मध्यरात्रीनंतर कसल्यातरी आवाजानं राजारामची झोप चाळवली गेली. पडल्या पडल्याच त्यानं डोळे किलकिले केले. वेळेचा काहीच अंदाज येत नव्हता. गुहेत काळोख मिट्ट होता. डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं. रातकिड्यांनी एका सुरात किरकिर लावली होती. पलिकडल्या जंगलातल्या पानांची सळसळ अन फांद्यांचे एकमेकांवर घासले गेल्याचे आवाज येत होते. ओढ्याच्या पाण्याचा एक संथ प्रवाह ऐकू येत होता. आणि राजारामच्या लक्षात आलं की या साऱ्या आवाजाबरोबरच गुहेतनंच आणखी कसलातरी आवाज येतोय... कोणाच्या तरी श्वासोश्वासाचा पण आवाज... नक्कीच... राजारामच्या ओठांना घशाला कोरड पडली, हातापायाला कापरं भरल्यासारखं झालं. गुहेत राजारामशिवाय अजूनही कोणीतरी होतं .... पण म्हणजे कोण .. हा श्वासोश्वास माणसाचा नाही ... म्हणजे कुठलं तरी श्वापद .. खासच ... राजारामनं डाव्या हातानं चाचपून बंदुक जवळच असल्याची खात्री करून घेतली. उजव्या हाताला सुरा होता तो त्यानं जवळ घेतला आणि त्याची मूठ हातात घट्ट पकडली. दोन्ही कोपरांनी जमिनीवर जोर देऊन त्यानं डोकं हलकेच वर उचललं. अंधारात त्याच्या डोळ्यांनी सावध वेध घ्यायला सुरवात केली... आणि त्याच्या पासून साधारण तीन चार ढांगांवर गुहेच्या दरवाज्याजवळ दोन पिवळे दिवे चमकले ... बापरे ... सर्रकन राजारामच्या अंगावर काटा उभा राहिला... तिथेच काहीतरी होतं ... पण काहीतरी म्हणजे काय? .. वाघ .. की गवा की अस्वल... नक्की अंदाज येत नव्हता, पण श्वापद मोठं होतं खासच..
राजारामनं डोकं हलकेच परत अंथरुणावर टेकलं. डोळे उघडे ठेवून, सुरा हातातच धरून राजाराम तसाच पडून राहिला. नक्की काय करायचं काहीच ठरवता येईना. कुठंही खुट्ट झालं की राजारामला वाटायचं की श्वापद आपल्यावर उडी घ्यायला उठलं. त्याला त्याची स्वतःच्या छातीची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. परंतु बराच वेळ असाच गेला तरी विशेष असं काहीच घडलं नाही आणि एक गोष्ट राजारामच्या लक्षात आली की या प्राण्याचा राजारामवर हल्ला करायचा इरादा नव्हता. या विचारानं त्याला थोडासा धीर आला. 'उजाडलं की जाईल बहुतेक निघून'. पण कुणी सांगावं कदाचित राजाराम जागा झाल्यावरही हल्ला करायचं हे. विचारांची आवर्तनं संपत नव्हती. 'एक काम करावं. उजाडल्यावरही हा प्राणी जर हालला नाही तर सरळ बंदुकीनं उडवून टाकू.' राजारामनं पक्कं ठरवून टाकलं.
बाहेर हळूहळू फटफटायला लागलं. वातावरणात थंडी पसरली. पक्ष्यांच्या आवाजाचा गलबला वाढायला लागला. दयाळानं सुरेल स्वरात आळवायला सुरवात केली. गुहेतलेही आकार स्पष्ट व्हायला लागले. राजाराम हलकेच कुशीवर वळला आणि समोरचं दृश्य बघून त्याची बोबडीच वळली... समोर पसरलेलं श्वापद आता स्पष्ट दिसत होतं... आणि तो एक पूर्ण वाढ झालेला मोठ्ठा चित्ता होता. पुढचे दोन्ही पाय त्यानं पुढं पसरले होते. हनुवटी पायांवर टेकवून तो राजारामकडेच बघत होता... राजाराम कुशीवर वळलेला बघून त्यानं हलकेच मान उचलली... डोळे उघडेच अन राजारामवर रोखलेले ... थंड काळजाचा थरकाप उडवणारी नजर... दोनच मिनिटं त्यानं राजारामकडे बघून घेतलं अन जणू 'हं.. हा काय करणार?' अशा भावनेनं परत हनुवटी पायांवर टेकली. राजारामचा श्वासच बंद व्हायची पाळी आली होती...
