बेडकाचे जग

नमस्कार मंडळी,
(लहानपणापासून अनेकदा ऐकलेली गोष्ट.)


फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट.
एकदा एक समुद्रात राहणारा बेडूक, अचानक विहिरीत जाऊन पडला.
विहिरीमध्ये एकदम खळबळ झाली. या नव्या पाहुण्याला बघायला बरेच बेडूक प्रजाजन जमले. बातमी राजाच्या कानावर गेली. राजाही लगबगीने पुढे आला.


नमस्कार वगैरे सोपस्कार झाल्यावर बेडूकराजा आणि समुद्रातला बेडूक गप्पा मारू लागले. राजा म्हणाला, "तू कोठून आलास?". बेडूक म्हणाला," मी समुद्रात राहायचो तिथूनच इथे आलो." राजाने विचारले, "तुमच्या विहिरीचे नाव समुद्र असे आहे का?" त्यावर बेडूक उत्तरला, "नाही समुद्र हा स्वतःच समुद्र आहे. तिथे पुष्कळच पाणी असते." राजा म्हणाला म्हणजे या विहिरीच्या निम्मा तर नक्कीच असणार ना!" बेडूक म्हणाला," नाही. समुद्र फारच मोठा असतो, त्या वर मोठमोठ्या लाटा उठतात. फार म्हणजे फार मोठा असतो."


ते ऐकून बेडूकराजाने एक लांब उडी मारली व विचारले, " इतका मोठा असतो समुद्र?" बेडूक म्हणाला नाही या पेक्षा अतिशयच मोठा असतो." मग राजाने विहरीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत उडी मारली व विचारले," बरं ! तर मग काय तुझा समुद्र इतका मोठा आहे?" यावर बेडकाने नाही असे मानेनेच सांगितले. त्यावर तो राजा म्हणाला, "हे कसे शक्य आहे या पेक्षा अजून मोठे काही असूच शकत नाही. या वर तो बेडूक चूप बसला.


-- लिखाळ.