होम्स कथाः अंतिम लढत-२

याआधीः होम्स कथाः अंतिम लढत-१
'अनेक वर्षं मी मोरीयार्टीचा हा बुरखा फाडून त्याला जगापुढे उघडं पाडायचा प्रयत्न करतो आहे. या वेळी मी त्याचा पाठपुरावा करत अगदी जवळ आलो होतो, आणि एक दिवस खुद्द मॉरीयार्टीची आणि माझी समोरासमोर गाठ पडली.'


'तुला सांगतो वॅटसन, तो गुन्हेगारांचा अनभिषिक्त सम्राट आहे. या शहरातल्या जवळजवळ सगळ्या, ज्ञात किंवा अज्ञात कृष्णकृत्यांमधे त्याचा हात आहे. तो भयंकर हुशार माणूस आहे. एखाद्या कोळ्यासारखा तो जाळं विणून जाळ्याच्या मध्यभागी स्वस्थ बसलेला आहे, पण जाळ्याचे सर्व तंतू दूरदूरपर्यंत पसरलेले  आहेत. स्वतः तो कशातही प्रत्यक्ष पडत नाही. पण त्याच्या माणसांचं जाळं चांगलं पसरलेलं आहे. माणसं भलेही कधीतरी पकडली जातात, पण या सगळ्याच्या मागे असलेला सूत्रधार पकडला जाणं तर सोडच, संशयितांच्या गणतीत पण नाही. आणि मी हे जाळं शोधून त्याचा नायनाट करण्यात खूप शक्ती घालवली आहे.' होम्स सांगत होता.


'पण मॉरीयार्टीने सर्व इतक्या धूर्तपणे आखलंय की त्याला अडकवणारा पुरावा शोधणं जवळ जवळ अशक्य होतं. माझी कुवत तुला माहित आहेच, पण यावेळी मला तुल्यबळ शत्रू मिळाला आहे. त्याच्या गुन्ह्यांपेक्षाही त्याची गुन्हे करण्यातली धूर्तता माझ्या नजरेत भरते आणि मी त्याला दाद देतो.पण शेवटी त्याने चूक केलीच आणि मी त्याच्याभोवतीचं जाळं पक्कं करत गेलो. तीन दिवसात, म्हणजे पुढच्या सोमवारपर्यंत मॉरीयार्टी त्याच्या टोळीसहित पोलीसांच्या ताब्यात असेल. तो खटला आजतागायतचा सर्वात मोठा खटला असेल आणि जवळजवळ चाळीस जुन्या गुन्ह्यांमागचे गूढ उलगडेल.पण जर घाई केली तर सर्व जुळून आलेलं बिघडेल आणि मॉरीयार्टी पुराव्याअभावी निसटेल.'


'पण मॉरीयार्टी प्रचंड हुशार माणूस आहे. माझी प्रत्येक खेळी त्याला माहित होती. प्रत्येक वेळी तो सुटायचा प्रयत्न करत गेला पण मी त्याच्यावर मात केली. आमची दोघांची जुगलबंदीच चालू होती. त्याने वार करायचा, मी परत सवाई वार करायचा असं चालू होतं. आता मी माझी शेवटची खेळी खेळली आणि मला सगळं पूर्ण करायला फक्त तीन दिवस हवे होते'


'मी माझ्या खोलीत हाच विचार करत बसलो होतो आणि मॉरीयार्टी माझ्या समोर उभा राहिला. तसं त्याला मी पूर्वी काहीवेळा पाहिलं होतं. कायम अभ्यासात असल्याने पोक आलेले त्याचे खांदे, थोडी पुढे असलेली मान. त्याची मान थोडीशी हलवण्याची लकब मला एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्याची आठवण करुन देते. तो माझ्याकडे रोखून पाहत होता.'


'पायजम्याच्या खिशात लोडेड शस्त्रं ठेवणं धोकादायक आहे. तुम्हाला हे कळण्याइतकी अक्कल असेल असं वाटलं होतं.' मॉरीयार्टी म्हणाला.


('खरंतर मी मॉरीयार्टीला पाहूनच धोका ओळखला होता आणि खणातलं पिस्तूल पटकन खिशात सरकवलं होतं. मला माहित होतं की आता त्याच्या सुटकेसाठी मला मारुन सर्व तपासावर पडदा टाकणं हा एकच मार्ग त्याच्यापुढे होता.' होम्स म्हणाला.)


