टर्मिनेटर सीड (भाग - १)

सकाळचे सात सव्वासात वाजले होते.  सतीशनं खोलीचं लॅच काढलं आणि दरवाजा ढकलून उघडला.  खोली छोटीशीच होती पण नुकतीच कुणीतरी झाडून पुसून अगदी स्वच्छ करून ठेवली होती.  सतीशनं बॅगा आत घेतल्या.  एक कपड्यांची आणि दुसरी पुस्तकांची.  रात्रभरच्या प्रवासानं त्याचं अंग पार आंबून गेलं होतं.  दार बंद करून सतीशनं कॉटवर तसंच अंग टाकलं आणि नकळत त्याचा डोळा लागला. 


सतीश अनंत साठे.  सांगलीचा रहाणारा.  वय अंदाजे वीस-बावीस.  सांगलीतच मायक्रोबायोलॉजीत त्यानं एम.एस्सी. केलं होतं.  युनिव्हर्सिटीत पहिलाही आला होता आणि आता रिसर्च करायच्या उद्देशानं पुण्यात येऊन दाखल झाला होता.  पुणे  युनिव्हर्सिटीत त्यानं त्यासाठी रजिस्ट्रेशनही केलं होतं आणि गाइड मिळाले होते डॉक्टर अनिखिंडी.  मायक्रोचे एचओडी अनिखिंडी सरांचा मायक्रोबायोलॉजीच्या क्षेत्रात मोठाच दबदबा होता.  देश-विदेशातल्या महत्त्वाच्या कॉन्फरन्सेसना आणि सेमिनार्सना सरांना निमंत्रण असायचं.  प्लांट पॅथोजेन्सवर सरांनी केलेलं संशोधन जगभर वाखाणललं जायचं.  सतीशचं महत्भाग्य की त्याला  गाइड अनिखिंडी  सर मिळाले होते.


पुण्यात अभ्यासाच्या काळात रहाण्यासाठी सतीशनं पाषाणमध्ये एक खोली भाड्यानं घेतली होती.  एका टुमदार बंगल्यातल्या पहिल्या मजल्यावरची खोली.  तो परिसर अतिशय शांत आणि चारही बाजूंनी मोठमोठ्या वृक्षांची गर्दी असलेला होता.  एकाग्रतेनं अभ्यास करण्यासाठी ती खोली आणि तो परिसर योग्य होता आणि म्हणूनच सतीशला ती खोली आवडली होती.  काल घरच्यांचा निरोप घेउन रात्रीच्या एस्टीनं सतीशनं सांगली सोडली होती आणि आता सकाळी सकाळी पुण्यात त्याच्या खोलीत येउन पोहोचला होता. 


