एक प्रवासवर्णन आमचेही!!! - २

मागील भागाचा दुवा...
अलिबागवरून via पोयनाड एक रस्ता जातो नागोठण्यापऱ्यंत अलिबाग ते नागोठणे हे अंतर अंदाजे ३५ / ४० किमी आहे. रस्ता अपेक्षेपेक्षाही चांगला होता आणि नयनरम्यही ;)


मधे आम्हाला IPCL ही लागले आणि त्यानंतर तर रस्ता अत्यंत चांगल्या स्थितीत असलयाचे जाणवले.

थोड्याच वेळात आम्ही मुंबई - गोवा महामार्गावर पोहोचलोसुद्धा. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या आणि आमचा हूरूप आणखिनच वाढत होता. मजल दरमजल करीत कोलाड, वरसगाव पार करून आम्ही एका छानशा उपहारगृहात नाश्ता केला.  हिरवीगार शेते आणि शांत सुंदर ओला रस्ता, धुक्यात अद्रूश्य झालेली डोंगरमाथी सगळे वातावरणच अगदी वेड लावेल असे होते. एव्हाना आम्ही माणगावला येऊन पोचल्याची जाणिव झाली, इथपर्यंत आम्ही साधारणपणे १ / १.३० तासात पोचलो असू.

एवढ्यात उजवीकडे एक पाटी दिसली श्रीवर्धन ४५ किमी, हरीहरेश्वर ६३ किमी.
आणि आम्ही वळलो, पण रस्त्याची हालत बघवत नव्हती, बायको म्हणाली हा असाच असणार आहे का पुढपर्यंत? मी म्हणालो छे ग..!! श्रीवर्धन आणि हरीहरेश्वर खूप फेमस आहेत त्यामूळे रस्ता नक्कीच चांगला असेल. हा फक्त थोडासा पट्टा असेल. पण मनातून मलाही हीच चिंता वाटत होती. ;)


२ / ४ वळणांनंतर रस्ता अगदी चकाचक झाला आणि मी बायकोकडे एक विजयी कटाक्ष टाकून बोललो, "बघ म्हणालो होतो ना?" पण माझे हे शब्द हवेत विरतील न विरतील गाडीला एक गचका बसला, आणि रस्त्याने परत आपले रूप दाखवून दिले. एव्हाना अम्ही ७ / ८ किमी पार केले होते. आणि रस्ता हळूहळू निर्मनुष्य होत होता. अधुनमधुन फक्त काही गुराखी आपली गुरे घेऊन जाताना दिसत होते आणि मधेही येत होते, माझ्या बायकोने एवढ्या खेडेगावाचा कधीच अनुभव घेतला नव्हता पण ती ही "स्वदेस" बघावा तसे डोळे फाडफाडून ते गाव बघत होती.


आता रस्ता सरळसोट राहीला नव्हता तर वळणावळणांचा आणि अधिकच चढावाचा झाला होता. जेमतेम एक गाडी जाऊ शकेल एवढीच वाट होती आणि रस्त्याच्या दुतर्फा चिखलमिश्रीत लाल माती होती खाचगळगे अंतराजणिक वाढतच होते.

आतामात्र रस्ता पुर्णतः निर्मनुष्य झाला होता, आणि आम्ही घाटामधे एकाजागी सहजच थांबलो गाडीही बंद केली साफ आणि काय सांगू अशी शांतता शेवटी कधी अनुभवली होती हेच विसरलो आहे. शांत रस्ता, वाऱ्याचा आवाज, निरनिराळ्या पक्ष्यांचे कुजन / गुंजन आणि समोर धुक्यातले डोंगर. दूर कुठेतरी दिसणारा एक जलाशय.



थोड्याश्या विश्रांतीनंतर एक चेकपोस्ट पार करून आम्ही म्हसळयास दाखल झालो. इथुन १५ किमी वर श्रीवर्धन, २८ किमी वर हरीहरेश्वर तर १५ किमी वर दिवेआगार होते. थोडया विचारांती आम्ही श्रीवर्धनला प्रथम जायचा निर्णय घेतला.

क्रमशः...