नैऋत्य अमेरिकेची भटकंती (भाग २): फिनिक्स ते

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी नऊ दिवस एकटाच नैऋत्य अमेरिकेच्या चार राज्यांत (ऍरिझोना, कोलोरॅडो, यूटाह आणि न्यू मेक्सिको) रेड इंडियन वसाहती आणि काही राष्ट्रीय उद्याने पाहत हिंडलो. अमेरिकेतल्या इतर प्रेक्षणीय स्थळांपेक्षा हा प्रवास निश्चितच वेगळा होता. त्यातले अनुभव मनोगतींनाही सांगावेत म्हणून हा लेखनप्रपंच.
....


या भटकंतीचा पहिला भाग सुमारे तीन महिन्यांपूर्वी लिहिला आणि पुढचे भाग लिहिण्याचे काही ना काही कारणाने राहून गेले. त्याला आता पुन्हा सुरुवात करतो आहे. चित्रांप्रमाणेच काही छोटेखानी व्हिडिओज जोडायचा प्रयत्न तांत्रिक समस्यांमुळे असफल झाला. त्यामुळे चित्रांसोबत त्यांचा गूगलवरील दुवा जोडला आहे. व्हिडिओचा दुवा यावर टिचकी मारल्यास स्वतंत्र खिडकीत व्हिडिओ सुरु होईल.


****


नैऋत्य अमेरिकेची भटकंती (भाग २): फिनिक्स ते चिनले


दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी ब्राह्म-मुहुर्तावर विमान पकडले आणि तासाभराच्या विमानप्रवासानंतर फिनिक्स या ऍरिझोनातील सर्वात मोठ्या शहरात पोचलो. लहानसेच विमान असल्याने, पु. लं. च्या भाषेत त्याला एकंदरीत बार्शी लाईटची कळा होती. विमानातून दिसणारे दृष्यही काही फारसे प्रेक्षणीय नव्हते. ओसाड जमीन, खुरटी झाडे-झुडपे आणि कार्डबोर्डच्या कागदाला घड्या पडाव्यात तसे मधूनच जमिनीतून वर आलेले बोडके डोंगर.


विमानतळावरुन आधीच आरक्षित केलेल्या गाडीचा ताबा घेतला आणि  फ्लॅगस्टाफकडे निघालो. फ्लॅगस्टाफ हे ऍरिझोना राज्यातलेच एक शहर. फिनिक्सच्या उत्तरेला सुमारे १५० मैलांवर असणारे. तिकडे जायला सरळसोट रस्ता होता - मुक्तमार्ग (फ्रीवे चे 'मुक्त' भाषांतर) १७ उत्तर. मी मात्र थोडी वाट वाकडी करुन सेडोना मार्गे जाणार होतो. (हे असं 'मार्गे' वगैरे म्हटलं की, कायम मला वेंगुर्ला - सावंतवाडी या लहानपणी नित्यनेमाने घडणाऱ्या एस. टी. प्रवासाची आठवण येते. तुळस मार्गे आणि वजराट मार्गे असे दोन 'मार्ग' उपलब्ध होते. असो.) त्यापुढे आणखी २००-२२५ मैलावर असणाऱ्या 'चिनले' या गावात मला त्यादिवशी पोचायचे होते. गूगलवरील नकाशानुसार सुमारे साडेसहा-सात तासांची 'कार'पीट करायची होती.


गाडीने फिनिक्स सोडले आणि सभोवतीच्या परिसरात बदल जाणवू लागला. सप्टेंबर महिन्याचा हा शेवटचा दिवस जरी असला, तरी बाहेर तपमान १०० डिग्री फॅरनहाईटच्या आसपास होते (सुमारे ३८ अंश सेल्सियस). विमानातून पाहिलेले सारे ओसाडपण आता जमिनीवर प्रत्यक्ष पाहत होतो. नाही म्हणायला अधून-मधून
ऍरिझोनाची खूण पटवणारे पुरुषभर उंचीचे, दोन्ही हात उंचावलेल्या पोझमधे असणारे निवडुंग अधून-मधून दिसत होते.   


cacti चित्राचा दुवा


अधून-मधून घाट लागत होते. ए. सी. फार वेळ सुरु ठेवू नका/ गाडीचे इंजिन फार तापू देऊ नका अशा सूचना रस्त्याच्या आजूबाजूला दिसत होत्या. सुमारे दोनेक तास अशा रस्त्यावर गाडी चालवल्यावर मग सेडोनाचा डावीकडे फाटा लागला.


