कायद्याच ज्ञान

                सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे कायदा पाळला पाहिजे असे मला वाटते.आता त्यात कायद्याविषयी आस्था हे कारण आहे की कायदा न पाळल्यामुळे होणाऱ्या शिक्षेची किंवा त्यामुळे होणाऱ्या नामुष्कीची भीती हे आहे हे सांगणे अवघड आहे.याबाबतीत आमच्या बाबुरावांच तत्वज्ञान जरा वेगळ आहे.ते म्हणतात कायदा गाढव आहे हे तर खरच पण तो पाळणारा त्याहून गाढव आहे.आणि कधीकधी मला तसा अनुभव येतो खरा.
            आता हेच पहाना पूर्वी रेडिओ वापऱायला परवाना लागे,जणु रेडिओ एकादे महाभयानक शस्त्र आहे,आता शस्त्रेही कोणीही बिगर परवाना वापरतो ते अलाहिदा!तर त्या काळात ३१ जानेवारीच्या आत पोस्ट ऑफिससमोरच्या रांगेत तासभर उभा राहून परवान्यासाठी दिलेल्या खास पोस्टाच्या तपकिरी रंगाच्या त्या पुस्तकावर तसाच खास शिक्का आत बसलेल्या माणसाने पंधरा रुपये घेऊन मारून दिल्यावर जग जिंकल्याच्या आनंदात मी घरी येई तेव्हा बाबुराव कुत्सित्पणे हसत माझ्याकडे बघून म्हणत 'मिळवले का एकदाचे स्वर्गाचे राज्य?अरे वेड्या तू घरी रेडिओ ऐकतोस की नाही हे पहाण्यापेक्षा खूप महत्वाची कामे पडली आहेत सरकारला "मला मात्र एकाद्या दिवशी बाबुरावच्या घरावर छापा पडला आहे आणि पोलिस त्याचा रेडिओ जप्त करून बरोबर बाबुरावलाही पकडून नेत आहेत असे दृश्य दिसायचे आणि बाबुरावचे कसे होणार याची मलाच धास्ती वाटायची.एकाद्याच्या घरात अमली द्रव्याचा साठा असला तरी त्याच्याकडून तो हलवला गेल्याची वर्दी आल्याशिवाय त्याच्या घरावर छापा टाकत नाहीत हे आत्ता आत्ता कुठे मला कळायला लागले,पण त्याबाबतीत बाबुराव तेव्हापासूनच बिन्धास्त! शेवटी एक दिवस कसे काय शासनाला बाबुरावच बरोबर आहेत हे समजले आणि रेडिओ वापरायला परवान्याची गरज नाही असा फतवा काढून ते मोकळे झाले.बाबुराव तेव्हा विजयी मुद्रेने मला म्हणाले"बघ काय सांगत होतो की नाही तुला? ' 
          आयकराच्याही बाबतीत तेच!नोकरीत असताना तर काय तो पगारातूनच कटला जायचा,पण आता सेवानिवृत्तीनंतरही आयकर पडत नसूनही जूनजुलैमध्येच एकदाचा करपरतीचा सरल,कठीण जो काही तक्ता असेल तो भरून दिल्यानंतरच मला गाढ झोप लागायला लागते. बाबुरावला तर अशा फालतू गोष्टी करायला वेळच नसतो आणि धंद्यामुळे त्याच्यामते त्याला करपात्र उत्पन्नच नसते,कसेतरी पोट भागते इतकेच.त्याचे पोट बरेच मोठे आहे.पण तो म्हणतो "अरे वेड्या तो अमिताभ बच्चन,जया बच्चन यांच्यापेक्षा तू मला बडा समजतोस का? त्यांच्याकडे तर किती पैसा आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे,बर कधीतरी काळा पैसा सफेद करण्याची मोहिम काढतीलच आपले माननीय वित्तमंत्री तेव्हा भरू थोडाफार कर,उगीच आत्तापासूनच कशाला?"
             मी घर बांधायचा विचार सुरू केला आणि घराचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी महापालिकेकडे पाठवला आणि मंजुरी येण्याची वाट पहात बसलो तेवढ्यात बाबुरावाने काम सुरूही केले.मी अगदी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारले,"अरे तुला महापालिकेकडून परवानगी आली?'तेव्हा त्यानेच उलट मला प्रश्न विचारला,"त्यासाठी तू किती पैसे भरलेस?"त्यावेळी साधारण बांधकामासाठी निरनिराळ्या बाबींची पूर्तता करण्यासाठी काही हजार रुपये भरावे लागत,तो आकडा सांगितल्यावर तो म्हणाला "मग तुला मिळाली का परवानगी? " मी  मान हलवली आणि म्हणालो नाही,त्यावर तो म्हणाला,"मग वाट पहा"आणि खरेच मी वाट पहात राहिलो आणि बाबुराव घर बांधून मोकळा झाला.
             शेवटी मी न राहवून एकदा बाबुरावला विचारले,'अरे प्रत्येक बाबतीत तू अडकतोस की काय असे मला वाटते पण तूच माझ्या पुढे सटकतोस अशी कुठली जादूची कांडी आहे तुझ्याकडे?"यावर बाबुरावने गंभीरपणे उत्तर दिले,'कायद्याच ज्ञान "यावर मी जरा चिडूनच म्हणालो,"अरे तूच तर म्हणत होतास ना,कायदा गाढव असतो.कायदा पाळणारा तर त्याहून गाढव असतो.""अरे शहाण्या,मी   कायद्याच नाही म्हणत मी म्हणतोय काय द्यायच,म्हणजे कुठलाही कायदा आपण मोडला तर कोणाला आणि काय द्यायच याच ज्ञान !आता हे बघ सरकार कायदे कशाला करते?""ते लोकानी पाळावे आणि कारभार सुरळीत चालावा म्हणून" मी सहजपणे उत्तर दिले."चूक साफ चूक!सरकार कायदे अशासाठी करते की ते तुम्ही मोडावेत.ते मोडले की तुम्हाला त्यातून सुटता यावे यासाठी परत वेगळे कायदे असतात,मला त्या कायद्याच ज्ञान आहे हीच माझी जादूची कांडी!कळले का?"मला बुचकळ्यात टाकून बाबुराव निघून गेला.