राजारामला नक्की काहीच निर्णय घेता येईना. एकदा वाटलं, पटकन बंदुक उचलून गोळी घालावी. पण चित्ता अशा अंतरावर होता की एवढ्या जवळच्या अंतरावर नेम धरणं अवघड होतं. एकदा वाटलं हातातल्या सुऱ्यानं वर्मी वार करावा. पण शाश्वती काय की एका वारात हा मरेलच याची. पुन्हा नेम चुकला अन वार वर्मी बसलाच नाही किंवा निसटताच बसला तर? म्हणजे गच्छंतीच..! पळून जावं म्हटलं तर या जंगलात आपण काय पळू शकणार?
बाहेर पूर्वेचं आकाश लख्खं व्हायला लागलं होतं. गुहेतही सकाळचा स्वच्छ प्रकाश पसरला होता. राजारामची भीती आता बरीच चेपली होती. त्यानं चित्त्याचं नीट निरिक्षण केलं आणि त्याच्या लक्षात आलं ती चित्तीण होती, मादी. तिच्या पुढच्या पंज्यांभोवती आणि तोंडाभोवती रक्त लागलेलं दिसत होतं. "अच्छा म्हणजे रात्री मनाजोगतं जेवण झालेलं दिसतंय," राजारामनं अंदाज बांधला. "हे चांगलं झालं, म्हणजे आत्ता सकाळी सकाळी तिला खाखा तर सुटणार नाही..!" हा विचार मनाला सुखद वाटला.
ती खरोखरच सुरेख दिसणारी चित्तीण होती. गुहेतल्या उजेडात तिची काया आता चकाकत होती. सोनेरी रंगावर काळे मोठे तुकडे उठून दिसत होते. पोटाकडचा भाग पांढराशुभ्र आणि मऊ मखमली होता. पायांवरची कातडी पण सोनेरी होती. पंज्यांच्या वरती पायांवर, एखाद्या तरुणीच्या पायातल्या पैंजणांसारखी, सुरेख नाजूक काळी रेघ होती. लांबलचक सोनेरी पांढरी शेपटी तिनं निर्धास्तपणं मागे सोडून दिली होती. चंदेरी मिशा असलेला तिचा चेहेरा डोळे मिटल्यावर तर फारच मोहक दिसायचा.
'काल सकाळी कदाचित मी पोलिसांच्या गोळ्यांचा नेम झालो असतो' राजारामनं विचार केला. सहा महिन्यांपूर्वी घर सोडलं, त्याचवेळेस जीवाची पर्वा पण सोडून दिली. आता जीवाची पर्वा सोडलीच म्हटलं तर या चित्तिणीला तरी कशाला घाबरायचं? अंगावर आली तर आपल्या सुऱ्यानिशी लढत देऊ. फार फार तर काय मरण येईल. त्याला तर मागचे सहा महिने पाठुंगळीला घेऊनच हिंडतोय. सूज्ञ विचार...
राजाराम उठून बसला. चित्तिणीनंही डोळे उघडले, मान वर केली, राजारामकडे बघितलं आणि जणू 'चला उठायचं का?' असं म्हटल्याप्रमाणे हलकेच उठली. राजाराम सुरा हातात घट्ट ठेऊन चित्तिणीवर लक्ष ठेवून होता. मांजरं जसा आळस देतात, तसं पाठ उंच करून, पंजे ताणून चित्तिणीनं व्यवस्थित आळस दिला आणि तोंड उघडून मोठी जांभई दिली. राजारामला त्यावेळेस तिच्या आतल्या सुळ्यांचं 'रमणीय' दर्शन पण घडलं! व्यवस्थित आळोखे पिळोखे देऊन झाल्यावर ती हलकेच वळली आणि गुहेच्या दरवाज्याच्या बाहेर जाऊन, उन्हात बसून पंज्यांच्या भोवती लागलेलं रक्त चाटू पुसू लागली. राजारामनं आता मात्र उठायचं ठरवलं कारण चित्तिणीनं एक गोष्ट जणू त्याला सांगून टाकली होती की निदान आत्ता लगेच तरी तिचा त्याच्यावर हल्ला करायचा कोणताच विचार नव्हता.
