टर्मिनेटर सीड (भाग - २)

या तऱ्हेवाईक बागवानानं हातातही जाड काळे रबरी हातमोजे घातले होते.  झाडांची वाळलेली पानं किंवा वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या तो कापून टाकत होता आणि त्याचे हातमोजे जणू झाडांपासून त्याचं संरक्षण करत होते.  हे गृहस्थ त्यांचं निरीक्षण करत करत मधल्या हौदाला लागून असलेल्या एका डेरेदार झाडाजवळ आले आणि बराच वेळ विचारमग्न अवस्थेत झाडाकडं बघत उभे राहिले.  आणि मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं त्यांनी बंगल्याकडे बघून हाक मारली


"रचना.... रचना.."


"डॅडी मी इकडं आहे, पहिल्या मजल्यावर.." समोरच्या बंगल्यातून गुलाबपाण्याच्या शिडकाव्याप्रमाणे कुणा तरुणीचा रेशमी आवाज आला.


"रचना जरा खाली बागेत ये.  तुला काही तरी दाखवायचंय." गृहस्थ.


"हो, डॅडी ... आले." बंगल्यातून उत्तर आलं.


आणि क्षणात त्या रेशमी आवाजाची मालकीण बंगल्यातून बागेत अवतरली.  अंदाजे सतरा-अठराचं वय.  वयाला साजेसा अल्लडपणा आणि मुग्ध सुंदर रुप.  सतीश अवाक होऊन रचनाला न्याहाळत होता.  रचना साक्षात चारुगात्री होती.  दैवानं तिच्यावर अक्षरशः जीवनातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची खैरात केली असावी असं वाटत होतं.  तिच्या वागण्या-चालण्यात एक राजबिंडा दिमाख होता.  तिच्या अवयवांची हालचाल नाजूक, मोहक होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या वडिलांसारखं ती स्वतःला झाडांपासून चोरुन घेत नव्हती.  चालता चालता ती बाजूच्या झाडांना, फुलांना तिच्या नाजूक गुलाबी हातांनी स्पर्श करत होती.


रचनाचे वडील अजूनही संगमरवरी हौदाजवळच्या त्या डेरेदार झाडाकडंच बघत उभे होते.  रचना वडलांजवळ आली आणि दोघं जण बराच वेळ त्या झाडांकडं बघत काही चर्चा करत राहीले. मध्ये रचनानं त्या झाडाची सगळी फुलं पटापट खुडली आणि हातात्ल्या बास्केटमधे टाकली.  झाडाच्या साऱ्या पानांवरून तिनं नाजूकपणे हात फिरवला.  रचना आणि ते प्रौढ गृहस्थ बोलत बोलत बंगल्यात दिसेनासे झाले.  बाग आणि रचनाच्या सौंदर्यानं सतीश एवढा अचंबित झाला होता की एखादं स्वप्न बघत असल्यासारखं त्याला वाटलं. 


सतीशनं खोलीच्या दारं-खिडक्या बंद केल्या, पायात चपला अडकवल्या आणि पुण्यात चक्कर मारायला तो बाहेर पडला.  दिवसभर त्याच्या डोक्यात लावण्यवती रचना, तिची बाग आणि तिचे तऱ्हेवाईक वडील एवढेच विचार घोळत होते.  दिवसभर पुण्यात त्याच्या मित्रांना भेटून आणि रात्री जेवण वगैरे उरकून सतीश उशीरा खोलीवर परत आला, तरीही डोक्यातला विचारांचा ओघ काही कमी झाला नव्हता.  त्या विचार-मंथनातच त्याला कधी झोप लागली कळलंही नाही. 


सकाळी सकाळी पूर्वेकडच्या खिडकीतून खोलीत उतरलेल्या कोवळ्या सूर्यकिरणांनी सतीशला उठवलं सकाळच्या वेळेत म्हणा किंवा त्या सूर्यकिरणांमधे म्हणा एक जादू असते.  ही वेळ आणि ही किरणं माणसाला तारतम्य शिकवतात.  संध्याकाळी रात्री सैरभैर चौखूर उधळल्या विचारांना भानावर आणतात आणि अविचारांना मुरड घालतात.  उठल्या उठल्या पहिली गोष्ट म्हणजे सतीशनं पश्चिमेकडची खिडकी उघडली.  सकाळच्या थंड वातावरणात बागेचं रुप अधिकच खुललं होतं.  ते बघून सतीशच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या.  चांगला अभ्यास होण्यासाठी यापेक्षा अधिक चांगलं वातावरण ते काय असणार... सतीशला वाटलं...  सूज्ञ विचार...


दहा-साडेदहाला सतीश युनिव्हर्सिटीत पोहोचला आणि सरळ डॉक्टर अनिखिंडींकडे गेला. 


"कम इन कम इन सतीश" डॉक्टर अनिखिंडींनी त्याचं स्वागत केलं "कधी आलास सांगलीहून?"


"सर कालच सकाळी आलो.  एक दिवस जरा आराम केला आणि काही मित्रांना वगैरे भेटायचं होतं ते सारं उरकून घेतलं," सतीश.