दोन अडीच तास चांगली झोप झाल्यानंतर सतीशला जरा तरतरी आली.  सतीशनं खोलीची पहाणी करायच्या उद्देशानं खोलीत एक चक्कर मारली.  खोली चांगली प्रशस्त होती.  एक कॉट, एक टेबल-खुर्ची, एक वॉर्डरोब इतपतच सामान होतं; पण सारं नीटनेटकं अन स्वच्छ होतं. खोलीला दोन मोठ्या खिडक्या होत्या.  एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला.  या खिडक्यांमधून भरपूर खेळती हवा आणि उजेड खोलीत यायचा.  पूर्वेच्या खिडकीतून बंगल्याच्या पुढ्यातली हिरवळ आणि बंगल्याचं मुख्य फाटक दिसायचं.  तर पश्चिमेच्या खिडकीतून मागचा बंगला आणि दोन्ही बंगल्यांच्या मधे असलेली त्या बंगल्याची प्रशस्त मोठी बाग आणि सभोवतालचं आवार असं रमणीय दृश्य दिसायचं.  सतीशनं त्या बंगल्याकडं आणि बागेकडं नजर टाकली.  बाग चांगली मोठी होती आणि बागेत वेगवेगळ्या झाडांची मुद्दाम लागवड केलेली दिसत होती.  बागेची आखणी वैशिष्ट्यपूर्ण होती.  बागेच्या मधोमध एक संगमरवरी हौद आणि त्याच्या मध्यभागी कारंजं.  झाडांमधून चालण्यासाठी लाल राजस्थानी दगड बसवलेल्या पाउलवाटा तयार केल्या होत्या.  या पाउलवाटांच्या बाजूबाजूनं कुंड्यांमधून वाढलेली झाडं होती, तर त्यांच्या मागं जमिनीतून रुजून वर आलेली चांगली पुरुष पुरुष उंचीची झाडं.  झाडांचे प्रकारही वेगवेगळे होते.  काही झाडांची पानं मोठी लंबगोलाकार होती तर काहींची पानं लहानशी  पण चंदेरी चमचमणारी होती, तर काही झाडांच्या एकाच फांदीवर विविध रंगांची फुलं उमलली होती.  फुलांचे सुद्धा किती विविध प्रकार होते.  सुंदर टपोरी फुलं अन त्यांचे मनमोहक रंग.  संपूर्ण बाग अगदी चित्तवेधक होती, पण तरीही सतीशला बागेतल्या एकाही झाडाची ओळख पटेना.  आपल्या नेहमीच्या पाहण्यातलं असं गुलाब, तगर, जास्वंद, सदाफुली, चाफा असं कुठलंच झाड या बागेत नव्हतं. पण तरीही बागेचं सौंदर्य एखाद्या स्वर्गीय उद्यानासारखं लक्षणीय होतं.  सतीश स्तिमित होउन ते सारं दृश्य न्याहाळत होता.


किती वेळ सतीश तसाच बसला असेल कुणास ठाउक, अन बागेतल्या कसल्याशा चाहुलीनं त्याची समाधी भंग पावली.  पलीकडच्या बंगल्यातून कुणीतरी एक प्रौढ गृहस्थ बागेत आले होते.  वय अंदाजे पंचावन साठच्या दरम्यान.  चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज.  डोक्याला अर्धचंद्राकृती टक्कल पडलेलं आणि मागचे केस पूर्ण पिकलेले.  त्यांनी टापटिपीचे कपडे आणि पायात काळे चकचकीत पॉलिश केलेले बूट घातले होते.  डोळ्यांवरचा सोनेरी बारीक काड्यांचा चष्मा नाकावर घसरला होता.  पूर्ण एकाग्रतेनं ते प्रत्येक झाडाचं निरीक्षण करत होते.  जणू काही ते जाणून घेत होते की अमुक एक पान अमुक एका पद्धतीनंच का आलंय किंवा अमुक एक फूल अमुकच बाबतीत वेगळं का वाटतंय?  अर्थात इतक्या एकाग्रतेनं ते या झाडांचा अभ्यास करत होते तरीही त्यांच्या चेहऱ्यावर मात्र त्या झाडांबद्दल कुठलीही आस्था किंवा प्रेम दिसत नव्हतं.  जसं एखादा डॉक्टर रोग्याला तपासताना रोग्याबद्दलच्या आपुलकीपेक्षा स्वतःच्या धंद्याबद्दलची आपुलकी त्याच्या चेह्ऱ्यावर जास्त दिसते, तोच धंदेवाईक भाव याही गृहस्थांच्या चेहऱ्यावर फुलला होता.  त्या झाडांमधून चालतानासुद्धा ते पूर्ण काळजी घेउन ते त्या झाडांचा स्पर्शही स्वतःला होउ देत नव्हते.  सतीशला उमजत नव्हतं की ज्या माणसानं एवढी सुंदर दृष्ट लागण्यासारखी बाग जोपासली आहे, त्यानंच या झाडांबद्दल तिरस्कार असल्यासारखं का वागावं!


- क्रमशः