'माय' मराठी

आपल्या भाषेला मातृभाषा असे आपण म्हणतो, मातेसमान मानतो. खरोखरच मातेप्रमाणे मराठी भाषेने एका मुलीचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवल्याची एक घटना नुकतीच घडल्याचे आपल्यापैकी अनेकांनी वाचले असेल. ज्यांना माहीत नसेल त्यांच्या साठी ही हकिकत येथे देत आहे.


आकांक्षा खटावकर या अवघ्या साडेतीन वर्षाच्या मुलीला ती आजी बरोबर दवाखान्यात गेली असता तीच्या आजीची नजर चुकवून स्वाती शर्मा नावाच्या तरुणीने ना.म. जोशी मार्ग, मुंबई येथून पळवले. गोड बोलून, बाहुली देऊन स्वातीने छोट्या आकांक्षाला घेऊन मुंबई बाहेर जाणारी गाडी पकडली. दिल्लीला आपल्या आईच्या मदतीने या मुलीला विकून टाकायचा स्वातीचा विचार होता. स्वाती स्वतः बार सेविका आहे.


प्रवासात स्वातीची पर्स कापली गेली आणि रत्लाम येथे तिला तिकिट तपासनिसाने पकडले. तिकिट नाही, दंडाचे पैसे नाहीत म्हणताना तिला व छोट्या आकांक्षाला खाली उतरवले गेले. तरीही स्वाती काहीतरी करून सुटू शकली असती. मात्र महिला पोलीस हजर नसल्याने तिला तसेच खोळंबून ठेवले गेले व मग भोसले नामक रेल्वे पोलीस सेवेत असलेल्या महिला पोलिसाच्या आगमना नंतर तिला ताब्यात घेतले गेले. इकडे बिचारी आकांक्षा झोपेत होती ती भुकेमुळे झोपेतच बडबडू लागली, 'आई, काहीतरी खायला दे, भूक लागल्ये'. एका अमराठी बाईकडे असलेली लहान मुलगी मराठीतून बोलते आहे, व झोपेत मराठी बोलते म्हणजे ती मराठीच असली पाहिजे असा तर्क करून प्रसंगावधानी सुनंदा भोसले यांनी ही गोष्ट वरिष्ठांच्या कानी घातली. नागदा येथे ठाण्यावर नेऊन 'प्रेमळ विचारपूस' करताच स्वातीने कबूल केले की तिने आकांक्षाला पळवून आणले आहे.


बातमी मिळताच मुंबई पोलीस आकांक्षाच्या काकासह तिथे पोहोचले व आकांक्षा आपल्या घरी सुखरूप परत आली आणि करी रोड ला तिच्या घरी व परिसरात जल्लोष उडाला.


मराठी भाषेमुळेच एका मराठी मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून बचावले.