एक गाणे — वांझ संत्र्याच्या झाडाचे


एक गाणे — संत्र्याच्या वांझ झाडाचे


लाकूडतोड्या,
तोड माझी सावली माझ्यातून.
मला मुक्त कर ह्या पीडेतून
— ही पीडा स्वतःला निष्फल बघण्याची.


का झाली माझी पैदास ह्या आरशांत?
हा दिवस फिरतोय माझ्याभोवती गरगरा
आणि ही रात्र दाखवते मला वाकुल्या
तिच्या सर्व तारकांतून.


मला जगायचेय न बघता स्वतःला.
आणि मी बघीन स्वप्न — हे किडे आणि ह्या मुंग्या
आहेत माझी पाने आणि माझे पक्षी.
 
लाकूडतोड्या,
तोड माझी सावली माझ्यातून.
मला मुक्त कर ह्या पीडेतून
— ही पीडा स्वतःला असे निष्फल बघण्याची.


लोर्का


अनुवादासाठीचा स्रोत- मूळ स्पॅनिश कवितेचा इंग्रजी अनुवाद
मनोगतावरील प्रेरणास्थान- निःफळ संत्र्याच्या झाडाचे गाणे