राजाराम उठला. तोही गुहेच्या बाहेर एका मोठ्या दगडावर येऊन बसला. लक्ष चित्तिणीकडेच आणि उजव्या हातात सुरा घट्ट... चित्तिणीनं आपली साफसफाई संपवली होती राजेशाही थाटात ती उन्हात ऊब घेत बसली होती. या सकाळच्या उन्हात तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. सोन्याच्या झळाळीवर नजर ठरत नव्हती. तिनं पांघरलेला सोनेरी काळा अंगरखा जसा नाजूक अन सुंदर होता तसेच तिचे दात, सुळे अन स्नायू मजबूत अन बळकट होते.
एक क्षण राजारामला असं वाटलं की या गुहेच्या बाहेर बसून समोरच्या जंगलावर लक्ष ठेवणारी ही या जंगलाची अनभषिक्त सम्राज्ञी आहे. इथं हिचं राज्य आहे. हिच्या दयेनं आपण इथं राहू शकतोय. खऱ्या अर्थानं ही इथली सुलताना आहे... सुलताना... आणि राजारामच्या तोंडातनं नकळत अस्फुट हाक आली "सुलताssना...". सुलतानानं एकदाच मान वळवून राजारामकडे बघितलं आणि पुन्हा आपल्याच मस्तीत जंगलाचा वेध घेत राहिली.
राजाराम उठून दगडांवरून उतरत खाली ओढ्यापाशी गेला. कपडे काढून त्यानं स्वच्छ आंघोळ केली. राजारामच्या पाठोपाठ सुलताना पण दगडांवरनं उड्या घेत खाली आली होती. दगडांवरून उड्या घेताना तिचा प्रत्येक स्नायू लयबद्ध रीतीनं हालत होता.
आंघोळ उरकून राजाराम वरती गुहेपाशी आला आणि गुहेच्या दरवाज्यापाशीच उन्हात बसला. सुलताना राजारामच्या अगदी शेजारी येऊन उभी राहीली. राजारामच्या हातात सुरा सततच तयार होता. धीर करून त्यानं दुसऱ्या हातानं सुलतानाच्या डोक्यावर हलकेच थोपटल्यासारखं केलं. सुलतानानं पसंतीदर्शक मान आणखी थोडी पुढे केली. राजाराम तिच्या डोक्यावरनं हलकेच हात फिरवत होता. हळूहळू राजारामनं तिच्या पूर्ण अंगावरनं हात फिरवायला सुरवात केली. तिच्या मखमली अंगरख्यातून आता त्याचा हात तिच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत फिरत होता. सुलतानाही सुखावली होती आणि आणखी थोडी पुढे सरकली होती. तिच्या डोळ्यात आता अंगार दिसत नव्हता. तिची नजर आता छातीत धडकी भरवत नव्हती. राजारामनं तिच्या डोक्यावर, पाठीच्या मणक्यांवर खाजवल्यासारखं केलं. सुलताना पण खुशीत आली आणि आपली खुशी व्यक्त करण्यासाठी तिनं एक छोटीशी डरकाळी फोडली. पण हा आवाजही एवढा मोठा होता की त्यानंही एखाद्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं असतं...!
एका बाजूला राजाराम हा पण विचार करत होता की हिला आत्ताच संपवून टाकावं. आपल्या हातातला सुरा जर आत्ता आरपार गेला तर हिला उलट हल्ला करायचि संधी सुध्दा मिळायची नाही. गळ्यात किंवा पोटात जर पातं नीट आतपर्यंत गेलं तर सारं जमून जाईल. पण पुन्हा विचार आला की हे करायचंच का? कशाला मारायचं हिला? हिच्या डोळ्यात, चेहऱ्यावर मैत्रीभावना अगदी स्पष्ट दिसतीये. पण दुसरं मन लगेच म्हणायचं ' बाबारे आत्ता हिला भूक लागलेली नाही म्हणून ठीक आहे, पण एकदा का हिला भूक लागली की समोर एवढं भक्ष्य सहज उपलब्ध असताना ती दुसरीकडे भक्ष्य शोधायला जाईल?' मनाचा हा खेळ खूप वेळ चालू होता...
- क्रमशः