भोवतालच्या परिसराचे स्वरुप हळूहळू पालटू लागले आणि त्या ओसाड वाळवंटात थोडी हिरवळ सभोवती दिसू लागली. काही अंतरानंतर कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय लाल रंगांच्या पहाडांची भिंतच्या भिंत समोर उभी ठाकली. सुरेख लाल रंगाची आणि टोकाकडे निमुळते होत गेल्यामुळे (हेमाडपंती?) मंदिराप्रमाणे दिसणारी शिखरे आणि नैसर्गिकरीत्या धूप होऊन तयार झालेले आणि कल्पनाशक्तीला आव्हान देणारे दगडांचे विविध आकार. शक्य तितक्या जवळ जाऊन त्यांचे काही वेळ निरीक्षण केले आणि ते आकार कॅमेऱ्यात बंदिस्त करून पुढे निघालो.  

Day 1 042

चित्राचा दुवा


सेडोना पाहून झाले असे वाटत असतानाच पुढच्याच रस्त्यावर 'चॅपेल ऑफ होली क्रॉस' अशी पाटी दिसली. काही अंतर आत गेल्यावर डोंगराच्या अर्ध्या उंचीवर एक साधेसेच ख्रिस्त-मंदिर बांधलेले दिसले. प्रार्थनास्थळ, मग ते कुठल्याही धर्माचे असो, बांधायला अतिशय आदर्श अशी जागा. मुख्य रस्त्याच्या गजबजाटापासून दूर, पाठी - पुढे - आजूबाजूच्या गोलाकार दरीत ऊन-वारा-(क्वचित) पाऊस यांना तोंड देत उभ्या असणाऱ्या रक्तवर्णीय सुळक्यांच्या पहाऱ्यात उभे असलेले. 'आम्ही दगडात देव पाहणारी माणसे आहोत' असं व. पुं. चं एक वाक्य आहे. त्या दगडांच्या सान्निध्यात उभ्या असणाऱ्या त्या चॅपेलला पाहून या सश्रद्ध हिंदू मनोवृत्तीत आणि त्या ठिकाणी ज्यांना चॅपेल बांधावेसे वाटले त्या अमेरिकन दांपत्याच्या विचारांत साम्य असावे असे वाटून गेले.

व्हिडिओचा दुवा


फ्लॅगस्टाफ अजून सुमारे तासाभराच्या अंतरावर होते. सेडोना मागे पडल्यावर पंधरा- वीस मिनिटांनी नूरच पालटला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 'वन झुकले काठी राधा' सारखी हारीने उभी असणारी झाडे, फारशी वर्दळ नसलेला वळणा-वळणांचा रस्ता आणि झाडांच्या गर्दीतून मधूनच दर्शन देणारे डोंगर. 'सीनिक ड्राईव्ह' चे नाव हा प्रवास सार्थ करत होता. अधून-मधून शेजारच्या झाडीत मोकळ्या जागेवर दिसणाऱ्या शुभ्र क्रॉसेसमुळे त्या सौंदर्याला गांभीर्याची किनार लागत होती. दारु पिऊन गाडी चालवल्याने झालेल्या अपघातांत बळी पडलेल्यांची ती दफनाची जागा आहे, असे नंतर कळले. खरे खोटे देव जाणे.  

Day 1 097

चित्राचा दुवा


पुढे सरळ रस्ता संपून वळणदार घाट सुरू झाला.  

Day 1 120

चित्राचा दुवा


घाटमाथ्यावर पोचल्यावर तिथून खालच्या घनदाट दरीचे (ओक क्रीक कॅन्यन) सुरेख दृश्य दिसत होते. मघाचा तो सीनिक ड्राईव्ह, केसातल्या भांगासारखा दिसत होता. शेजारच्या उभ्या कड्यावर उभे दगड एखाद्या चौकस मुलाप्रमाणे दरीत डोकावून पाहत होते. तिथे पाय रेंगाळत होते, पण संध्याकाळ होत आल्याने लवकर निघणे भाग होते.  

Day 1 105

चित्राचा दुवा

फ्लॅगस्टाफला पोचलो आणि एका पेट्रोल पंपाच्या पार्किंग लॉटमधे गाडी लावतेवेळी एका बाईच्या गाडीने माझ्या गाडीला धडक दिली. चूक तिचीच होती कारण गाडी रिवर्समधे असताना पाठी पाहण्याची तसदी तिने घेतली नव्हती. सुदैवाने तिच्या गाडीचा वेग कमी असल्याने पुढच्या भागाला पोचा येण्याव्यतिरिक्त फारसे नुकसान झाले नव्हते. तिने चूक मान्य केली, परंतु माझी गाडी भाड्याची असल्याने कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक होते. पोलीसकाकांना भ्रमणध्वनीने पाचारण करणे, त्यांनी येईतो पाऊण तास घालवणे, मग आम्हां दोघांचे लायसन्स, पत्ते, इन्शुरन्सची माहिती घेणे आणि रिपोर्ट तयार करणे या साऱ्या गोष्टींत तास - दीड तास सुखेनैव गेला. सुदैवाने काका 'ए शिवराम गोविंद, नाव सांग' या पठडीतील नसल्याने तसे लवकरच आटपले.

