हरवलेलेसे काही - भाग ३

नील हसत,"काय राणीसाहेब, कशात गुंग आहात एवढ्या? मी तर समीरचं प्रदर्शन बघूनही आलो. पीहू.. खरंच सांगतो तुला.. तू यायलाच हवं होतंस.. इतके सुंदर चित्रं होती की मी तुला काय सांगू ! मी भेटलो समीरला, जरा विचित्रच माणूस वाटला मला. माहीतेय का तुला? ही आसामी आधी एका मोठ्या कंपनीत कामाला होती पण मग अचानक ती सोडून चित्रकार झाली. त्याने अजून लग्नही नाही केलेलं ! लोक म्हणतात की कोणावर तरी मनापासून प्रेम करत होते पण तिला मिळवू शकला नाही. बस्स.. तिच्याच आठवणीत कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेऊन बसलाय..."
नील त्याच्यात्याच्याच धुंदीत कायकाय बोलत सुटला होता पण माझं मन मात्र,"लग्न नाही केलं..' याच शब्दांभोवती अडखळलं होतं. 'समीर मला अजून विसरला नाही?'
मला हरवलेल्या मनःस्थितीत पाहून नील मध्येच म्हणाला,"पीहू, काय झालं? तू अशी टेन्शनमध्ये असल्यासारखी का दिसते आहेस?"
"काही नाही. थोडंसं थकल्यासारखं वाटतं आहे बाकी काही नाही." असं म्हणून मी बोलणं टाळलं.

दुसऱ्या दिवशी दुपारी नीलचा फोन आला,"पीहू, आज संध्याकाळी माझा एक मित्र येणार आहे घरी. झकास काहीतरी खायला करशील बरं का..."
माझं मन तर अजूनही समीरच्याच विचारांमध्ये गुंग होतं. कित्ती प्रश्न होते जे त्याला विचारायचे होते.. असं वाटलं जाऊन त्याला एकदा भेटून यावं. मग वाटलं भेटून काय मिळेल? मी अशीच उदास मनाने घरातली कामं करत बसले. संध्याकाळी मी नील घरी येण्याची वाट बघत बसले. तेव्हाच फोन वाजला. नीलचा होता. "पीहू, मला थोडंसं काम आहे अजून ऑफीसमध्ये. माझा मित्र येईल तर त्याचा नीट पाहुणचार कर.. मी येतोच लवकर कामं आटोपून.."
मी खूपच चिडले. ही काय पद्धत झाली? त्याच्या मित्राशी ना माझी ओळख ना पाळख आणि म्हणे पाहुणचार कर..

संध्याकाळी बरोबर ६ला दरवाजाची घंटी वाजली. दरवाजा उघडताच समोर दिसलेल्या माणसाला पाहून मी आश्चर्यचकित झाले.
"समीर.. तू इथे?"
मला बघताच समीरच्या हातातली निशिगंधाची फुले थरथरली.
"पीहू !"
काही वेळ काहीच न बोलता आम्ही असेच उभे होतो. मला समजत नव्हतं की मी नक्की काय करू? माझी मनःस्थिती ओळखून तो म्हणाला,"मला नीलजींनी इथे बोलावलं आहे. हे त्यांचंच घर आहे ना?"
मी त्याला आत यायची परवानगी देत म्हटलं,"हो... त्यांचंच घर आहे आणि मी त्यांची बायको.."
मला समजत नव्हतं की नीलने समीरला का बोलावलं आहे? तेव्हाच समीरने विचारलं,"कशीयेस पीहू?"
मी हसत,"खूप छान.. खूप आनंदात !"
"पीहू... कधी माफ करू शकशील का मला?"
मी काहीशा तिरसटपणे,"माफी? कसली माफी समीरजी? तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलंत. त्यामुळे माझ्यावर काय गुदरली याच्याशी तुम्हाला काय देणंघेणं? हे सगळं सोडून द्या.. जितक्यापर्यंत मला आठवतंय तुम्ही तर एक मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला होतात, मग अचानक ते सगळं सोडून मध्येच चित्रकार कसे काय झालात?"
समीर उदासवाणं हसत म्हणाला,"वेळेसोबतच खूप गोष्टी मागे सुटून जातात.. काही सोडून द्याव्या लागतात. कोणी होती जी मला चित्रकाराच्या रुपात पाहू इच्छित होती पण एके दिवशी माझ्यावर रुसून न जाणो कुठे निघून गेली. तिचं स्वप्न पूर्ण करून तिला माझ्या रंगांमध्ये गुंफायचा प्रयत्न करत असतो."
कुठल्याशा वेदनेने मी,"इतकंच जर प्रेम होतं तर जाऊच का दिलंत तिला?"
समीर मान खाली घालत,"जर मला माहिती असतं की माझ्या क्षणैक कमजोरीने इतकी मोठी उलथापलथ होऊन जाईल.. तर कदाचित... ! माहितेय पीहू.. त्या दिवशी तुझ्यापासून दूर जाताना एकेक पाऊल उचलताना असं वाटत होतं जणू काही माझ्या हातातून कुठलीतरी अनमोल गोष्ट निघून चालली आहे. सहा महिने जे मी तुझ्याशिवाय सिंगापूरला काढले.. असे होते जणू काही सहा वर्ष ! तेव्हा मला जाणवलं की तू माझ्या आयुष्यातली किती महत्त्वाची व्यक्ती बनून गेली होतीस. तिथून परत येताना मी निर्णय घेतला होता की इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल पण मी तुला आपलंसं करूनच राहीन. परत येताच मी तुझ्या घरी आलो होतो. तेव्हा तुझी बहिण म्हणाली की तुझं.. !"
इतकं बोलून समीर थांबला. मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाला,"तेव्हा असं वाटलं होतं पीहू की कोणीतरी माझ्यावाटची जमीन आणि आकाश दोन्ही माझ्यापासून हिरावून घेतलं आहे. आठवतं तुला.. तूच म्हणायचीस की माझ्या या हलगर्जीमुळे कधी मला खूप किंमत मोजावी लागेल असं? ती किंमत तूच असशील हा तर मी विचारच केला नव्हता. तुझी सोबत मला जगण्याची हिंमत द्यायची, तुझ्या जाण्यानंतर वाटलं की आता तुझ्यासाठी मरूनच जावं. प्रत्येक क्षण.. अग्गदी प्रत्येक क्षण मला आसपास तूच हवी होतीस. कसला वेडेपणा होता तो.. जे अशक्य होतं तेच सगळं मला हवं होतं. घरातले मला समजावून समजावून थकले पण मी दुसऱ्या कोणाशी लग्न करण्यासाठी तयार नाही झालो. मग एके दिवशी आई म्हणाली,"ठीके समीर. जा. जिला तू आपलंसं करू इच्छितोस तिला आपल्या घरची सून बनवून घेऊन ये." आईचं हे बोलणं ऐकून आधी तर मी खूप जोराने हसलो आणि मग तिच्याच गळ्यात पडून एखाद्या लहान मुलासारखा रडलो. मला काहीच न बोलता आई केवळ माझ्या केसातून हात फिरवत होती. आता कदाचित तिलाही कळलं होतं की या सगळ्याला खूप उशीर झाला आहे.

क्रमशः