लक्ष्मण गुह संवाद - २

ह्याआधी
सुखदुःख कां ? लक्ष्मण गुह संवाद

ह्या आधी आपण पाहिले की पूर्व संचित कर्मानुसार प्रारब्ध घडते आणि ते केव्हां ना केव्हां तरी भोगूनच संपवावे लागते. पण ही फळे केव्हां मिळतील हे सांगता येत नाही. महाभारत शांतिपर्व 181.12 ते 20 मध्येही म्हटले आहे - " फुलांना उमलविण्याविषयी किंवा फळांना परिपक्व होण्याविषयी कुणीही प्रेरणा करीत नाहीत. तरी सुद्धा ती आपल्या नियत कालाचें कधीही उल्लंघन करीत नाहीत. ठरल्या वेळींच फुलें उमलतात, आणि ठरल्या वेळींच फळे परिपक्व होतात. तद्वत्‌ पूर्वजन्मांत केलेल्या कर्मांची ठरल्या वेळींच फळें मिळत असतात. सन्मान आणि अवमान, लाभ आणि हानि, उदय आणि अस्त, या सार्‍या गोष्टी प्राक्‍तन कर्माच्या अनुरोधाने पुन्हा पुन्हा निर्माण होतात, आणि कालांतराने पुन्हा पुन्हा लुप्त ही होतात. पूर्वजन्मी आपण करून ठेवलेल्या दुःखदायक गोष्टी, आणि आपणच करून ठेवलेल्या सुखप्रद गोष्टी पुन्हा जन्म घेऊन आपल्याला भोगाव्या लागतात. बाल असो, तरुण असो अथवा वृद्ध असो, त्या त्या अवस्थेमध्ये त्यांनी जी शुभ कर्मे केली असतील अथवा अशुभ कर्मे केली असतील त्यांची फलें त्यांना भोगावी लागतात. हजारो गाईंच्या घोळक्यातून वासरू आपल्या मातेला चटकन्‌ शोधून काढते, तद्वत्‌ पूर्वजन्मी केलेलें कर्म कर्त्याचा माग काढीत जातें. प्रथम घामानें मलिन झालेले वस्त्र नंतर धुतल्यामुळे स्वच्छ होते. विषयत्यागाच्या योगाने ज्यानी क्लेश सहन केले असतील त्यांना मोक्षरूपी शाश्वत सुखाचा लाभ होतो. दीर्घकाल तपश्चर्या केली असतां, आणि धर्माचरणाने सर्व पातके धुवून टाकली असतां माणसांचे (मोक्षप्राप्तीचे) मनोरथ पूर्ण होतात. पक्ष्यांचा अंतरिक्षांतील मार्ग शोधून काढता येत नाही. मासे पाण्यांत कसे वाटचाल करतात ते सांगता येत नाही. तद्वत्‌ ज्ञानी पुरुषाचे मार्ग सामान्य माणसांना कळत नाहीत." आता आपण लक्ष्मणाकडे वळून तो पुढे काय म्हणतो पाहू या.


सुखं वा यदि वा दुःखं स्वकर्मवशगो भवेत् ।
यद्यद्यथागतं तत्तद् भुक्त्वा स्वस्थमना भवेत् ॥ ८ ॥
न भोगागमे वाञ्छा न मे भोगविवर्जने ।
आगच्छत्वथ मागच्छत्वभोगवशगो भवेत् ॥ ९ ॥


        मनुष्य स्वकर्म अधीन असल्यामुळे जसजशी सुखद वा दुःखद परिस्थिती प्राप्त होईल तसे तसे भोग भोगून सर्वदा प्रसन्नचित्त राहावे (easier said than done) आणि पुढील श्लोकात सांगितले तशी वृत्ति ठेवावी. सुख देणारे भोग भोगावेत अशीही मला इच्छा नाही, वा दुःखी करणारे भोग त्यागावेत असेही मला वाटत नाही. ते मला मिळोत वा न मिळोत, मी भोगाच्या अधीन राहणार नाही. म्हणजे कसे ? मी सुखात हुरळून जाणार नाही आणि असेच सर्वदा सुखी असावे अशी आसक्‍ति बाळगणार नाही, तसेच दुःख भोगत असतांना क्रोध, संताप, स्वतःची करुणा, चरफडाट, दुसर्‍यांना दोष देणे वगैरे करून विषण्ण होणार नाही.


