सुखाचा शोध (तात्पर्य कथा)

सुखाचा शोध (तात्पर्य कथा)   


     फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट.


     एका गावात, मारुतीच्या देवळात एक साधनी, तरुण ब्रह्मचारी असा साधू राहत असतो. एक दिवस त्या देवळापाशी एक सावकार त्याच्या लवाजम्यासहित येतो. त्याचे वैभव, त्याची वरवर करणारी माणसे पाहून या साधूला वाटते की अरे आपण सुख मिळावे म्हणून इतकी साधना करतो, पण हा सावकारच खरा सुखी दिसतो. तो जवळ जाऊन सावकाराला विचारतो,"आपण सुखी दिसता. याचे रहस्य काय?" तो सावकार यावर खिन्न मुद्रेने म्हणतो,"मी कसला सुखी बाबा! अरे, नुसतीच धन दौलत असून काय फायदा ! विद्वत्ता असेल तर समाजात मान असतो. तो शेजारच्या गावी विद्वान राहतो ना, तू त्याला जाऊन भेट." असे पाहता साधू त्या विद्वानाकडे जातो.


     विद्वान खिन्न वदनाने म्हणतो,"मी कसला सुखी बाबा! हाडाची काडे करून हे ज्ञान मिळवले पण लोक विचारत नाहीत. सांगीतलेले ऐकत नाहीत. अधिकार जोडीला असेल तर विद्वत्तेचा उपयोग. तू असे कर, तो शेजारच्या गावात पुढारी आहे ना, त्याच्याकडे जा. तो विद्वानही आहे. लोक त्याचे ऐकतात. तोच सुखात असणार." असे पाहता साधू त्या पुढाऱ्याकडे जातो.


     तो पुढारी खिन्न वदनाने म्हणतो,"अरे, मी कसला सुखी बाबा! सत्ता आहे सर्वकाही आहे. पण ज्या लोकांसाठी मी हे काम करतो, ते माझ्याविषयी काय वाट्टेल ते बोलत असतात. ती निंदा सहन होत नाही बघ. तुला खरा सुखी माणूस पाहायचा असेल तर तू शेजारच्या गावात मारुतीच्या देवळात राहणाऱ्या साधूला जाऊन भेट. तो ब्रह्मचारी आहे आणि सदा ईश्वरचिंतनात मग्न असतो. तोच खरा सुखी आहे." हे तर स्वतःचेच वर्णन आहे हे समजल्यावर त्या साधूला स्वतःचीच लाज वाटते, आणि तो परत जातो.


(संदर्भ- 'गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय')
--लिखाळ.