व्यवस्थापक

एका मोठ्या संस्थेमध्ये व्यवस्थापकीय प्रशिक्षणासाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. एका होतकरू उमेदवाराला अध्यक्षाने सांगितले, "जातांजातां जरा शिपायाला चहा पाठवायला सांगून जा." त्याने लगेच समोरच्या टेबलावरील घंटा वाजवली. त्यासरशी बाहेरचा शिपाई आंत आला. त्याला लगेच सर्वांसाठी गरम गरम चहा आणायला सांगितले, दूध व साखर वेगवेगळे आणण्याची सूचना दिली तसेच त्याबरोबर बिस्किटे, वेफर्स असे कांही खाद्यपदार्थ फर्मावले. 
अर्थातच त्याची निवड झाली.


कामावर आल्यावर पहिल्याच दिवशी तासाभराने त्याला चहा पिण्याची तलफ आली. पण त्याच्या केबिनमध्ये घंटा ठेवलेलीच नव्हती. त्याने फोन उचलून अंदाजाने कॅंटीनचा समजून एक नंबर फिरवून ताबडतोब चहा पाठवून देण्याची आज्ञा केली. पलीकडून आवाज आला, "कोण बोलतंय्? मी या संस्थेचा प्रमुख बोलतोय्."
त्यानेही ऐटीत विचारले, "मी कोण बोलतोय् ते ठाऊक आहे? "
"नाही." उत्तर आले.
"ते एक बरं झालं." असे म्हणत त्याने फोन ठेऊन दिला.


तळटीप.. हे जुनेच विनोद आहेत हे मुद्दाम सांगायची तसदी घेतली नाही तरी चालेल.