' निरोप'

कामावर निघालेल्या एका आईने आपल्या मुलीचा घेतलेला


' निरोप'


चल, निघते मी
येते म्हणत नाही
कारण येण्याची खात्री नाही
इथून आधी बस पकडेन
त्यात बाँब असेल, नसेल
नसला तर सुटेन
असला तरीही सुटेन
मग ट्रेन...मग ऑफिस...
सुखरूप पोचले तर फोन करणार नाही
नाहीच पोचले, तर फोन आपणहून येईल
परत येताना हे सगळं उलट्या क्रमाने...
घरी पोचले तर ठीकच आहे
आणि नाही पोचले,
तरीही ठीक राहण्याची काळजी तू घे
आजीच्या औषधाच्या वेळा लक्षात ठेव
चिंटूचा अभ्यास घेत जा
सर्व बिलं वेळच्या वेळी भरण्याची बाबांना आठवण कर
स्वतःला जप, घराला जप,
चल, निघते मी.


(मी राधिका यांच्या वतीने प्रकाशित)