माणुसकीची अंत्ययात्रा

शेकडो चिता रचल्या गेल्या आज ह्या नगरीत सरणावरती


पण सरणही जळायचे थांबले उसासा टाकत एक क्षणभरी


 


चेहरे गमावलेले कित्येकांनी, तीच परवड असे हातापायांची


कुठल्या जन्मीचे पाप फेडले, असा काय गुन्हा केला ह्यांनी


 


श्रम गाळूनी अखंडित ह्यांनी, पळत ठेवली देशाची गाडी


अहोरात्र कष्ट करून, आर्थिक राजधानी ह्यांनी सजवली


 


ह्यांनाही होती मुले-लेकुरे, संसारातील अतूट नाती


वाट पाहणारे घरी कोणी, जे कायमचेच वाट पाहती


 


ह्यांनाही होती स्वप्ने उद्याची जी कायमची उद्ध्वस्त झाली


का ह्यांचे अश्रू, अश्रू नसती, फक्त पाण्याचे थेंब असती


 


प्रत्येक गाडीतून आज निघाली अंत्ययात्रा माणुसकीची


ह्या नगरीच्या सहनशीलतेची आज इथे सीमा गाठली


 


धीराची ह्यांच्या करून वाहवा, निर्लज्जपणाची कमाल झाली


मुकी बिचारी कुणीही हाका, अशी अवस्था तुम्हीच ना केली


 


सरणावरती आज जळाली, मान-मर्यादा ह्या नगरीची


तुमची चिता उद्या पेटवण्यासाठी सरणही येथे मिळणार नाही