गोष्ट छोट्या राजूची

      ही गोष्ट आहे छोट्या राजूची आणि सतत कामात व्यग्र असणाऱ्या त्याच्या बाबांची.राजूला त्याच्या बाबांबरोबर धमाल करायला फार आवडे. तो आणि बाबा क्रिकेट खेळायचे, चौपाटीवर फिरायचे,सर्कस बघायचे बेत करत पण ऐनवेळी बाबांचे काही महत्त्वाचे काम येई आणि त्यांचे सगळे बेत बारगळत. अशा वेळी राजू खूप खट्टू होई. बाबांनाही फार वाईट वाटे. मग ते राजूसाठी त्याचा आवडता खाऊ किंवा छान छान खेळणी आणून त्याची समजूत काढायचा प्रयत्न करत.
      त्या दिवशीही असेच झाले. सकाळपासून राजू खूप खुशीत होता. संध्याकाळी बाबा लवकर घरी येणार होते. मग राजू, आई आणि बाबा मिळून क्रिश बघायला जाणार होते. सिनेमानंतर पिझ्झा खायलाही जाणार होते. क्रिश बघायला मिळणार म्हणून राजू खूप उत्साहित झाला होता.'अज्जून कसे पाच वाजले नाहीत'  असे सारखे सारखे विचारून त्याने आईला दुपारभर भंडावून सोडले होते आणि ऐनवेळी बाबांचा फोन आला की रात्री घरी यायला खूप उशीर होईल. हे ऐकताच राजू हिरमुसला.रागावला. दुखावला. अपेक्षाभंगाने त्याच्या डोळ्यात पाणी तरारले पण तो रडला नाही. तणतणला नाही. मात्र त्याने मनोमन ठरवले की आज काही झाले तरी बाबांना घेऊन सिनेमाला जायचे म्हणजे जायचेच. खेळायला न जाता तो बाल्कनीत  बसून बाबांची वाट पाहत राहिला. आईने केलेला पिझ्झासुद्धा त्याच्या घशाखाली उतरेना. रात्र झाली. डोळ्यात झोप भरू लागली.आई परत परत झोपायला बोलवत होती तरी राजू जागचा हालला नाही. शेवटी झोप अनावर झाली तेंव्हा तो तिथेच झोपी गेला. आईने त्याचे मुटकुळे उचलून पलंगावर ठेवले.
      मध्यरात्री घरी आल्यावर बाबा प्रथम राजूच्या पलंगाजवळ आले.त्याचा मलूल चेहरा पाहून त्यांना भरून आले.त्याच्या डोक्यावरून हात फिरवून ते वळणार तोच त्यांना राजूची अस्फुट हाक ऐकू आली. ते थबकले. वळले. अर्धवट झोपेतच राजूने त्यांना विचारले,'' बाबा, एक तास काम केल्यावर तुम्हाला किती पैसे मिळतात?"
      प्रश्न ऐकून बाबा चमकले. म्हणाले,"कसले भलते प्रश्न विचारतोस? रात्र खूप झाली आहे. झोप आता."
      राजू काकुळतीने म्हणाला,"सांगा ना बाबा किती मिळतात?"
      बाबा थोड्याशा नाखुशीने उत्तरले,"शंभर रुपये"
      "बाबा, मला पन्नास रुपये द्याल?" राजूने विचारले.
      "ओह! यासाठी का हा प्रश्न होता? हे घे पन्नास रुपये" असे म्हणत बाबांनी पन्नासाची एक नोट राजूपुढे धरली. ती हातात न घेता राजूने उशीखालून दुसरी पन्नासाची नोट काढली आणि ती बाबांपुढे धरत त्याने विचारले,"बाबा,मला तुमचा एक तास मिळेल?" 
      बाबा दिग्मूढ होऊन राजूकडे पाहतच राहिले.
      इ-मेलमधून आलेल्या इंग्रजी कथेचे स्वैर भाषांतर.