वाग्वैजयंती — नटमित्रास पत्र

नटमित्रास पत्र
[दिंडी]
ज्येष्ठ बंधो! साष्टांग नमस्कार!
बांधवाचा घे आधि गुणाधार
मान्य करुनी ही विनंती विशेष
वृत्त ऐके सप्रेम मम अशेष.
पत्र पूर्वी तुज पाठविले त्याचे
त्वरे प्रत्युत्तर खास यावयाचे
असे आधी घेतले मन्मनाने
परी ठरले भलतेच अनुभवाने
पाहुनीया परि गद्य पत्र त्याचे
कठिण तुमचे मन कठिण द्रवायाचे
शब्दसुमनांचा म्हणुनि करुनि झेला
पाठवी मी; हा तरि वरिच झेला.
जरा तुमच्या मी दृष्टिआड होता
सृष्टिआडही झालोच काय आता?
वाढले हे जरि अंतर स्थळाचे
काय प्रेमातही तेच व्हावयाचे.
आळसाने का हा प्रकार झाला?
पात्र किंवा मी नसे उत्तराला?
राग अथवा का अजुनि नाहि गेला?
प्रेमसिंधुच की मुळी शुष्क झाला?
निकट असता जो स्नेह दाखवीला
भासला तो तैं सत्य मन्मतीला
आजि कळला परि खरा अर्थ त्याचा
मासला की तो तुझ्या अभिनयाचा!
खरा नट तू, रे नटवरा खराच
तारतम्याचे ज्ञान परि न साच
अभिनयाची तुज शक्ति तर असावी
समय पाहुनि ती परी दाखवावी.
रंगभूमी अभिनये भूषवावी
तीच वृत्ती सर्वत्र परि नसावी
कालपट जरि दृष्टीस आड आला
तरि न विसरावे कधी मित्रतेला.
एकट्यासचि तुज दोष देत नाही
वृत्ति सर्वांची हीच दिसत पाही
काहि काळें भेटता तुम्हा कोठे
ओळखीसहि विसराल असे वाटे!
ओघ कवितेचा येथवरी चाले
पत्र तुमचे इतक्यात हेच आले
खिन्न माझे मन सुप्रसन्न होत
प्रवाहाचा बदलुनी रोख जात.
पुढिल कार्यक्रम अजुनि ठाम नाही
परस्वाधिन ही गोष्ट असे पाही
छत्रपतिच्या पत्रांत तरि तयाचा
काहि केला उल्लेख तोच वाचा.
लेखनाचे कौशल्य फार माझे
तुझा उपहासच त्यास योग्य साजे
लिहित बसणे तुम्हांस नित्य पत्रे
लेखनाचे कौशल्य हेच सारे.
असे वरचेवर पत्र पाठवावे
आणि प्रकृतिते नित्य जपत जावे
उण्या अधिकाचा राग नच धरावा
भूतकालासह तोहि भूत व्हावा.
बहुत लिहिणे वद काय याहुनीही
विनती नित्याची लोभ असावा ही
काव्यदेवीतें द्यावया विराम.
घेइ आज्ञा
            आपला
                    मित्र
                            "राम"

[ओवी]
मुक्काम— नागपूर शहर
बार— पवित्र गुरुवार
तारीख— एकोणीस नोव्हेंबर
एकोणीसशे आठची १

गोविंदाग्रजांनी हे पत्र सुप्रसिद्ध नट गणपतराव बोडस ह्यांना पाठविले होते