होम्स कथाः अंतिम लढत-३

या आधीः होम्स कथाः अंतिम लढत-१
या आधीः होम्स कथाः अंतिम लढत-२
आता तू म्हणशील वॅटसन, की तू पोलीस सुरक्षा का घेत नाहीस म्हणून, पण मला खात्री आहे, यावेळी वार त्याच्याकडून नाही, त्याच्या माणसांकडून होईल. माझ्याकडे आत्ता या क्षणी पुरावे आहेत.' होम्स म्हणाला.


'म्हणजे तुझ्यावर हल्ला झालेला आहे?' मी चकित होऊन विचारलं.
'वॅटसन, तुला काय वाटलं, मॉरीयार्टी स्वस्थ बसून राहील? मी आज काही कामानिमित्त ऑक्सफर्ड मार्गावर गेलो होतो. मी बेंटीक रस्त्याच्या कोपऱ्याला आलो आणि अचानक दोन घोड्यांची एक गाडी माझ्या अंगावर आली. मी पटकन फुटपाथावर उडी घेतली म्हणून थोडक्यात वाचलो. ती गाडी क्षणात एका गल्लीत घुसून दिसेनाशी झाली. त्यानंतर मी फुटपाथावरूनच चालत होतो. पण व्हेर मार्गावर आलो तशी वरुन कुठूनतरी एक वीट माझ्या पायावर पडली आणि पायाचा जवळजवळ भुगा झाला.मी ताबडतोब पोलिसांना कळवून त्यांनी ती इमारत तपासली. पण इमारतीच्या छतावर विटांचा ढीग रचून ठेवला होता आणि पोलिसांनी माझी समजूत घातली की वीट वाऱ्याने पडली. मला तसं अजिबात वाटत नव्हतं, पण जे मला वाटत होतं ते मी त्यांच्यासमोर सिद्ध करु शकलो नाही. त्याच्यानंतर मी गाडी करुन सरळ माझ्या भावाकडे गेलो आणि तिथेच दिवस घालवला. आता तुला भेटायला येत होतो, तर एक गुंड माझ्यावर लाठी घेऊन धावून आला. मी त्याच्याशी यशस्वी झुंज दिली आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. पण पोलीस त्या गुंडाचा फळ्यावर गणितं मांडणाऱ्या कोण्या विद्वान गणित प्राध्यापकाशी काही संबंध आहे हे स्वप्नातही शोधू नाही शकणार. आता तुला आश्चर्य वाटणार नाही, की मी तुझ्या खोलीत आल्या आल्या खिडक्या दारं का बंद केली आणि गुपचूप मागच्या दाराने निसटायचं का म्हणतोय ते.' होम्स एका दमात म्हणाला.


 माझ्या मित्राचं असामान्य धैर्य मी बऱ्याच प्रसंगात पाहिलं आहे, पण आज एकाच दिवसात इतक्या जोखमीच्या प्रसंगातून गेल्यावर पण त्याला हे सर्व शांतपणे माझ्यापुढे सांगताना पाहून मला त्याच्या हिमतीचं कौतुक वाटलं. 
'मग तू रात्री मुक्कामाला आहेस ना?' मी विचारलं.
'नाही रे बाबा. सध्या मी तुझा पाहुणा बनणं तुला पण धोकादायक आहे. त्यापेक्षा माझ्याकडे दुसरी एक योजना आहे. पोलीस आता माझ्या मदतीशिवाय त्याला अटक वगैरे निश्चित करु शकतील, पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध करायला मात्र मी इथे असणं आवश्यक आहे. मला वाटतं की मी काही दिवस कुठेतरी अज्ञातवासात राहणं हाच सर्वात चांगला उपाय आहे. आणि तू माझ्यासोबत मध्य युरोपात आलास तर चांगलंच.'
'सध्या माझ्याकडे जास्त रोगी नाहीत. आणि माझा शेजारी काही दिवस काम सांभाळू शकेल. मी येईन तुझ्याबरोबर.' मी म्हणालो.


