहे आसपास ते. मग सगळं पुन्हा पुर्ववत् झालं. काही दिवसांनी मी यांना चिंतातूर पाहिलं तर कळलं की ताईंनी त्यांच्या वडलांच्या नावाने एक खूप मोठं सर्व सोयींनी सुसज्ज असं हॉस्पिटल बनवायचं मनावर घेतलं आहे.
"वाह ! किती छान विचार आहे. यात चिंता ती कसली?" मी अगदी आश्चर्याने विचारलं.
"तुला माहिती नाही आत्ता तिची परिस्थिती खराब आहे. त्यांची फॅक्टरी तर बंदच पडायच्या मार्गावर आहे. तिने तिचे पैसे परत मागितले तर?"
यांना आलेली शंका अगदीच काही बिनबुडाची नव्हती. दुसऱ्या दिवशी ऐकलं तर ताईंना हृदयविकाराचा झटका आला होता. घरीच इलाज करणं चाललं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा दुसरा झटका आला होता.

ताईंची निक्कीच आता त्यांच्या संपत्तीची एकुलती एक वारस झाली होती ! हॉस्पिटल बनवायचं की नाही.. त्यांचं कर्ज फेडायचं की नाही.. आता हे सगळं माझ्यावर अवलंबून होतं.

यांना मी नोकरी सोडायला सांगितली. फॅक्टरीमध्ये लक्ष घालायला सांगितलं. फॅक्टरीचं पुनरुज्जीवन करवलं. हॉस्पिटल सुरू करवलं गेलं. आता हे दिवसभर त्याच कामात गुंग असायचे. ताईंच्या म्हणण्यानुसार डायरी मात्र मी जाळू शकले नाही. ती स्वतःजवळ ठेवण्याचा मोह मी आवरू शकले नाही.

एके दिवशी ती डायरी यांच्या हाती लागली. त्यांनी वाचली असेल ती, म्हणूनच तर कदाचित माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते,"अरे वाह ! माझी बायको इतकी छान कवयित्रीही आहे हे मला आजपर्यंत माहितीच नव्हतं. माझ्यावर इत्तकं प्रेम की माझ्यासाठीच्या कवितांनी अख्खी डायरीच भरवून टाकली !! आज माझ्या आनंदाला पारावारच राहिलेला नाही. मस्त मिठाई तर मिळायलाच पाहिजे यासाठी.."
मी काही म्हणणार एवढ्यात ते जाऊन फ्रिजमधून मिठाईचा डबा काढून त्यातली एक वडी हातात घेऊन मला म्हणाले,"हं.. तोंड उघड.."
"अहो ऐका तर सही माझं जरा.." मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला.
"नाही. अजिबात नाही. आज मी खूपच खुश आहे.. आधी तू तोंड उघड.."
"ही डायरी माझी नाही आहे." माझ्या तोंडून आपोआप निघून गेलं. ताईंना दिलेल्या वचनाला नाही जागू शकले मी.
यांना खूप आश्चर्य वाटलं. "तुझी नाहीये !!! मग कोणाची आहे?" ते परत पानं उलटीपालटी करून त्यात नाव मिळतं का शोधायचा प्रयत्न करायला लागले. मी त्यांना मध्येच थांबवत म्हणाले,"जिची आहे तिचं यात कुठेही नाव नाही आहे. तुम्हाला तिचं हस्ताक्षरसुद्धा नाही ओळखता येते का?"
"कोणाचं?" त्यांनी धडधडत्या हृदयाने विचारलं.
"छायाताई.." मी पूर्ण वाक्य नाही बोलू शकले. डोळे आसवांनी भरून गेले.
तेही काहीवेळ सुन्न होऊन गेले. काहीवेळ तिथेच बसून राहिले आणि मग डायरी एका बाजुला ठेवून पलंगावर जाऊन निपचित पडून राहिले.
मी त्यांच्याजवळ गेले,"ताईंनी मला नाही सांगितलं होतं तुम्हाला सांगायला. त्यांना भीती होती की तुम्ही स्वतःलाच दोषी नको ठरवून घ्यायला. सगळे निर्णय हे त्यांचे स्वतःचे होते. ही डायरी त्यांच्या कॉलेजजीवनातली आहे.. तेव्हाच त्या तुमच्यावर.."
"प्लिज.." ते एका लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडायला लागले. "आता काहीच बोलू नकोस. तुला माहिती नाही.. मी.. नाही.. नाही... अख्ख्या जगात माझ्यासारखा माणूस कोणी नसेल.. जिनी माझ्यावर इतकं निरतिशय प्रेम केलं.. पूर्ण आयुष्य ज्याच्या केवळ आठवणींवर पूर्ण आयुष्य व्यतीत केलं... हो.. हो... माझ्याच मनात .. माझ्याच मनात विचार आला होता.. क्षणभरासाठी का असेना पण माझ्याच मनात विचार आला होता.. की जर ती मरून गेली.. तर तिचं.. तिचं कर्ज..."

मी आवाक झाले होते. आज मला त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या भावांचे अर्थ कळत होते. आजवर मी देवाकडे हेच मागितलं होतं की प्रत्येक जन्मी मला नवऱ्याच्या रुपात आकाशच मिळावेत... पण आज... आज मी मनापासून प्रार्थना करत आहे की जर यांचा दुसरा जन्म होणार असेलच तर तो पूर्णपणे ताईंकरताच असावा जेणेकरून ते त्यांच्या निस्सीम प्रेमाच्या कर्जाला चुकवू शकतील.. आपल्या अपराधाचं प्रायश्चित्त करू शकतील.."

यांच्या डोळ्यातून अजूनही अश्रूंच्या अविरत धारा वहात होत्या.

मूळ कथा - कर्ज़
मूळ कथालेखक - शैलेन्द्र सिंह परिहार
स्वैर अनुवाद - वेदश्री