साहित्यिक्स्

"देवी, आपले प्रफुल्लित, सुकोमल मुखमंडल असे म्लान का झाले बरे? विषादाच्या कोणत्या काककुलोत्पन्न गणांनी आपल्या मन नभाच्या गगनराजावर काजळी धरली आहे?..."


कावासाकी आपल्या नावाशी साधर्म्य दाखवणाऱ्या फटफटीगत सुसाट सुटला होता. ही सखाराम गटणेची जपानी मुळी आता आपल्या वेळेचं खोबरं करणार हे एकूणच माझ्या ध्यानात आलं.

तसा माझा मराठीचा संबंध कमीच यायचा. संगणकाच्या क्षेत्रात आज्ञावलीच्या चवऱ्या ढाळणे हीच आमची उपजीविका. इंग्रजी हीच मातृभाषा असल्यागत दैनंदिन व्यवहार चालायचे. आजकाल विचारही इंग्रजीतच करायला लागलो होतो. शिवाय, कलाकार या शब्दाचा विशुद्ध उच्चार कल्लाकार आहे ही अजून एक भाबडी समजूत होती. नेमकं म्हणाल तर कावासाकीची ओळख व्हायची सुतराम शक्यता नव्हती. पण, म्हणतात ना की सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असते. येथेही तसेच झाले. एकदा माझ्या अनुदिनीवर लेख वाचून त्याने माझा पत्ता काढला आणि "रेष्ट इज (इष्ट का अनिष्ट ते ठाऊक नसल्याने झालो मी कष्टी अशी) हिस्ट्री" झाली.


"…आर्यपुत्र, आपण प्रपंचरथाचा गाडा ओढण्यास मला साहाय्य कराल काय? बाष्पपात्रात तंडुल संपृक्त होतायेत तोवर आपण स्नान आटोपून घ्यावे. सोबतीस आपल्या संसारवेलीचे सुंदर फूल, त्यालाही तैलमर्दन करोन शुचिर्भूत करण्यास न्यावे. माध्यान्ही अग्निद्रावकुंभ सरत आलाय तो पुनश्च भरून आणावा. पश्चात आज राणीच्या उपवनात जायचे काय? आषाढाची चाहूल लागली असली तरी मेघांचे नभावरील आक्रमण दूर सारून सहस्ररश्मीने धरित्रीला आलिंगन देण्याचा निश्चय केलेला आहे."


मला खरोखर धाप लागली होती. "भ" आणि "झ" ची बाराखडी सुरू करायला जीभ वळवळत होती. पण, कावासाकीचा निरागस उत्साह आणि सभ्यतेचे संस्कार माझे शब्द ओठात येण्याआधीच अडवीत होते. मी एकाग्रतेने त्याचे वाचन ऐकण्याचा आव आणीत खोलीत चहूकडे नजर टाकली. टोकियोत अतिशय कमी जागेत राहत असल्याने कावासाकीला पुण्यातील ती सदनिका जणू राजप्रासाद वाटत असावी. बहुधा त्यामुळेच सजावटीची खच्चून गर्दी झाली होती. किल्ल्या ठेवायला सुबक गिटार, काटाकाना लिपीतली सुभाषिते मिरवणारे सुंदर झुंबर, वनातील रमणीय तळ्याचे तैलचित्र, बाजूला पुस्तकांचे कपाट, एका बाजूला शारदेची अप्रतिम मूर्ती, कपाटासमोर टेबल, त्यावर घडीचा संगणक आणि विविध विचारांनी वेढलेला कावासाकी!


इतक्यात दारावरची बेल वाजली. तेवढाच मेंदूला त्रास कमी असा हिशोबी विचार करून मी स्वतःच दार उघडले. किशोर आत आला. "हाऽऽय बडी! हे हाऽऽय. व्हॉटस् अप? तुझी नवीन कादंबरी काय म्हणतेय?" एव्हाना कावासाकी वेढ्यातून बाहेर पडला असावा.


त्याने किशोरचे स्वागत केले. "चला चहा घेऊ या!" हे ऐकून मला हायसे वाटले.


साहित्याने तुंबलेल्या मनाला तेवढाच दिलासा! शिवाय, कावासाकी चहा फक्कडच बनवतो. त्यामुळे आधणातील पाण्याच्या आणि माझ्या मनातील कोंडवाड्यातून जरा वेळ सुटल्याच्या आनंदाच्या उकळ्या एकदमच फुटत होत्या. इतक्यात किशोरला संगणकाच्या पडद्यावर डोकावून पाहायची (मांजरीचा पाठलाग करणाऱ्या उंदराप्रमाणे) दुर्बुद्धी सुचली. हा गडी एका ठिकाणी पाच मिनिटे तरी शांत का बसू शकत नाही? पण, आता वैषम्याला अर्थ नव्हता. कारण, न्यूट्रॉन्सची शृंखला प्रकिया सुरू झाली होती. प्रश्नांची अण्वस्त्रे किती वेळ येणारा याचा मी अंदाज घेऊ लागलो.


