वेगळी....

वेगळी...!


सहानुभुती व्यर्थ मजला,
माझी व्यथा वेगळी....
काय मी सांगु कुणाला..?
माझी कथा वेगळी..!!


विश्वपटी या मी स्वतःला
प्यादी जरीही मानिले,
सारेच राजे या इथे,
यांची प्रथा वेगळी....
काय मी सांगु कुणाला..?
माझी कथा वेगळी..!!


भलतीकडे ही वाट नेते,
जायचे भलतीकडे...
साध्य माझे वेगळे
अन् सिद्धता वेगळी....
काय मी सांगु कुणाला..?
माझी कथा वेगळी..!!


मोजिले मी पाप माझे,
जी श्रुंखला गुंफली...
चित्रगुप्त पण वाचतो ती
सर्वथा वेगळी....
काय मी सांगु कुणाला..?
माझी कथा वेगळी..!!


आजवर कित्येकदा तू,
यावे असे वाटले,
मृत्यों! अरे, पण आजची ही
अनिवार्यता वेगळी...
काय मी सांगु कुणाला..?
माझी कथा वेगळी..!!


लाजताना, हासताना पाहिले
गं मी तुला..
हाय! पण ही आजची,
तटस्थता वेगळी...
काय मी सांगु कुणाला..?
माझी कथा वेगळी..!!


यमसदनी मज सोडुनी ते
स्मितमुखी ते परतले...
(याहुनी नाही कुणाची
सांगता वेगळी.......?)
काय मी सांगु कुणाला..?
माझी कथा वेगळी..!!