टर्मिनेटर सीड (भाग - ३)

सतीशनं आता आपलं अभ्यासाचं टेबलही पश्चिमेच्या खिडकीलगतच आणून ठेवलं होतं.  त्यामुळे अभ्यास करता करताही तो खाली बागेकडे म्हणजे खरं तर रचनाकडे बघू शकत होता.  दुसरीकडं रचनाच्याही एव्हाना लक्षात आलं होतं की शेजारच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर कुणी नवीन पेईंग गेस्ट रहायला आलाय आणि तो सतत अभ्यास करत असतो, पण त्याच बरोबर तो आपल्याकडं आणि आपल्या बागेकडं बघत असतो.


त्यामुळे हळूहळू रचनासुद्धा बागेत आली की, सतीश खिडकीत दिसतो का नाही हे ती बघून घ्यायला लागली.  एखाद्या दिवशी तो दिसला नाही तर तिला चुकल्या चुकल्या सारखं व्हायला लागलं.  संध्याकाळी तो घरी यायच्या वेळेस ती मुद्दाम आपल्या बागेत चक्कर मारायला यायला लागली आणि मग सर्वसाधारणपणे पुढच्या गोष्टी जशा घडत जातात तसंच त्या दोघांनी एकमेकाकडे बघून ओळखदर्शक स्मित करायला सुरवात केली; त्याचं पर्यावसान एकमेकांशी ओळख करून घेण्यात झाली; त्यानंतर हळूहळू सतीश खिडकीतून आणि रचना तिच्या बागेतून अशी बोलाचालीला सुरवात झाली आणि आता तर सतीश रोज संध्याकाळी तिच्या बंगल्यात जायचा आणि बागेच्या मध्यभागी असलेल्या पुष्कर्णी हौदावर ते दोघं तास तास गप्पा मारत बसायचे.  दोघांची एकमेकांशी चांगलीच गट्टी जमली होती, परंतु प्रकरण त्यापुढे मात्र जात नव्हतं. 


रचनाच्या डोळ्यात सतीशला त्याच्याबद्दलचं प्रेम अगदी स्पष्ट दिसायचं.  त्यानं ओळखलं होतं की त्याचा सहवास तिला अगदी हवाहवासा वाटायचा, तरीही गाडी बोलाचाली गप्पाटप्पा यापुढे काही सरकत नव्हती.  दोन-तीन वेळेस सतीशनं पुढाकार घ्यायचा प्रयत्न केला, पण अतिशय सुरेख लाजत पण तेवढ्याच निश्चयानं रचनानं त्याला नाकारलं.  रचना दिसायला जेवढी नाजूक आणि सुंदर होती तेवढ्याच तिच्या मनोभावनाही कोमल अन तरल होत्या.  सतीशला तिच्या या भावनांबद्दल  आदर वाटायचा.  घाई गडबड करून तिच्या भावनांना धक्का पोहोचू शकेल अशी भीती त्याला वाटायची.  एखाद्या झाडावर कळी येते आणि ती मोठी मोठी होत जाऊन त्यातून एक दिवस नकळत फूल उमलतं, तद्वतच त्यांचं प्रेमही अतिशय हळूवारपणे नकळत फुलत होतं.  एकमकांच्या सहवासात दोघांनाही अगदी अंगावर मोरपीस फिरत असल्यासारखं वाटायचं.


त्यामुळेच आणि पुरुष स्वभावानुसार सतीश रचनाला कधी मिठीत घेऊ बघायचा किंवा हलकेच तीच्या गालावर आपले ओठ टेकवण्याचा प्रयत्न करायचा, परंतु रचना मात्र हुशारीनं त्याला दूर ठेवायची.  संध्याकाळचे तास-दोन तासच ते एकमेकांच्या बरोबर असायचे, परंतु दिवसाचा उरलेला सारा वेळ त्यांच्या दोघांच्याही डोक्यात फक्त एकमेकांबद्दलचेच विचार असायचे. स्वप्नवत स्थितीत असल्यासारखं दोघंही दिवसभर वावरायचे. 


