एक प्रवासवर्णन आमचेही!!! - ५

भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४

रात्रभर पावसाने अक्षरशः ऊत आणला होता.

त्यामुळे सकाळी ५.३० लाच ऊठलो जेमतेम झोप पुरी झाली ना झाली. माझी बायकोतर वैतागुन म्हणालीसुद्धा की बाकी दिवशी ऑफीस म्हणून आणि आता ट्रीप म्हणून एकुणकाय तर सुखाने झोपायलाच मिळत नाही. असो....

भल्या पहाटे थंड पाण्याने आंघोळ केली कारण गिझरची कळ व्यवस्थापकांच्या खोलीतून बंद होती. निघायला तरी ७ वाजलेच. आता ईथून म्हसळा, गोरेगाव मार्गे महाड आणि पुढे रायगड.

जाताना म्हसळ्यापर्यंत पुन्हा तोच रस्ता होता. आणि तिथुनपूढे गोरेगाव मार्गे, महाड. सकाळी सकाळीतर या रस्त्याला अजुनच शोभा आली होती. जागोजागी आम्हाला गुराख्यांचे तांडेच्या तांडे लागत होते. आज शाळांना सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे शाळा कॉलेजातली पोरेही दिसत होती. आणि मला तर पाहून आश्चर्याचा झटकाच बसला जेव्हा, बोर्ली गावी मी ICSE Board ची शाळा पाहिली.

म्हसळा पार करुन आम्ही आता गोरेगावचा रस्ता धरला होता. आणि थोड्याच वेळात घाटही चालू झाला, हा घाट आधी जो म्हसळा - श्रीवर्धनचा घाट होता त्याही पेक्षा सुंदर होता. आजु बाजूची झाडी जास्तच घनदाट होती. आणि रस्ता पुर्णतः निर्मनुष्य होता.  आतातर जागोजागी धबधब्यांचा आणि पक्ष्यांचा किलबिलाट मन वेडावून टाकत होता.





खालच्या गावातल्या झोपड्या चांगल्याच गोंडस दिसत होत्या. आणि त्यातून येणारा धुर आणखिनच शोभा येत होती. मला मी कुठल्या धबधब्यात जाता येईल ते पहात होतो पण दुर्दैवाने कुठल्याच धबधब्यात जाणे शक्य नव्हते. रस्त्यावरची वर्दळ अगदीच क्षुल्लक होती आणि माणसेतर जवळजवळ नाहीतच. तरीही घाटात काही ठिकाणी आम्हाला बस थांबे लागले ज्यावर गवत आणि झाडे उगवली होती. ते थांबे कधी कोणी वापरले होते ते संशोधनाचा विषय होऊ शकेल.

रस्ता खराबच होता पण आता सवय झाली होती त्यामुळे ५० / ६० चा वेग कायम राखुन आम्ही महाडला पोचलो ईथे सर्वप्रथम टाकी फुल्ल करुन घेतली आणि थोडे अंतर पार केल्यानंतर एक पाटी दिसली रायगड रोपवे. रायगड २५ कि. मी.



क्रमशः ....