सावळ्याचा ऋतू
सावळ्याचा ऋतू आला
अवघी सृष्टीच बासुरी
कळीकळींतून राधा
झाली मोहन बावरी
सावळ्याचा ऋतू आला
वेली श्रृंगारात दंग
थेंबाथेंबातले गाणे
म्हणे गोविंद गोविंद
सावळ्याचा ऋतू आला
वारा पिसाट उनाड
चिरा एकेक निखळे
ढळे जुन्याचा पहाड
सावळ्याचा ऋतू आला
क्षितिजरेखा धूसर
रंग-गंधि लसलसे
नवा कोवळा आकार
सावळ्याचा ऋतू आला
शाल हिरवी लेवून
घननिळ सृष्टी झाली
काळे जहर पिऊन
सावळ्याचा ऋतू आला
तृप्तीला ग सुटे गंध
काळ्याशार डोहालाही
जडे हिरव्याचा छंद!
--मुक्ता