होते कुरूप वेडे -(भाग १)

(नमस्कार.  मनोगतींना माझ्या आवडत्या दोन इटालियन लेखकांची ओळख करून द्यायची इच्छा आहे. पैकी पहिला म्हणजे Italo Calvino. यांच्या अनेक कथा, नीतिकथा/तात्पर्यकथा अतिशय वेगळ्या वाटेने जाणाऱ्या आहेत.  मला आवडलेला एक विशेष मुद्दा फ़क्त नोंदवून ठेवतो. यांच्या अनेक कथा या स्थल काल, व्यक्ती, समाज यांच्या पलिकडे जाणऱ्या आहेत. त्यातील पात्रे, घटना इ. एखाद्या अन्य कालखंडात, अन्य भूमीवर वा अन्य समाजासंदर्भात लिहिल्या तरी त्या कथेच्या मूळ गाभ्याला मुळीच धक्का लागत. नाही. एखादा भाषातज्ज्ञ म्हणेल की सर्वच नीतिकथा अशा असतात. परंतु मला तसे वाटत नाही. कधी या लेखकावर स्वतंत्र लेख लिहिला तर त्यात खुलासा करेन.


त्याच्या एका लहानशा कथेचे भाषांतर म्हणा वा अनुवाद म्हणा, इथे देत आहे. कथा इतकी सुंदर आहे की या दोन पानी कथेवर चारच काय दहा पाने लिहू शकेन. पण कोणी वाचणार नाही म्हणून कथाच देतो. मूळ कथेचे नाव आहे The Black Sheep.)


कोण्या एका गावी सगळेच चोर होते.


प्रत्येकजण रात्री आपली पिशवी आणि काजळी धरलेले कंदिल घेऊन बाहेर पडत आणि एखाद्या शेजाऱ्याचे घर लुटून पहाटे जेंव्हा आपल्या घरी परतुन येत तेंव्हा आपलेही घर लुटले गेलेले त्यांना आढळून येई.


अशा तऱ्हेने सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते. या व्यवस्थेत कुणाचेच नुकसान होत नसे वा कुणाचा फायदा. पहिला दुसऱ्याच्या घरी चोरी करे, तर दुसरा तिसऱ्याच्या. अशा तऱ्हेने चालू रहात पुन्हा अखेरचा पहिल्याच्या घरी चोरी करून साखळी पूर्ण करी. गावातील व्यापारही सर्वस्वी फसवण्याच्या कलेवर अवलंबून होता. विक्रेते आणि ग्राहक दोघेही तिचा यथाशक्ती वापर करीत. येथील नगरपालिका ही एक गुंडांचा अड्डाच होती. तिचे शासक आपल्या नागरिकांना छळण्याचे आपले एकमेव काम मोठ्या निष्ठेने करीत असत. तर नागरिकही आपल्या परीने त्याना ठकवण्याचे काम करीत असत. अशा तऱ्हेने या गावातील जीवन सुरळित चालू होते.


कुठून कोण जाणे, पण एके दिवशी त्या गावात एक प्रामाणिक माणूस राहण्यास आला.


रात्री आपली पिशवी आणि कंदिल घेऊन लुटण्यास बाहेर पडण्याऐवजी तो घरीच धूम्रपान करीत पुस्तक वाचत बसला. काही चोर त्याचे घर लुटण्यास आले आणि घरात दिवा चालू असलेला पाहून हात हलवित परतले.


असे काही दिवस गेले. अखेर गावच्या काही 'प्रतिष्ठित' मंडळी त्या प्रामाणिक माणसाला भेटायला गेली. त्यांनी त्याला तेथील सर्व परिस्थिती नीट समजावून सांगितली. त्याला जर इतराना लुटण्याची इच्छा नसेल तर किमान त्याने घरी राहून इतरांच्या लुटण्याच्या आड येऊ नये असे सुचवले. त्या प्रामाणिक माणसाकडे या तर्काला काही उत्तरच नव्हते.


त्या दिवशी पासून त्यानेही इतरांप्रमाणेच रात्री बाहेर पडून पहाटे घरी परत येण्याचा क्रम सुरू केला. फ़क्त त्याने इतर कोणालाही कधी लुटले नाही, कारण तो प्रामाणिक माणूस होता. तो आपला जवळच्या नदीवरील पुलावर जाऊन बसे आणि चांदण्यातील नदीचे पात्र न्याहाळत राही. पहाटे जेंव्हा तो घरी परते तेंव्हा आपले घर लुटले गेल्याचे त्याला आढळून येई.


जेमतेम एकाच आठवड्यात तो प्रामाणिक माणूस पूर्ण निष्कांचन झाला. त्याच्याकडे खायला काही नव्हते आणि त्याचे घर पूर्ण रिकामे होते. अर्थातच त्याबद्दल तो कोणालाही दोष देऊ शकत नव्हता कारण ही परिस्थिती त्यानेच ओढवून घेतली होती.


परंतु यामुळे गावात एक वेगळीच समस्या निर्माण झाली...


 (क्रमशः)