ती तू आणि मी ......

प्रस्तावना


आधी माझं तिच्यावर प्रेम करणं,


मग तिच्यासाठी झुरणं


खूपसं सरूनही काहीतरी उरणं


माझं स्वत:शीच भांडणं


आणि मग ही कविता लिहिणं......


 


 


ती तू आणि मी


 


मी जिच्यावर प्रेम केलं ,


ती तू नाही असू शकत;


ती माझ्यासाठी जगते


तू नाही जगू शकत !!१!!


 


मी रोज ठरवतो ,


आता तुला भेटायचं नाही;


आणि डोळे मिटल्यावर पापणीत


तिचं चित्र उमटायचं राहात नाही !!२!!


 


तुझ्याशी न बोलता , न भेटता ,


मी राहू शकतो , जगू शकतो;


पण तिच्याशिवाय मात्र ,


एक क्षणही युगासारखा भासतो !!३!!


 


आम्हा दोघांमध्ये भांडणं होत नाहीत,


कारण ती मिटवायला दोघंही तयार असतो;


आपल्या दोघांमध्ये मात्र,


बिनभांडणाचाच अबोला चालतो !!४!!


 


मला माहिती आहे,


तू माझी नाही असू शकत;


पण ती मात्र कधी


दुसर्‍याची नाही होऊ शकत !!५!!


 


तुम्हा दोघींमध्ये एवढा फरक असूनही


माझा जीव दोघींत सारखाच गुंतला आहे;


कारण खरं सांगायचं तर,


तू माझ्या पुढ्यात आणि ती माझ्या मनात आहे !!६!!


 


तुझा चेहरा काय, मी  केंव्हाही पाहू शकतो,


पण तिचा चेहरा मात्र मी अजून नाही पाहिलेला;


पण जेंव्हा जेंव्हा मी विचार करतो 'तो कसा असेल?'


तेंव्हा मला तो सपडतो "तुझ्या चेहर्‍यामध्ये" दडलेला !!७!!