यस्मिन् देशे च काले च यस्माद्वा येन केन वा ।
कृतं शुभाशुभं कर्म भोज्यं तत्तत्र नान्यथा ॥ १० ॥
अलं हर्षविषादाभ्यां शुभाशुभफलोदये ।
विधात्रा विहितं यद्यत्तदलङ्घ्यं सुरासुरैः ॥ ११ ॥


        विधात्याने जिवासाठी नियमच करून ठेवला आहे की, ज्या स्थळी, ज्या काळी, ज्यामुळे किंवा ज्या योगाने ज्या कोणी शुभ-अशुभ कर्म केले असेल त्याला तशाच रीतीने व तशाच प्रकारचे फळ भोगावे लागते. आणि ब्रह्मदेवाने जे कांही ठरविले आहे, ते देवांना व दैत्यांनाही चुकविण्याचे सामर्थ्य नाही, मग बापडा मनुष्य तो काय ? म्हणून शुभ वा अशुभ कसेंही फल प्राप्त झाले तरी त्याबद्दल हर्ष किंवा विषाद करू नये.


सर्वदा सुखदुःखाभ्यां नरः प्रत्यवरुध्यते ।
शरीरं पुण्यपापाभ्यामुत्पन्नं सुखदुःखवत् ॥ १२ ॥
सुखस्यानंतरं दुःखं दुःखस्यानंतरं सुखम् ।
द्वयमेतद्धि जन्तूनामलङ्घ्यं दिनरात्रिवत् ॥ १३ ॥
सुखमध्ये स्थितं दुःखं दुःखमध्ये स्थितं सुखम् ।
द्वयमन्योन्यसंयुक्तं प्रोच्यते जलपङ्कवत् ॥ १४ ॥


        मनुष्य नेहमी सुख आणि दुःख यांनी घेरलेलाच असतो, कारण मनुष्य शरीरच मुळी पाप आणि पुण्य ह्यापासून उत्पन्न झालेले असल्यामुळें त्याला सुख-दुःखे ही जडलेलीच असतात. दिवस आणि रात्र जसे एकामागून येतात तसे सुखामागून दुःख आणि परत सुख असे येतच असतात. ही सुखदुःखे एकमेकाला अशी चिकटलेली आहेत, जसे पाण्याचिखलाचा संबंध आहे तसे. म्हणून -


तस्माद्धैर्येण विद्वांस इष्टानिष्टोपपत्तिषु ।
न हृष्यन्ति न मुह्यन्ति सर्वं मायेति भावनात् ॥ १५ ॥ 