याबरोबरच सतीशचं संशोधन आणि अभ्यासही आता जोरात सुरू झाला होता.  अनिखिंडी सर त्याला भरपूर काम देत होते, त्यामुळे रात्रं-दिवस लिखाण वाचन चालू होतं.


या साऱ्या दरम्यान मध्यंतरीच्या काळात दोन विचित्र घटना घडल्या.  एका रविवारी दुपारी सतिश आपल्या अभ्यासाच्या टेबल खुर्चीवर बसून खाली बागेकडे बघत होता.  बागेत सामसूम होती.  एक सुंदर पक्षी अगदी नैसर्गिक सहजतेनं अलगद तरंगत येऊन बागेतल्या एका झाडावर बसला.  झाडाला छोटी छोटी लाल चुटुक फळं लटकली होती.  त्याच्या स्वभावाप्रमाणे पक्षानं एका फळावर चोच मारली आणि क्षणात एखाद्या मातीच्या गोळ्याप्रमाणे पक्षी झाडावरून खाली पडला.  एक दोन मिनिटंच त्यानं प्राणांतिक धडपड केली आणि निपचित झाला.  सतीश अवाक होऊन ते सारं दृश्य बघत होता. खूप विचार करूनही सतीशला या दृश्याचा अर्थ समजेना.  चार आठ दिवसात तो तो प्रसंग विसरूनही गेला.  पण पाठोपाठ पुन्हा एकदा दुसरी एक अतर्क्य घटना घडली.  एक दिवस सकाळी सकाळी चहाचा कप हातात धरून सतीश खिडकीत उभा होता.  खाली बागेत डॉक्टर चॅटर्जींचं झाडांचं निरीक्षण चालू होतं.  हातात हातमोजेही होतेच.  हातातल्या कात्रीनं डॉक्टरांनी एका झाडाचं पान देठापासून कापलं.  देठातून पांढरा चीक झाडावर वहायला लागला.  त्याच खोडवर एक सरडा आधीपासूनच बसलेला होता.  चिकाचा एकच थेंब त्याच्यावर पडायचा अवकाश, सरडा गतप्राण होऊन खाली कोलमडला.  डॉक्टर अजूनही झाडाजवळच उभे होते.  त्यांनीही सरड्याचा मृत्यू पाहिला पण त्यांच्या चेहेऱ्यावरची रेषाही हलली नाही.  जणू त्यांच्या दृष्टिनं ही नेहमीचीच घटना होती.  त्यांचं काम पूर्ववत चालूच राहीलं.  सतीशला हे उमगत नव्हतं की डॉक्टर चॅटर्जींना या घटनेत काहीच कसं विचित्र वाटलं नाही?


या दोन्ही घटनांचा सतीशला चांगलाच धक्का बसला, पण त्याला त्यांचा अर्थ मात्र लावता येत नव्हता.  विचार करकरून त्याचं डोकं ठणठणायला लागलं.  रचना भेटल्या भेटल्या तिला याबद्दल विचारायचं असं सतीशनं ठरवून टाकलं.


आज रचनाचा वाढदिवस.  सतीश युनिव्हर्सिटीतून थोडासा लवकरच निघाला.  येताना रस्त्यात टपोऱ्या गुलाबाच्या फुलांचा एक सुंदर गुच्छ त्यानं बनवून घेतला.  घरी येऊन आवरा आवर करून सतीश बागेत गेला . 


"हॅपी बर्थडे स्वीट हार्ट" दोन्ही हात फैलावून रचनाच्या जवळ जात सतीशनं तिला विश केलं. 


"थँक्यू सतीश" रचनानं सतीशच्या अभीष्टचिंतनाचा स्विकार केला, पण जवळ येण्याचा त्याचा हेतू ओळखून मंद स्मित करत ती त्याच्यापासून दूर पळाली. 


