होम्स कथाः अंतिम लढत-१

खूप जड अंतःकरणाने आज मी माझ्या प्रिय मित्राचा, होम्सचा हा शेवटचा वृत्तांत लिहितो आहे. स्कार्लेटच्या प्रकरणापासून माझा आणि होम्सचा आलेला संपर्क, आम्ही एकत्र पाहिलेल्या अनेक घटना, केलेली काही साहसे हे लिहूनच खरं तर मी थांबलो असतो. ज्या अप्रिय घटनेने माझ्या जीवनात ही कायमची पोकळी निर्माण केली आहे, ती तुम्हाला वर्णन करुन सांगण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं मला वाटत होतं. पण आज कर्नल मॉरीयार्टी अनेक लिखाणांतून आपल्या भावाचं गात असलेलं गुणगान पाहून मला खरी गोष्ट जगापुढे मांडण्याखेरीज गत्यंतरच नाही.. प्रा. मॉरीयार्टी आणि होम्समध्ये नक्की काय झालं ते या प्रसंगाला जवळून पाहिलेला साक्षीदार म्हणून सांगण्याची जबाबदारी मला घ्यावीच लागेल. 


माझ्या लग्नामुळे, आणि माझ्या खाजगी डॉक्टरीमुळे होम्सचा आणि माझा संपर्क आणि येणंजाणं पूर्वीइतकं राहिलं नव्हतं. म्हणजे, अजूनही त्याला काही केसच्या संदर्भात माझी मदत लागली तर तो येत असे, पण भेटी आधीच्या मानाने तुरळकच झाल्या होत्या. १८९० मध्ये तर माझ्या माहितीत आणि माझा संबंध आलेल्या त्याच्या तीनच केस होत्या. त्यावर्षी मी वर्तमानपत्रात वाचलं की फ्रेंच शासनाने त्याला एका महत्वाच्या केससाठी नियुक्त केलं आहे. आणि नॅरबोन आणि नाईम्समधून आलेल्या त्याच्या पत्रांवरुन मला वाटलं की त्याचा फ्रान्समधील मुक्काम लांबेल. त्यामुळे एप्रिलच्या संध्याकाळी तो माझ्या दवाखान्यात आला तेव्हा मला खरं म्हणायचं तर जरा आश्चर्यच वाटलं. आणि तो खूप निस्तेज आणि पूर्वीपेक्षा जास्त हडकुळा वाटत होता.


'हो, मी हल्ली जरा जास्तच दगदग करतोय.' माझी नजर आणि नजरेतले भाव ओळखूनच तो म्हणाला. 'थांब हं, मी जरा खिडक्या बंद करुन घेतो.' 
माझ्या वाचनाच्या टेबलावर जो काही थोडाफार प्रकाश पडत होता तो त्या खिडकीमुळेच. पण होम्स वळसा घालून पलीकडे गेला आणि त्याने खिडक्या घट्ट बंद करुन घेतल्या.
'तुला कशाची तरी भिती वाटते आहे.' मी म्हणालो.
'अं, हो, बरोबर आहे.'
'पण कसली?'
'बंदुकींची.'
'म्हणजे, होम्स, काय झालंय तरी काय?'
'वॅटसन, तू मला आता बऱ्यापैकी ओळखतोस आणि तुला माहीत आहे की थोड्याथोडक्याने हातपाय गाळणारा मी नाही. पण हेही खरं की धोका आहे हे स्पष्ट दिसत असताना उगाच जीव धाडसात घालवणं याला मी हिंमत नाही, मूर्खपणा समजतो. काडेपेटी आहे का रे?' त्याने सिगारेट शिलगावली आणि त्या धुराने नवीन संजीवनी मिळाल्यासारखा तो जरा शांत होऊन विसावला. 'जरा उशिरा आलो आहे,तुला त्रास तर नाही दिला ना? आणि हो, मी जाताना तुझ्या मागच्या कुंपणावरुन उडी मारुन गेलो तर तुला चालेल ना?'
'पण नक्की झालंय तरी काय?' आश्चर्यचकित मी.


होम्सने आपले हाताचे पंजे दाखवले. त्याच्या बोटाच्या पेरांना जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होतं.
'मी काहीतरी कल्पना करुन उगाच घाबरत नाहीये, तुला कळलंच असेल. मला जी शंका आहे ती माझ्या हातांच्या जखमांइतकीच खरी आहे. बरं मला सांग, मिसेस वॅटसन कुठे आहे?'
'ती काही दिवस गावाला गेलीय.'
'म्हणजे तू एकटा आहेस?'
'हो.'
'मग आता मी तुला जास्त हक्काने विचारु शकतो की तू माझ्या बरोबर एक आठवडा मध्य युरोपात येशील का?'
'पण कुठे?' मी गोंधळून विचारलं.
'कुठेही. मला सगळं सारखंच आहे.'