"या आर्टिकलमध्ये कॉककुलोत्फन्न या शब्दाचं मिनिंग काय आहे?" किशोर सुरू झाला.


"कावळ्याच्या!" मी दात ओठ खाऊन शक्य तितक्या शांतपणे उत्तर दिलं.


"सुपर. आणि गगनराज म्हणजे?" हा किश्या ना कधी-कधी सहनशक्तीचा अंत पाहतो. केवळ कावासाकीच्या हातचा चहा प्यायला भेटण्याच्या आनंदात मी झेल टिपत होतो.


"मनरूप आकाशात चमकणाऱ्या आनंदाच्या सूर्यावर विषादाच्या कोणत्या कावळ्यांनी काजळी धरली आहे?" एवढी चांगली फलंदाजी आपल्याला कशी काय जमली याचे मला माझेच नवल वाटले.


"बाष्पपात्र? हा कावासाकी इतके डिफिकल्ट वर्डस् का वापरतो?" इति किशोर.


"अरे, म्हणजे कुकर मध्ये तांदूळ शिजवायला ठेवले आहेत. अग्निद्रावकुंभ म्हणजे गॅस सिलेंडर!" मी दोन चौकार हाणले.


"हाऊ रोमँटिक!" किशोरच्या या उद्गारांवर मी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिले. तांदूळ शिजवण्यामध्ये कसलं डोंबल रोमँटिक भरलंय?


"आय मिन, निमिषाला ही कंपोजिशन खूप अपील होईल रे." किशोर सारवासारवीच्या मूड मध्ये आला. अच्छा, म्हणजे हा असा प्रकार होता. माझ्या डोळ्यासमोर एकदम गॅस संपण्यात आलाय या चिंतेने काजळी धरलेली निमिषा आणि पोराच्या डोक्याला तेल चोपडून आंघोळीस नेणारा किशोर चमकले.


इतक्यात कावासाकी चहा घेऊन आला. एकीकडून कावासाकीचे प्रा-चीन मराठी आणि दुसरीकडून किशोरच्या आंग्लमराठीचे थैमान यातील वाग्बाण चकवून मी कषायपान करण्यात मग्न झालो. बिस्किटे संपली आणि चहा रिता झाला. या दोघांचे खंडणखाद्य मात्र सुरूच होते. आधीच धुपाच्या उग्र वासाने नाकपुड्या बधिर झाल्या होत्या त्यात विदेशी बिड्यांचा वास मिसळल्या जात होता. खरंच माणूस का जगतो? डोके हा मानेवर डोलणारा अवयव नसून एक दुखणारे अंग ही जाणीव बोचत होती. ह्या दर्पांमुळे माझ्या बाल मनावर वाईट परिणाम झाले तर! मी अंमळ घाबरलोच आणि चर्चेचे शिंगरू थांबवण्याचा निश्चय केला. चहाची ढेकर आली.


संध्याकाळी, संध्याकाळी,
संध्याची आई गोरी,
अन संध्याचे बाबाही गोरे,
तरीपण संध्या का काळी?


किशोर अन् कावासिकी या दोघांनीही चमकून माझ्याकडे पाहिले. कॉलेमध्ये असताना आमच्या वर्गातील संध्या नावाच्या मैत्रिणीला चिडवायला आम्ही एक चारोळी रचली होती. त्याचा वज्रासारखा केलेला प्रयोग यशस्वी झाला म्हणून मी खूश झालो. अरे साहित्यिकांनो समजलात काय विद्रोही नवकवीला वगैरे विचार मनात बरळून गेले.


"वॉऽऽवू, व्हॉट अ हाय क्लास हायकू मॅन, ग्रेटच हं" किशोर वदला.


"मुक्तकामध्ये श्लेषाच्या अंगाने झालेला विनोदाचा प्रवास प्रेक्षणीय आहे." इति कावासाकी.


चारोळीबद्दल बिचाऱ्यांना विशेष कल्पना नव्हती. "करायला गेलो काय, अन झाले उलटेच पाय!" म्हणी खरंच विज्ञानाच्या खाणी का आहेत हे अशा प्रकारे कळल्याने मी कपाळावर हात मारून घेतला.