"रचना धिस इज फॉर यू" गुलाबांचा गुच्छ तिला दाखवत सतीश म्हणाला. 


"अय्या, किती छान आहे. दे नं"


"अंहं ... असा देणार नाही.  त्याच्या बदल्यात मला काय देणार?" सतीश.


"चूप. सारखं असं वेड्यासारखं काय करतोस.  दे ना गुच्छ" रचना.


"छे.  सांगितलं ना, या गुच्छाच्या बदल्यात  मलाही काहीतरी पाहिजे आणि काहीतरी म्हणजे काय ते तुला चांगलं माहिती आहे."


"सतीश... प्लीज... असं वेड्यासारखं नको नं करू.." सतीशला नाकारणं रचनाला खूप अवघड जात होतं.


"रचना... कमॉन..मी वेड्यासारखं नाही मी शहाण्या माणसासारखंच करतोय.  तू वेड्यासारखं करतीयेस.. चल पटकन नाहीतर तुझे डॅडी येतील तेवढ्यात.."


"सतीश तू मला अडचणीत टाकतोयस रे.."


"पण यात कसली अडचण? मी काही चुकीचं करतोय का? सांग बरं?" सतीश ऐकायला तयार नव्हता. 


"चुकीचं नाही रे... पण ट्राय टू अंडरस्टँड .."


"पण का? तुझं माझ्यावर प्रेम नाही? मी तुला फसवीन अशी तुला भीती वाटते का?" सतीशचा स्वर करवादला होता.


"नाही .. नाही रे.. तुझ्यावर अगदी शंभर टक्के भरवसा आहे माझा, पण .. कसं सांगू तुला... मला तसलं काही नकोय..."


"म्हणजे काय?  का नाही? प्लीज रचना..." सतीश आपला हेका सोडत नव्हता आणि रचना अगदी गयावया करत त्याला नकार देत होती.  रागानं सतीश रचनाकडं पाठ वळवून उभा राहिला. 


पाच-सात मिनिटं पूर्ण स्तब्धतेत गेली.  कुणीच कुणाशी काहीच बोलत नव्हतं.  रचना मान खाली घालून बसली होती आणि अनाहूतपणे तिच्या डोळ्यांतून गालांवर अश्रूंची धार लागली.  ते पाहून सतीशलाही अपराधीपणाची भावना आली. 


"रचना... आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी...  मला... म्हणजे मला.. तुला दुखवायचं नाहीये.. आय ऍम सॉरी  रचना.."


"नाही सतीश ... यू नीड नॉट फील सॉरी... तुझी काहीच चूक नाहीये.. पण काही गोष्टी... अं... जाऊ दे..सतीश " रचना अजूनही मुसमुसत होती.  सतीशनं फुलांचा गुच्छ पटकन तिच्या हातात दिला.  रचनानं गुच्छाचं एक हलकेच चुंबन घेतलं.


"आलेच मी दोन मिनिटात..." असं म्हणत रचना पटकन उठली आणि गालावरचे अश्रू पुसत गुच्छ घेउन घरात पळाली. 


अरेच्या? पण हे काय?  सतीशचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.  रचनाच्या हातातल्या गुच्छामधले गुलाब ती बंगल्याच्या दरवाजाजवळ पोहोचेपर्यंतच मरगळून गेले होते.  एक क्षण सतीशला वाटलं की त्याला तसा भास झाला, पण मन मात्र ते मान्य करत नव्हतं.  ही घटना इतक्या त्वरेनं घडली की ती समजण्याच्या आत संपूनही गेली होती.  'अगदीच नक्की .. माझे डोळे मला इतकं फसवणार नाहीत.. अगदी मुद्दाम निवडून निवडून आणलेले गुलाब असे सगळे दोन मिनिटात मरतीलच कसे..?"  सतीश सुन्न झाला होता.


क्रमशः