वाचावे ते नवलच -८- वेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या त-हा

लैंगिकता या थोड्याशा वेगळ्या विषयाचे वेगवेगळे पैलू दाखवणा-या तीन घटना हल्लीच वाचायला मिळाल्या. जहांगीर, सिमरोझा, ताज अशी कलादालने किंवा गांवोगांवची वस्तुसंग्रहालये पहातांना आपल्याला दिसतं की तेथील चित्रांमधील माणसं कपड्यांची फारशी तमा बाळगत नाहीत. अंगावर कपडे नसले तरी त्यांच्या चेह-यावर मात्र शांत, प्रसन्न, करुण, रौद्र, भीषण असलेच कांही भाव असतात, अगदी शृंगारिक चित्राला सुध्दा एक प्रकारची शालीनता असते. त्यामुळे ती चित्रे वा शिल्पे ओंगळवाणी वाटत नाहीत. कांही आंबटशोकीन लोक उघड्या अंगांकडे निरखून पहात असतीलही, पण बहुसंख्य प्रेक्षक संपूर्ण कलाकृतीचा एकत्र आस्वाद घेतात. अलीकडेच जहांगीर कलादालनांत एक प्रदर्शन भरले होते ते प्रत्यक्ष पहाण्याचा योग आला नाही, पण त्याबद्दल जे छापून आले त्यावरून असे दिसते की "कामातुराणां न भयं न लज्जा" या अवस्थेत पोचलेली कांही पात्रे कदाचित तेथे दाखवलेली होती. संस्कृतिसंवर्धक वगैरे लोक अशा ठिकाणी फिरकत नाहीत पण फाडफाड इंग्रजी बोलणा-या व फॅशनेबल दिसणा-या एका महिलेला सुध्दा ते जरा अतीच वाटून तिने त्याविरुध्द पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी येऊन त्या कलाकृतींना पडदानशीन केले व पुढील कारवाईची सूचना दिली म्हणे. कलाक्षेत्राचे स्वातंत्र्य, सत्ताधारी लोकांचा हस्तक्षेप वगैरेवर नेहमीप्रमाणे आरडाओरड झाली. कुणीतरी अशीही पुडी सोडली की मुळात फारसे महत्व न मिळालेल्या या कलाकारांना या निमित्ताने ब-यापैकी प्रसिध्दी मिळाली. "घटं भिंद्यात कुर्यात रासभरोहणम्, येनकेनप्रकारेण प्रसिध्दपुरुषो भवेत" असं म्हंटलेलंच आहे.
घर चालवण्यासाठी मध्यमवयी महिला काय काय उद्योग करतात याचा एक वृत्तांत छापून आला होता. कलामहाविद्यालयाच्या अंतिम परीक्षेमध्ये नग्न चित्रे हा ही एक अनिवार्य विषय आहे म्हणे. त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कांही स्त्रिया मोडेलिंगसाठी येतात, सांगतील तेवढे कपडे काढून सांगतील त्या पोजमध्ये तास दोन तास बसतात व कांही न बोलता आपली फी घेऊन चालू पडतात. त्यांच्या देहप्रदर्शनामध्ये लैंगिकतेचा लवलेशही नसतो आणि त्यातून निर्माण होणा-या कलाकृतींमध्येही त्यांना कांही रस नसतो. असती ती फक्त त्या चार भिंतीपलीकडील जगांत सन्मानाने जगण्याची धडपड.
तिसरी बातमी राजस्थानमधून आली आहे. अठ्ठ्याऐंशी वर्षे वयाच्या वृध्दाला पहिला मुलगा झाला. त्यासाठी त्याने तीन लग्ने केली. नियमितपणे उंटाचे दूध पिणे व रोज कित्येक किलोमीटर चालणे हे त्याच्या चिरयौवनाचे रहस्य आहे. आणखी कित्येक वर्षे घडघाकटपणे जगणे व मुख्य म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत लैंगिक क्षमता टिकवून धरणे या त्याच्या इच्छा आहेत. वाचावे ते नवलच!