'तुम्ही मला ओळखत नसालच.' मॉरीयार्टी म्हणाला.
'उलट माझ्याइतकं चांगलं तुम्हाला कोणीच ओळखत नसेल. जर तुम्हाला काही सांगायचं असलं तर पाच मिनीटं वेळ मी निश्चित देऊ शकतो. खुर्ची घ्या.' (होम्स म्हणाला.)
'मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही ओळखलं असेलच.' मॉरीयार्टी म्हणाला.
'मग माझं त्याच्यावर उत्तर काय असेल हे तुम्हीपण ओळखलं असेलच.' होम्स म्हणाला.
'तुम्ही आपला निर्णय बदलणार नाही म्हणायचं तर?' -मॉरीयार्टी.
'अर्थात.' -होम्स.
'मॉरीयार्टीने खिशात हात घातला आणि एक नोंदवही काढली.' होम्स सांगत होता. 
'४ जानेवारीला तू पहिल्यांदा माझ्या वाटेत आलास.' मॉरीयार्टी म्हणाला. '२३ जानेवारीला तुझ्या हालचालींनी मला काळजीत टाकलं, फेब्रुवारीपर्यंत तू माझ्या कामात बऱ्यापैकी गैरसोय केलीस, आणि मार्चपर्यंत माझ्या योजना तुझ्यामुळे अडायला लागल्या. आणि आता, एप्रिलमधे तू माझ्यासाठी अशी परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहेस की तुला थांबवलं नाही तर माझं स्वातंत्र्य धोक्यात आहे.' मॉरीयार्टी म्हणाला.
'तुम्हाला काही म्हणायचं आहे का?' होम्स शांतपणे म्हणाला.
'तू हे सर्व सोडून दे, खरंच सांगतो.' मॉरीयार्टी म्हणाला.
'सोमवार नंतर.' होम्स म्हणाला.
'अरेरे! तू समजत नाहीयेस, होम्स. तुला माहिती आहे याचा परिणाम काय होईल. आमच्याकडे तो एकच मार्ग उरला आहे.पण तू माझ्या तोडीस तोड बुद्धीमान आहेस आणि मला असा काही टोकाचा निर्णय घेताना वाईट नक्की वाटेल.' मॉरीयार्टी थंडपणे म्हणाला.
'धोक्यांशी मी रोजच खेळत असतो.' होम्स.
'पण हा धोका नाही, तुझा विनाश आहे. तू एका प्रबळ यंत्रणेच्या विरुद्ध उभा राहिला आहेस. आमची कुवत तुला माहित नाही. तू बाजूला होत नसशील तर चिरडला जाशील.' -मॉरीयार्टी.
'मी उठलो आणि म्हणालो, 'माफ करा, पण मला काही महत्त्वाचे काम आहे.'' होम्स सांगत होता.
'मॉरीयार्टी उठला आणि त्याने हताशपणाचा आव आणून मान हलवली.' होम्स म्हणाला.
'ठिक आहे तर.' मॉरीयार्टी म्हणाला. 'मला जे करता आलं ते मी केलं. मला तुझी प्रत्येक खेळी माहिती आहे. तुला वाटतं की तू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करशील. मी तुला सांगतो मी आरोपीच्या पिंजऱ्यात कधीच उभा राहणार नाही. तुला वाटतं तू मला हरवशील. पण मी तुला सांगतो की मी कधीच हरणार नाही. जर तू माझा नाश करण्याइतका स्वत:ला हुशार समजत असशील तर तुला सांगतो, मी पण तुझा काटा काढू शकतो.' मॉरीयार्टी म्हणाला.
'तुम्ही माझी स्तुती करत आहात, मॉरीयार्टी. मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छीतो की समाजाच्या हितासाठी मी जे होईल ते स्विकारायला तयार आहे.' होम्स म्हणाला.
'मी तुला नक्की बघून घेईन.' मॉरीयार्टी म्हणाला आणि खोलीबाहेर गेला.


'तर अशी माझी आणि मॉरीयार्टीची भेट झाली. मी थोडा अस्वस्थ झालो. कारण धमक्या दिल्या नाहीत तरी त्याच्या शांत आणि थंड बोलण्याच्या पद्धतीने मला सांगितलं की तो काहीही करु शकतो. आता तू म्हणशील वॅटसन, की तू पोलीस सुरक्षा का घेत नाहीस म्हणून, पण मला खात्री आहे, यावेळी वार त्याच्याकडून नाही, त्याच्या माणसांकडून होईल. माझ्याकडे आत्ता या क्षणी पुरावे आहेत.' होम्स म्हणाला.


यानंतर:
होम्स कथाः अंतिम लढत-३
होम्स कथा: अंतिम लढत-४
होम्स कथा: अंतिम लढत-५
होम्स कथा: अंतिम लढत-६