बोलता बोलता
तुला एकदम आठवायचं
बस हं! चहा ठेवते
तू म्हणायचं
"साखर कमी"
मी नेहमी आठवण द्यायची
हो म्हणून
बोलता बोलता तू ती भरपूर टाकायची
एक घोट घेताच
मी नाक मुरडायचं
दातांनी श्वास ओढत
तू "सॉरी" म्हणायचं
"कोई बात नही" चालतंय
माझं म्हणणं
हट बॉ! मी नेहमी अशीच करते
तुझं ओशाळणं
"पुढच्या वेळी छान करेन"
असं म्हणायचं
असं सतत म्हणता यावं
म्हणून तेच करायचं
हे आता मला
नेहमीचं झालंय
आज तेच वाक्य ऐकायला
मी पुन्हा आलोय
बोलता बोलता
तुला एकदम आठवायचं...
तुषार जोशी, नागपूर