        विवेकी लोक अनुकूल अथवा प्रतिकूल अशा कोणत्याही प्रसंगांत आनंदी होत नाहीत वा शोकही करीत नाहीत, तर ते हा सर्व मायेचा खेळ आहे असे जाणून प्राप्त परिस्थितीत धैर्‍याने वागतात.
        आतापर्यंत गीतेतून, उपनिषदांतून व इतर धर्म ग्रंथांतूल वरील 9 व 15 श्लोकात जो उपदेश आला आहे तशाच प्रकारे सुख-दुःख, पाप-पुण्य ह्यांतून निवृत्त होण्याचे मार्ग दाखवलेले दिसतात. भग. गीतेतील एक दोनच उदाहरणे देतो. "योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्‍त्वा " (2.48) - समबुद्धि ठेवून कर्मे करीत जा. "न प्रहृष्येत्प्रियं प्राप्यं, न उद्विजेत्‌ प्राप्य च अप्रियम्‌ " (5.29) - प्रिय वस्तु प्राप्त झाली असतां हर्ष नको आणि अप्रिय वस्तु प्राप्त झाली असतां विशाद नको. अशा अर्थाचे अक्षरशः शेकडो श्लोक देता येतील. पण हे कसे करायचे. ह्यातून मुक्‍त होण्यासाठी सर्वत्र जप-तप करण्यास सांगितलेले आहे. पण जप-तप केल्याने पाप-पुण्यातून मुक्‍ति कशी साधते ह्याचे विवरण फार क्वचित ठिकाणी दिसते.  ते जाणायचे म्हणजे अनुभवलेल्या गोष्टी स्मृतिमध्ये कशा प्रकारे नोंदविल्या जातात, ह्या जगतात आपण प्रत्येक बाबतीत ज्या कशा प्रकारे react होतो ते तसे कां करतो , विषयांमध्ये आसक्‍त असलेले मन विषयात कशामुळे रमते, त्याचा अंतर्मनाशी (subconscious) काही संबंध आहे का, अंतर्मनात अजून काय दडलेले आहे, वर (बहिर्मनांत) आपण ठरवतो एक व त्याप्रमाणे प्रयत्नशीलही असतो, पण बर्‍याच वेळेला त्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. मग स्मृतिमध्ये (आपल्या hard disk मध्ये) व आपल्या अंतर्मनामध्ये काही वेगळेच असते का ? हे सर्व तपासायचे म्हणजे अभ्यासाचा तो एक वेगळा विषय आहे. त्याला कमीतकमी तीन ते चार भाग देखील लागतील. तूर्त सुख-दुःखाच्या फेर्‍यातून सुटायचे, म्हणजेच ' पुनरपि मरणं पुनरपि जननं ' ह्या तून मुक्‍त व्हायचे (असे वाटत असेल) तर शास्त्रात काय सांगितले आहे तेव्हढेच पाहणे हिताचे होईल.
        एक मुख्य (आणि एकमेव) उपाय सांगितलेला दिसतो तो म्हणजे " त्याग / वैराग्य /विरक्‍ति ". कशापासून ? संसारापासून ? नाही, सर्वसंगपरित्याग म्हणजे संसारचा त्याग नव्हे, तर कामक्रोधादिकांचा त्याग करणे. क्रोधाचे दुष्परिणाम वा त्यामुळे  साधनेत होणारे अडथळे हे काही सांगायची गोष्ट नव्हे. प्रत्येकाला ते पदोपदी दिसते, जाणवतेही. त्याच्यावर मात करायचे कितीतरी उपाय श्री भोमेकाकांनी मनोगतावर दिले आहेतच. आता राहिला " काम ". हा तर क्रोधापेक्षाही दारुण शत्रू आहे. "काम एष क्रोध एष महापाप्मा, विद्धि एनम्‌ वैरिणम्‌ " (गीता 3.37).   काम म्हणजे इच्छा, आसक्‍ति ह्यावर बरेच उपाय शास्त्रामध्ये सांगितले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी एक उपाय सांगितला तो मननीय आहे - "जरी पुत्रशोकु संकल्पा | दाखविजे || (ज्ञा. 6.375). आता संकल्प म्हणजे काय ? " श्रुते दृष्टे अपि वा भोग्ये यस्मिन्‌ कस्मिंश्च वस्तुनि, समीचीनत्वधी " - ऐकलेल्या पाहिलेल्या अशा कोणत्याही भोग्य वस्तूविषयी, ही चांगली आहेत अशी जी बुद्धि होते त्याला संकल्प म्हणतात व त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा हा काम. म्हणून काम हा संकल्पाचा पुत्र. मग विषय (भोग्य वस्तु) असूनही तेथे काम (प्राप्तीची) इच्छा नाही असे झाले तर त्या कामाचा बाप म्हणजे संकल्प पुत्रशोक होऊन प्राण सोडतो.
        शास्त्रामध्ये अशा बर्‍याच युक्‍त्या आहेत. पण लेख बराच लांबला आहे ह्याची जाण आहे म्हणून आवरते घेतो.