कुंभार आणि गाढव

नमस्कार,
(लहानपणापासून अनेकदा ऐकलेली कथा.)


फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट.
एका गावात एक कुंभार राहत असतो. बाजाराच्या दिवशी भल्या पहाटे तो आणि त्याचा लहान मुलगा गाढव विकत घेण्यासाठी तालुक्याच्या गावी जातात. चांगले धष्टपुष्ट असे एक गाढवाचे पिलू पसंत करून ते परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. बरेच अंतर चालायचे असते त्यामुळे दोघे गप्पागोष्टी करत नव्या साथीदारासह चालत असतात.


काही वेळाने त्यांना एक गावकरी भेटतो. नमस्कार वगैरे सोपस्कार झाल्यावर तो म्हणतो, "अरे हे काय? इतक्या उन्हाचे तुम्ही लांब जाणार आणि तुमच्या लेकाला काय पायी नेणार? अरे गाढव आहे ना आता! बस रे बाळ तू यावर." असे करता त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो.


होता होता बरेच अंतर पार होते आणि त्यांना अजून एक माणूस भेटतो. तो यांना पाहून हसायलाच लागतो. म्हणतो, "अरे गाढवावरून जायचे सोडून हा मनुष्य पायी काय चालतोय कळत नाहीये." हे ऐकल्यावर कुंभाराला सुद्धा वाटते की बरोबरच आहे, आता गाढवावरून गेलो तर घरी लवकर पोहोचू. म्हणून तो सुद्धा गाढवावर स्वार होतो. आता त्यांचा प्रवास मजेत चालू होतो.

होता होता बरेच अंतर पार होते आणि त्यांना अजून दोन माणसे भेटतात. त्यातला एक दुसऱ्याला म्हणत असतो," पाहा रे बाबा काय माणसे असतात. इतक्या लहान गाढवाला खांद्यावर घेऊन लांब जायचे, का आपण दोन दोन जणांनी त्यावर बसायचे." असे म्हणता कुंभाराला ते बरोबरंच वाटते. तो आणि त्याचा मुलगा खाली उतरतात आणि त्या गाढवाला खांद्यावर घेऊन त्यांचा पुढचा प्रवास चालू होतो.

होता होता ते बरेच अंतर पार करतात आणि एकदाचे घरी येऊन पोहोचतात.


दुसऱ्या दिवशी त्याला जो तो गवकरी हसत असतो आणि एकमेकांना सांगत असतो की बाजाराहून हे लोक नवे गाढव खांद्यावर टाकून घेऊन आले.
आता मात्र बिचारा कुंभार पार गोंधळून जातो.


---लिखाळ.