"गुड. खोलीची सोय झाली की होस्टेलमधेच रहातोयस?"


"नाही सर होस्टेल मधे एवढ्या मुलांच्या गोंधळात अभ्यास कुठला व्हायला? त्यामुळे एक खोली घेतलीये मी.  फार छान खोली मिळाली मला सर." एक क्षण सतीशच्या डोळ्यासमोर रचना आणि तिची बाग तरळून गेली. 


"अरे व्वा.  हे फारच उत्तम झालं.  कुठल्या एरियात आहे तुझी खोली? युनिव्हर्सिटीपासून फार लांब नाहीना बाबा? कारण आपल्याला बऱ्याच वेळा रात्री उशीरही होऊ शकेल."


"नाही सर.  फार लांब नाही.  पाषाणमधेच आहे आणि सर तो परिसर फारच सुरेख आहे.  चारही बाजूंना झाडं, शांतता आणि माझ्या खोलीच्याच मागं मागच्या बंगल्याची मोठी बाग आहे. विलक्षण सुंदर," सतीशच्या डोक्यातून बाग आणि रचना जात नव्हते.  "सर एवढी मोठी बाग आहे आणि एवढी सुंदर सुंदर झाडं तिथं आहेत, पण थोडं विचित्र वाटतं की त्यातलं एकही झाड ओळखता येत नाही."


"सतीश अरे म्हनजे तू डॉक्टर चॅटर्जींच्या बागेबद्दल बोलतो आहेस का?" सरांच्या कपाळावर जरा आठ्या चढल्या होत्या.  सतीशनं मग सरांना बाग, गृहस्थ आणि मुलगी ही सुरम्य कथा साद्यंत ऐकवली.  सरांची खात्री पटली, सतीश डॉक्टर चॅटर्जींच्याच बागेबद्दल बोलत होता. 


"अरे त्या गृहस्थांचं नाव डॉक्टर चॅटर्जी.  अतिशय हुशार माणूस.  पूर्वी इथंच युनिव्हर्सिटीत होता.  जेनेटिक्समधलं त्याच्या तोडीचं ज्ञान जगात कदाचित कुठल्याच शास्त्रज्ञाचं नसेल.  पूर्वी इथं आपल्या डिपार्टमेंटमधे त्यानं आणि मी जॉइंटली पण काही संशोधन केलं.  नीट राहिला असता तर फार पुढे गेला असता तो, पण त्यानं त्याच्या ज्ञानाचा, बुद्धीचा अयोग्य वापर करायला सुरवात केली... त्यामुळं नाईलाजानं आम्ही त्याला डिपार्टमेंट सोडायला लावलं... म्हणूनच तर ही बाग... त्यानं त्याच्या अभ्यासासाठी स्वतःच सारं तयार केलंय..." खांदे उडवत सरांनी सांगितलं.


सतीशनं ओळखलं, अनिखिंडी आणि चॅटर्जी दोघं जण एकमेकांचे व्यावसायिक स्पर्धक असणार आणि चॅटर्जी या स्पर्धेत अनिखिंडींच्या पुढे गेले असणार! म्हणूनच हे सारं... सतीशला मनोमन हसू आलं.  अरे, अरे... या स्पर्धेच्या घाणेरड्या राजकारणाबद्दल ऐकून होतो; पण असं अगदी पहिल्याच दिवशी त्याची चव चाखायला मिळेल एवंढं अपेक्षित नव्हतं. 


"सर, डॉक्टर चॅटर्जींची ती मुलगी ..."


"हं.. रचना"


"अं... हो.  ती पण ... म्हणजे तिचाही या सगळ्या अभ्यासाशी संबंध आहे?" सतीशचा खरं तर रचनाबद्दल जास्त माहिती मिळवण्यात रस होता.


"हो. मला असं कळलंय की चॅटर्जीनं रचनाला पण आता त्याच्या रिसर्चमधे इनव्हॉल्व केलंय.  पण ते सगळं जाऊ दे.  तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर.  उगीच त्या मुलीकडे पाहण्यात वेळ वाया घालवू नकोस."


"नाही सर.. पण ती फारच सुंदर आहे.." सतीश सहज हसत बोलला.


"सतीश मला तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत.  मला माहिती आहे की रचना अगदी अप्सरेसारखी सुंदर आहे.  साऱ्या पुण्यात तिच्या सौंदर्याचा बोलबाला आहे.  पण तरीही तू स्वतःला त्या सगळ्यापासून लांब ठेव.  तू पुण्यात अभ्यासासाठी आला आहेस.  तू तुझं काम लवकरात लवकर संपवायचं बघ.  ती मुलगी तिची बाग आणि तो चॅटर्जी हे फार गुंतागुंतीचं प्रकरण आहे.  तू या सगळ्या पासून स्वतःला लांब ठेवलं नाहीस तर स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील एवढं लक्षात ठेव."  बोलता बोलता सरांचा पारा थोडा वर चढला होता, त्यामुळं सतीशनं ते सारं बोलणं आवरतं घेतलं.


 - क्रमशः