'मी उद्या निघू म्हटलं तर?' होम्स म्हणाला.
'जर तशी गरज असेल तर चालेल की.'
'गरज तर आहेच. आणि आता माझ्या सूचना नीट ऐक. तू त्या तंतोतंत पाळाव्यास अशी माझी इच्छा आहे, कारण यावेळी आपली गाठ युरोपातल्या सर्वात हुशार आणि बलाढ्य गुन्हेगाराशी आहे. हां, तर ऐक, तू तुझं सामान कोणीतरी विश्वासू माणसाकडून आधीच पाठवून देशील. सकाळी तू गाडी मागवशील ,आणि तुला स्वत:हून विचारणाऱ्या गाडीत बसणार नाहीस. गाडीवाल्याला लॉथर आर्केडचा पत्ता सांगशील आणि हातात भाडं तयार ठेवून उतरायच्या जय्यत तयारीत राहशील. गाडी थांबल्याथांबल्या उतरुन आर्केडच्या दुसऱ्या टोकाला जाशील. तुला सव्वानऊपर्यंत तिथे पोहचायलाच हवं. तिथे लाल कॉलरीच्या काळ्या कोटात नखशिखान्त झाकलेला माणूस एका गाडीत तुझी वाट पाहत असेल. या गाडीतून तू जाशील आणि व्हिक्टोरिया स्टेशनावर काँटिनेंटल एक्सप्रेस पकडशील.' होम्सने आपली योजना सांगितली.


'पण तू मला कुठे भेटशील?'
'स्टेशनावरच. इंजिनापासून दुसरा डबा आपल्यासाठी राखून ठेवलेला असेल.'
'म्हणजे तो डबा ही आपली भेटायची जागा ना?'
'हो' होम्स म्हणाला.


मी होम्सला थांबण्याचा खूप आग्रह केला. पण त्याला वाटत होतं की त्याच्या थांबण्याने तो माझ्यावर आणि या घरावर संकटाचे सावट आणेल. परत एकदा उद्याच्या योजनेबद्दल सांगून तो मागच्या कुंपणावरुन उडी मारुन मॉर्टीमर रस्त्यावर आला आणि पटकन गाडी बोलावून क्षणार्धात गायब झाला.  


दुसऱ्या दिवशी मी होम्सच्या सूचना तंतोतंत पाळल्या.शक्य तितकी गुप्तता पाळून  गाडी करुन लॉथर आर्केडवर उतरलो आणि पटकन आर्केडच्या टोकाला गेलो. तिथे एक गाडी आणि काळ्या कपड्यातला एक धट्टाकट्टा माणूस हजर होतेच.मी बसल्याबसल्या माणसाने वेगाने घोडे पिटाळले. आणि स्टेशनावर मी उतरतो न उतरतो तोच तो गाडी वळवून मागे पण न पाहता निघूनही गेला.


आतापर्यंत तरी सगळं ठरवल्याप्रमाणे नीट पार पडलं होतं. मला सामान मिळालं आणि आमचा राखीव डबापण. पण होम्सचा मात्र पत्ताच नव्हता. इतक्यात तिथे एक वृद्ध इटालियन धर्मगुरु आला आणि तो रेल्वेच्या माणसाला त्याच्या अचाट मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये सांगू लागला की त्याचे सामान पॅरीसला न्यायची नोंद करायची आहे. मी त्याचा मदतीला गेलो आणि त्यांचा भाषेमुळे चाललेला सावळागोंधळ मिटवला. होम्सची थोडावेळ वाट पाहून मी डब्याकडे जातो तर काय, रेल्वेच्या माणसाने त्या धर्मगुरुला माझ्याच राखीव डब्यात जागा दिली होती. मी त्याला खूप समजावले की माझे इटालियन भाषेचे ज्ञान त्याच्या इंग्लिशपेक्षाही तुटपुंजे आहे. आणि डबा राखीव आहे. पण त्याने ऐकले नाही. शेवटी मी वैतागून खांदे उडवले आणि होम्सची वाट बघू लागलो. आता मला भिती वाटायला लागली की होम्सचं काही बरंवाईट तर नाही ना झालं? गाडीची शिट्टी वाजली, दारं पण बंद झाली आणि अचानक.. 


यानंतर:
होम्स कथाः अंतिम लढत-४
होम्स कथा: अंतिम लढत-५
होम्स कथा: अंतिम लढत-६