वाचावे ते नवलच १

ब्रम्हकमळ


लहानपणापासून मी ब्रम्हकमळाची कीर्ती ऐकली होती. हे दुर्मिळ फूल क्वचितच उमलते आणि भाग्यवान लोकांनाच पहायला मिळते. कुणाच्या तरी घरी हे फूल फुलल्याचा सचित्र वृत्तांत वाचून माझी उत्कन्ठा अधिकच जागृत झाली.


गेल्या वर्षी अचानक आमच्याच इमारतीमध्ये कुणीतरी याची रोपे लावली असल्याचे आणि त्याला कळी धरली असल्याचे कळले व अधीरपणे वाट पहाणे सुरू झाले. ते उमलणार असल्याची कुणकुण लागली आणि नात्यातील पहिलटकरीण दवाखान्यात गेली असल्याप्रमाणे आमच्या येरझारा सुरू झाल्या. अखेर रात्री ती कळी उमलायला लागली आणि मध्यरात्रीपर्यंत ते फूल पूर्णपणे फुलले. त्याचे अनुपम सौन्दर्य व मोहक सुगन्ध यांचा आस्वाद घेऊन त्याचे गुण गात आम्ही कृतार्थ झालो.


आणि आता पेपरमध्ये आलंय की सीबीडीमध्ये कुणाच्या तरी घरी म्हणे ब्रम्हकमळांची बहारच आली आहे. उद्या त्याचं पीकसुद्धा यायला लागायचं. मग त्याचं काय कौतुक राहणार?