संधी- २

प्राचार्यांनी डॉ. स्वामीनाथन कडुन आलेले ते पत्र सिजीकें च्या हातात दिले, काहीश्या नव्हे तर भरपुरच अनिच्छेने सिजीकें नी ते वाचले आणि प्राचार्यांना अपेक्षित होते तेच झाले..


सिजीके उसळले, ताडताड तोंडाचा पट्टा सुरु झाला..


" कसले डोंबलाचे संशोधन! आम्ही ईथे मरमर राबुन शिकवतो, त्यातच सगळा दिवस संपतो, त्यातुन जरा सुटका होते ते न होते तो हे काम बोकांडी मारताहेत, आणि काम तरी कसले तर म्हणे  गलिच्छ वस्तांतुन हिंडायचे  आणि त्या अडाण्यांच्या विनवण्यां करुन माहीती गोळा करायची"


"पण त्याचा मोबद्ला मिळणार आहे" - प्राचार्य


"मोबदला? फ़ॉर्मला १० रुपड्या हा काय मोबदला म्हणायचा? आमच्यापुढे हे असे चणे-फ़ुटाणे फ़ेकुन , हे राजश्री, तिथे विद्यापीठातल्या वातानुकुलित दालनात बसुन आम्ही पुरवलेल्याच माहितीवरुन झ्याकीत निष्कर्ष काढणार, पुरस्कार लाटणार, अनुदानें उकळणार, अरे वा रे वा!"


"विद्यापीठाचे काम आहे, काहीतरी विचार करुनच आपल्याकडे पाठवले असणार ना? " - प्राचार्य


"बोडख्याचा विचार!  ही प्रश्नावली तर पहा, संशोधनाचा विषय काय, रोख काय आणि प्रश्न काय विचारलेत, आहा हा.  हे असले प्रश्न विचारुन कसले होणार संशोधन आणि काय निघणार निष्कर्ष? आणि काय हो, शेवटी ह्याचा काही उपयोग होणार आहे का? असे शेकडो संशोधन प्रकल्प झाले असतील आज वर, त्यांचे काय झाले? हा पण असाच धुळ खात पडणार ना?"


"म्हणजे हे काम करायची तुमची ईच्छा नाही तर, ठिक आहे , मी बघतो काय करायचे ते " - प्राचार्य


"नाही, आता तुम्ही सक्ती करत असाल तर  ..." - सिजीके


"नको, सिजीके, आपण कष्ट नका घेऊ, मी दुसरी काही व्यवस्था करतो, तुम्ही जाउ शकता" - प्राचार्य


सिजीके  चर्फ़डत (आता दुप्पट!) , दाणदाण पाय आपटत परतले.


तोंडाची टकळी चालुच..


" माहीती आहे, हा स्वामीनाथन, ह्याला साधा 'एस वाय बी ए ' चा पेपर सेट करता येणार नाही आणि निघालाय मारे संशोधन करायला. अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग म्हणे , कसा पोचलाय तिथे ते माहीती आहे मला, सारा वशिल्याचा कारभार, पक्का लाळघोटु.. असले संशोधन करायला बुद्धीमत्ता लागते, व्यासंग लागतो, आता माझ्यात हे काय नाही का पण  मला संधीच मिळाली नाही, नाहीतर मी कुठल्या कुठे पोचलो असतो.."


खडपे आपली तासीका संपवुन परत येत होते न होते तो सिजीकेंचे चिरपरिचित पालुपद त्याना ऐकायला मिळाले, खडपे मंदसे हसले.


"हसु नका खडपे.." सिजीके कडाडले.


" तो विद्यापीठातला येडचाप कसले काम घेऊन आलाय ते पाह्यलत तर तुम्ही ही असेच चिडाल "


"खडपे सर , तुम्हास्नी , बोलीवलय.." - विठोबा शिपाई तो पर्यंत बोलवायला आलाच.


"खडपे, ह्याच साठी असणार बघा.." - सिजीके पुन्हा उचकले.


पण त्या कडे जरा दुर्लक्ष करत , खडपे तत्परतेने निघाले.


(पुढील भागात वाचा)