खरोखर आज होम्सची सगळी वागणूकच बुचकळ्यात पाडणारी होती. निरर्थक सुट्ट्या घेऊन भटकणाऱ्यांपैकी होम्स कधीच नव्हता. आणि आज त्याच्या फिकट चेहऱ्यावरचे भाव मला सांगत होते की तो कसल्यातरी जबरदस्त ताणाखाली आहे. होम्सने माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न वाचले असावेत. तो सरसावून बसला आणि मला सांगायला लागला.
'तू कधी प्राध्यापक मॉरीयार्टीचं नाव ऐकलं आहेस?नसशीलच.'
'नाही'
'अत्यंत हुशार आणि धूर्त माणूस आहे. गुन्ह्यांच्या यादीत त्याचं नाव सर्वात वरती आहे. आणि विशेष गोष्ट अशी की त्याच्याबद्दल जास्त कोणाला काही माहीत नाही. खरं सांगतो वॅटसन, मी जर मॉरीयार्टीला पकडवून या समाजाला त्याच्यासारख्या गुन्हेगारांपासून मुक्त करु शकलो तर तो मी माझ्या कारकीर्दीत गोवलेला सन्मानाचा शिरपेच समजेन आणि त्याच्यानंतर एखाद्या निरुपद्रवी धंद्यात शिरेन. तुला म्हणून सांगतो वॅटसन, फ्रान्स आणि स्कँडीनेव्हीयन राजघराण्याच्या मदतीसाठी मी ज्या शोधकार्यात होतो त्याने माझ्यासमोर खूप वेगळी गुपिते उघडली. आता माझ्यापुढे एकच पर्याय होताः सर्व शोधकार्य सोडून देऊन माझ्या रसायनशास्त्राच्या संशोधनाकडे वळणे किंवा सर्व कळूनही शांत बसून राहणे. पण मॉरीयार्टीसारखा समाजकंटक आणि धोकादायक माणूस खुलेआम समाजात हिंडतो आहे हे विसरुन स्वस्थ बसणाऱ्यांपैकी मी नाही.'
'पण त्याने काय केलंय?'- मी.
'त्याची कारकीर्द फारच आगळीवेगळी आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी या माणसाने बायनॉमियल प्रमेयावर शोधनिबंध लिहिला आणि त्याला युरोपात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या जोरावर त्याला अनेक विद्यापीठांमध्ये गणितीय अभ्यासाशी संबंधित उच्च पद सहज मिळत होतं. त्याला या क्षेत्रात खूप चांगला वाव होता. पण एकंदरीत त्याच्या रक्तातच गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याने तो त्या दिशेकडे वळत चालला. त्याच्या असामान्य बुद्धीमुळे तो लवकरच एक धोकादायक गुन्हेगार बनला. त्याच्या बद्दल विद्यापीठात वेड्या वाकड्या अफवा पसरत गेल्या आणि त्याला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. शेवटी तो सगळं सोडून लंडनमध्ये आला आणि त्याने सैन्यात शिक्षकाची नोकरी पत्करली. जगाला त्याचा फक्त हाच चेहरा माहिती आहे पण मी स्वतः बऱ्याच गोष्टी उलगडत गेलो. तुला माहितीच आहे, माझा लंडनच्या गुन्हेगारी जगाबद्दल केवढा अभ्यास आहे..गेली कित्येक वर्षं मला वाटतच होतं की बऱ्याच गुन्ह्यांमागे एक जबरदस्त मेंदू आहे, आणि तो पोलिसांनाही हुलकावण्या देतो आहे. दरोडे, फसवणूक,खून सगळ्यांमागे असलेला हा माणूस मी शोधला. अनेक वर्षं मी मोरीयार्टीचा हा बुरखा फाडून त्याला जगापुढे उघडं पाडायचा प्रयत्न करतो आहे. या वेळी मी त्याचा पाठपुरावा करत अगदी जवळ आलो होतो, आणि एक दिवस खुद्द मॉरीयार्टीची आणि माझी समोरासमोर गाठ पडली.'


यानंतर:
होम्स कथाः अंतिम लढत-२
होम्स कथाः अंतिम लढत-३
होम्स कथाः अंतिम लढत-४
होम्स कथाः अंतिम लढत-५
होम्स कथाः अंतिम लढत-६