किस्से बँकेतले

      जपून वापरले नाहीत तर आपले शब्द आपल्याच अंगाशी कसे येतात हे दाखवणारे हे दोन प्रसंग.
      आमच्या बँकेत एका सुविद्य प्राध्यापकांचे खाते होते. माणूस अतिशय सज्जन. एकदा आमचा एक फॉर्म भरताना त्यांनी एक छोटीशी चूक केली.एस. बी. डिपार्टमेंटचा अधिकारी त्यांना फटकारून म्हणाला,"स्वतःला प्राध्यापक म्हणवता ना? मग एवढं साधं कळत नाही तुम्हाला?"
      प्राध्यापकांनी निमूटपणे आपली चूक सुधारली आणि ते निघून गेले. एवढ्या सज्जन माणसाचा आपल्या इथे अपमान व्हावा याचे आमच्यापैकी बऱ्याच जणांना वाईट वाटले.
      महिन्याभराने आमचा दुसरा एक ग्राहक मॅनेजरांकडे तक्रार घेऊन आला. त्याने खात्यात साठ हजारांचा एक चेक भरला होता. त्याची पासबुकात नोंद नव्हती. शोधाशोध केल्यावर लक्षात आले की तो चेक चुकून प्राध्यापकांच्या खात्यात जमा झाला होता आणि त्यांनी त्याचे पैसे सुद्धा काढून नेले होते. लेजर कीपर आणि एस. बी. अधिकाऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले.रक्कम मोठी होती आणि प्राध्यापकांशी चांगली ओळख होती म्हणून मॅनेजर स्वतः त्यांना भेटायला गेले. मॅनेजरांना बघताच ते म्हणाले,"या. मी कधीपासून तुमची वाट बघत होतो. तुमचे साठ हजार रुपये माझ्याकडे अगदी सुरक्षित आहेत. फक्त ते न्यायला तुमच्या एस. बी. ऑफिसरला पाठवा." काय करणार? साठ हजारांचा सवाल होता. नाक मुठीत धरून तो प्राध्यापकांकडे गेला आणि त्यांची क्षमा मागून पैसे परत घेऊन आला.
      एकदा एक ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी आमच्या बँकेत आले.कॅशिअरने त्यांना मळक्या नोटा दिल्या तेंव्हा त्यांनी विचारले,"या नोट चालतील?"
      कॅशिअर म्हणाली,"आजोबा, याच नोटा चालतील. नव्या नोट धावतील. आता या वयात तुम्हाला कसं जमेल त्यांच्याबरोबर धावायला? म्हणून मुद्दामच जुन्या नोटा दिल्या तुम्हाला"
     आजोबा काही न बोलत नोटा घेऊन निघून गेले. दुपारी जेव्हा कॅशिअरने कॅश टॅली करायला घेतली तेंव्हा तिला दहा हजार रुपये कमी आले. कॅश शॉर्ट आहे हे कळताच आम्ही काहीजण तिच्या मदतीला गेलो. सगळ्या नोटा पुन्हा पुन्हा मोजल्या. बेरजा तपासल्या. पण फरक काही सापडला नाही. पैसे देताना चेकच्या पाठी नोटांचे विवरण (denominations) लिहिणे आवश्यक असते. ते न लिहिल्यामुळे पैसे कुणाला जास्त दिले ते कळायला मार्ग नव्हता.पण रक्कम मोठी होती म्हणून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्या शक्यता पुन्हा पुन्हा पडताळून पाहत होतो. शेवटी कॅशिअरला स्वतःच्या पदरचे पैसे देण्यावाचून गत्यंतर हे निश्चित झाले आणि तेवढ्यात आजोबा मागच्या दाराने बँकेत शिरले. दहा हजार रुपये कॅशिअरला देत म्हणाले"माझ्या लक्षात आलं तेंव्हा मला अगदी धावत येऊन पैसे परत करावेसे वाटले पण या वयात मी कुठे धावणार?  हळू हळू चालत आलो ना म्हणून उशीर झाला." कॅशिअरचा चेहरा अगदी पाहण्यासारखं झाला होता.
      सांगायची गोष्ट ही की आजोबा बँकेच्या समोरच्याच इमारतीत राहत होते. 
                                                               वैशाली सामंत.