साडेचार वाजून गेले होते. अजून सुमारे साडेतीन तासांचा प्रवास बाकी होता आणि वाटेत जमल्यास एक-दोन ठिकाणे पहायची होती. शिवाय चिनले हे जरी ऍरिझोना राज्यात येत असले तरी त्याचबरोबर रेड इंडियन जमातीला राखीव अशा 'नावाहो नेशन' मधेही मोडते. नावाहो नेशन ऍरिझोनाबरोबरच यूटाह आणि न्यू मेक्सिको राज्यातही पसरलेले असल्यामुळे त्यांची प्रमाणवेळ उर्वरित ऍरिझोनाच्या एक तास पुढे आहे. परिणामी, वेळेच्या स्वरुपात अजून साडेचार-पाच तासांचा प्रवास बाकी होता.

अनोळखी रस्ते आणि सोबतीला कुणी नाही, तेव्हा शक्य तितक्या लवकरच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचावे या विचाराने घाईघाईतच फ्लॅगस्टाफ सोडले. कलणारा सूर्य पाठीशी घेऊन पूर्वेकडे प्रवास सुरू केला. फिनिक्स सोडल्यानंतर सारे काही ओसाड, उजाड दिसत होते हे खरे पण ते तरी बरे म्हणावे असा हा रस्ता होता. दोन्हीकडे दोन दोन मार्गिकांचा (Lanes) रस्ता आणि तो सोडल्यास दोन्हीकडे क्षितिजापर्यंत वाळलेले पिवळे गवत सोडले तर फक्त जमीन. इमारती, झाडे, डोंगर काही म्हणता काही नाही. माझी घाईची भावना विरून गेली. संथ लयीत गाडी चालवू लागलो. मुंबईत असताना गाडी चालवायला शिकायची कधी गरजच पडली नव्हती, आणि इकडे आल्यावर गाडी चालवायची म्हणजे प्रचंड गर्दीतून कुठली ना कुठली वेळ गाठण्यासाठी. तेव्हा ड्रायव्हिंगचे सुख निवांतपणे प्रथमच अनुभवत होतो. एक वेगळाच अलिप्तपणा अनुभवत होतो. 'नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी' सारखा. ध्येयापेक्षा आनंदनिधान ते गाठण्याच्या प्रवासातच दडलेले असते असे म्हणतात, तसेच काहीसे.

मीडिऑर क्रेटरचा रस्ता लागला. लोणारसारखे प्रचंड आकाराची उल्का आपटून तयार झालेले विवर म्हणजे मीडिऑर क्रेटर. तो तर अगदीच लहान होता. वेगमर्यादा कमी असल्याने गाडी अधिकच हळू चालवायला लागत होती. सूर्य अजून कलला होता आणि 'मावळत्या दिनकरा'च्या त्या प्रकाशात ते सारे ओसाड वाळवंट नाहून निघाले होते. क्रेटर पाहण्याची वेळ एवीतेवी बहुधा टळून गेली होती आणि त्याची तेवढी फिकीरही वाटत नव्हती. रस्त्याच्या बाजूला मोकळी जागा पाहून थांबलो आणि त्या निवांत वातावरणात शांतपणे बसून राहिलो. तो छोटासा रस्ता अगदी From here to eternity म्हणावे, तसा कल्पांतापर्यंत जात असल्यासारखा वाटत होता.



 

Day 1 128

चित्राचा दुवा


त्या रस्त्याव्यतिरिक्त मानवी अस्तित्वाची दुसरी कुठलीही खूण नव्हती. ही पृथ्वी आहे का सूर्यमालेतला दुसरा ग्रह असा प्रश्न पडावा इतपत निर्जन. माणसाची उत्क्रांती होण्याआधी, बहुधा पृथ्वी अशीच दिसत असावी.

व्हिडिओचा दुवा 


कल्पनेच्या राज्यातून वास्तवात येणे भाग होते. पुढे जाऊन मीडिऑर क्रेटरचे बंद दार पाहून मागे फिरलो, आणि त्या काळोख्या रात्री न संपणारा प्रवास करून रात्री साडे-दहाला चिनलेच्या हॉटेलात पोचलो. दुसऱ्या दिवशी उठून जवळच्याच 'कॅन्यन डू शे' या रेड इंडियन राखीव वसाहतीची सफर करायची होती.