दूर निरोप

मोबाईल मुळे निरोप पाठवण्याची सुंदर सोय झाली आहे.  मित्र मैत्रिणीची मोबाईल वर झालेली ही दूर निरोपांची देवाण घेवाण कशी वाटते बघा.

मन तृषार्त आहे माझे
पाऊस होऊनी ये ना
चिंब चिंब भिजवूनी
तू पुन्हा परतुनी जा ना




मी पाऊस होऊनी येईन
तू अंगणात येशील का?
बंधने तोडूनी सारी
पाऊस चिंब होशील का?


नभी ओथंबून तू येता
पाऊस चिंब होईन मी
मऊ मृदुल करांनी तुजला
माझ्यात मिटून घेईन मी


मी पाऊस असतो सहसा
विक्राळ रुद्र पण असतो
जपशील जिवाला बरं का
आजकाल भरवसा नसतो


कशी जपू जिवाला माझ्या
तू दूर दूर असताना
कशी सावरून थांबू मी
तू कोसळून येताना


ही दूरता किती मोहक
शब्दांनी अंतर फिटले
एकत्र राहूनी सहसा
संवाद थांबती इथले


शब्दांनी अंतर मिटता
तू आसपास वावरशी
मी उदास होऊन बसता
तू खुदकन हसवुन जाशी


तू खुदकन हसवुन जाशी
म्हणताना खुदकन हसलीस
सुंदर हा शब्दच अपुरा
तू इतकी सुंदर दिसलीस



विविध तुझ्या रूपांचा
मज विस्मय होतो फार
बोलताना जराशी रुक्ष
लिहिताना तू हळुवार


मनी ओलावा जो माझ्या
अक्षरात पाझरून येतो
माझ्याही नकळत माझा
शब्दच हळवा होतो


खूप आठवण येता
मित्राची काय करावे?
सुगंधित हळवे हळवे
दूर निरोप लिहावे

तुषार जोशी, नागपूर
(यातले अर्धे निरोप मी लिहिलेत)